निशिगंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निशिगंध

निशिगंध तथा गुलछबू गुलछडी ही एक सुवासिक फुले देणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पॉलियांथेस ट्युबेरोसा आहे. झुडूप वर्गातील या वनस्पतीची उंची एक ते दीड मीटर एवढी असते. निशिगंधाला हिंदीत रजनीगंधा तर इंग्लिशमध्ये ट्यूबरोझ नाव आहे. निशिगंधाची फुले रात्री फुलतात. म्हणून त्या फुलांना निशिगंधा म्हणतात.

वर्णन[संपादन]

या वनस्पतीची पाने साधी लांब आणि गडद हिरव्या रंगाची असतात. या वनस्पतीच्या पानावरील शिरा समांतर प्रकारातील असतात.. अशा प्रकारची रचना असलेली पाने एकबीजपत्री या गटात मोडतात. या गटातील वनस्पतींना फांद्या नसतात. फुले खोडसदृश दांड्याच्या टोकावर येतात. दांडय़ावर जास्तीत जास्त ३० फुले असतात. दांडय़ाच्या खालच्या भागातील फुले आधी उमलतात, त्यानंतर त्याच्या वरची आणि सर्वात शेवटी टोकाकडील फुले उमलतात. नळीसारख्या आकारातून पांढऱ्या रंगाच्या सहा पाकळ्या वर आलेल्या असतात. अशा प्रकारची विशिष्ट रचना असल्यामुळेच या फुलांना इंग्रजीत ट्यूबरोझ असे म्हटले जाते.

फुले[संपादन]

एकेरी पाकळ्या असलेली निशिगंधाची फुले नेहमी बघायला मिळतात. या प्रकारची फुले असलेली जात शृंगार या नावाने ओळखली जाते. त्याचप्रमाणे दुहेरी पाकळ्या असलेली निशिगंधाची फुले सुहासिनी या नावाने कृषी क्षेत्रात परिचित आहे. सोनेरी रंगाच्या दुहेरी पाकळ्या असलेले निशिगंधाचे एक वाण लखनौ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन केंद्रात तयार केले आहे.

लागवड[संपादन]

निशीगंधाच्या मुळाशी लहानलहान कंद (कांदे) असतात. या कांद्यांना पिल्ले फुटतात. लागवड करताना ती पिल्ले जमिनीत खोलवर पुरतात. मार्च ते मे हे दोन महिने निशिगंधाच्या लागवडीसाठी योग्य समजले जातात. लागवडीनंतर फुले येण्यास तीन महिने लागतात.मुळात परकी असली तरी आज ही वनस्पती जगातील सोळा देशांमध्ये प्रामुख्याने आढळते. भारतातील मुख्यत: पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मणिपूर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम या राज्यांत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून लागवड केली जाते. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे, सांगली हे जिल्हे निशिगंधाच्या लागवडीमध्ये अग्रेसर आहेत.

व्यापारी उपयोग[संपादन]

फुलातील तेलाचा उपयोग अरोमा उपचारासाठी केला जातो. तसेच या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठीही होतो. फुलाची गुणवत्ता, गंध यामुळेच निशिगंधाला व्यापारी पिकाचे महत्त्व आहे.