नवीन वर्ष
नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष किंवा नवीन दिनदर्शिका सुरू होण्याची वेळ किंवा दिवस. या दिवसापासून वर्षाची मोजणी एका अंकाने वाढत.
बऱ्याच संस्कृतीत हा कार्यक्रम काही प्रमाणात साजरा करतात. सर्वत्र सध्या प्रचलनात असलेल्या ग्रेगरीय दिनदर्शिकेत, १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चिन्हांकित केला जातो. जुलियन दिनदर्शिका आणि रोमन दिनदर्शिकेतही १ जानेवारी हाच नवीन वर्षाचा दिवस होता.
इतर संस्कृती त्यांचा पारंपारिक किंवा धार्मिक नवीन वर्षाचा दिवस त्यांच्या स्वतःच्या रुढीनुसार पाळतात आणि कधीकधी नागरी दिनदर्शिकेतील (ग्रेगोरियन) १ जानेवारी हा दिवसपण साजरा करतात. चीनी नववर्ष, मुस्लिम नवीन वर्ष, पारंपारिक जपानी नवीन वर्ष आणि ज्यू नवीन वर्ष (रोश हशाना) ही अधिक सुप्रसिद्ध उदाहरणे आहेत. भारतात आणि इतर देशांत वेगवेगळ्या तारखांवर नवीन वर्ष साजरे केले जाते. भारतातील अनेक राज्यांत पण नवीन वर्षाचे दिवस वेगवेगळे आहेत.
मराठी, कोंकणी, कन्नड व तेलुगू भाषिक भागांमध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा होतो.[१]
भारत
[संपादन]भारतात अनेक राज्यांत नवीव वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो. पंजाबी / शीख धर्मातील लोक बैसाखी या त्यांच्या नानकशाही दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष साजरा करतात. तमिळ कालदर्शिकेनुसार पुथंडु किंवा पुथुवरुषम पासून नवीन वर्षारंभ होतो त्या दिवशी नव वर्ष साजरा केला जातो. नमीळनाडूतील विविध मंदिर आणि घरांमध्ये उत्सव आयोजित केला जातो. घरांच्या अंगण कोलमनी (रांगोळी) सजवले जाते. हिमाचल प्रदेश मधील डोगरा लोक चैत्र महिन्यात त्यांचे नवीन वर्ष चैत्य साजरे करतात. आसाम मध्ये रोंगाली बिहू हा एप्रिल मध्ये येणारा नवीन वर्षाचा दिवस आहे.
बंगाली बांधव हे पहेला वैशाखला साजरा करतात. हा बांगलादेशातील राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो हा एप्रिल मध्ये येणारा सण पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांमध्ये बंगाली परंपरा असणाऱ्या लोकांमध्ये धार्मिक धर्मनिरपेक्ष साजरा होतो. केरळ राज्यात विषु हा सण साजरा होतो. कर्नाटक मधील मंगलोर आणि तुलू भाषिक लोक पण विषु साजरा करतात. हे सर्व दिवस गुढी पाडवा याच दिवशी येतात. यांची फक्त नावे वेगळी आहेत. संपूर्ण मराठी प्रांत ( महाराष्ट्र, गोवा ) व मराठी भाषिक कर्नाटक , तेलंगणा भागांमध्ये गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणुन साजरा होतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील व तेलंगणातील काही मराठी भाषिक भाग व संपूर्ण जगातील मराठी बांधव गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात.
उगाडी हा हा कर्नाटाकातील नव वर्ष दिन असतो तो गुडीपाडव्याच्या दिवशी साजरा होतो.
मारवाडी व गुजराती लोक दिवाळी पासून नवीन वर्ष सुरू करतात. सिंधी नव वर्षाची सुरुवात चेटीचंड उत्सवापासून होते. पारशी धर्मात नववर्ष नवरोजच्या रूपात साजरे केले जाते.
संदर्भ
[संपादन]- ^ "जाणून घ्या, कोणत्या धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरवात केव्हा होते". ३० डिसेंबर २०१८. १ जानेवारी २०२० रोजी पाहिले.