द.पं. जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


द.पं. जोशी (जन्म : परभणी जिल्हा, १४ ऑक्टोबर, इ.स. १९३२; [१] - हैदराबाद, ३० डिसेंबर, इ.स. २०११) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार होते.

द. पं. जोशी हे हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेचे ३० वर्षे कार्यवाह होते. त्यांनी ८ वर्षे परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले. परिषदेच्या ‘पंचधारा’ या त्रैमासिकाचे संपादन करून ते मराठी महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत.

परभणी येथील नूतन विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून जोशी उच्च शिक्षणासाठी हैदराबादला आहे. उस्मानिया विद्यापीठीतून ते इ.स. १९५९ साली एम.ए. झाले. मुळात अंगी इतिहासाबद्दलचे प्रेम, पूर्वसूरींबद्दल आदर, कामाची आवड, अभ्यासू वृत्ती आणि कुशाग्र बुद्धी असल्याने जोशी हैदराबादला आले आणि त्यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कामांत गुंतत गेले. बाल हनुमान संघ, साधना संघ, मराठी महाविद्यालय आणि मराठी साहित्य परिषद ही त्यांची मुख्य कार्यक्षेत्र राहिले आहे. १९५८पासूनच ते ’पंचधारा’ त्रैमासिकाशी जोडले गेले. श्रीधरराव कुलकर्णी, रा.ब. माधेकर या मंडळींनी अधिक सामाजिक आणि साहित्यिक कामासाठी संपादकपद सोडल्यानंतर द.पं. जोशी यांनी इ.स. १९७४ सालापासून ’पंचधारा’च्‍या संपादकत्वाची धुरा खांद्यावर घेतली होती.

उस्मानिया विद्यापीठातील पुरतत्त्व विभागातल्या प्राचीन हस्तलिखितांच्या पोथ्या आणि परिषदेतील हस्तलिखिते यांची सूची करून ती द.पं.जोश्यांनी ती महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेल्या ’हैदराबादेतील मराठी हस्तलिखिते’ या ग्रंथात सम्मीलित करण्यासाठी दिली होती.

अध्यापन[संपादन]

द.पं. जोशी हे विवेक वर्धिनी महाविद्यालयात १९५९ पासून ते १९९२ पर्यंत मराठीचे प्राध्यापक होते.

द.पं. जोशी यांचे लेखन[संपादन]

द.पं. जोशी यांचे स्वतंत्र, संपादित आणि अनुवादित असे १५ ग्रंथ आहेत. निरनिराळ्या वाङ्‌मयीन आणि संशोधनात्मक नियतकालिकांतून त्यांचे १०० च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत. यांशिवाय अनेक उर्दू, हिंदी, कथा, लेख यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

द.पं. जोशी यांनी संपादित केलेली, अनुवादित केलेली आणि स्वतंत्रपणे लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • इतिहास हैदराबादचा : राजकारण भारताचे - या विषयांवरील द.पं. जोशीलिखित १३ लेखांचा संग्रह.
  • कर्तृत्वाचा महामेरू कै. के. व्ही. लक्ष्मणराव चरित्र व वाङ्‌मय : के.व्ही. लक्ष्मणराव यांचे चरित्र व त्यांचे तेलुगू, मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेले साहित्य व त्याच बरोबर त्याचे समालोचन करणारा ग्रंथ.
  • काळाच्या पडद्याआड खंड १, २, ३ : हैदराबादमधील इ.स. १९२० ते १९४० या काळात घडलेल्या आणि ’निजामविजय’ या हैदराबादमधील एकमेव मराठी वृत्तपत्रात छापून आलेल्या घटनांचा इतिहास. (संपादित)
  • डॉ. एस.व्ही. केतकर - इंग्रजी चरित्र
  • कै. चिंतामण नीलकंठ काकासाहेब जोशी : व्यक्ति आणि वाङ्‌मय
  • दक्षिणा आणि प्रदक्षिणा : जोशी लिखित २२ साहित्यविषयक लेखांचा संग्रह. दक्षिणी भारतात राहणाऱ्या मराठी लोकांच्या संस्कृतीचा इतिहास.
  • पानगळीची सळसळ : कुर्तुल ऐन हैदर यांच्या उर्दू कथासंग्रहाचा मराठी अनुवाद
  • पाषाणत्रय : १. हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली यांच्या अभ्युदय या हिंदी कादंबरीचा, २. अहिल्योद्धार या पुस्तकाचा आणि ३. उर्दू साहित्यकार जैलानी बानू यांच्या बशिराऽजंग - पाषाणवृष्टी कादंबरी व पत्थर का जिगर - पाषाणकोश या कथेचा मराठी अनुवाद.
  • मिर्झा गालिब व सरदार जाफरी यांची निवडक पत्रे : या उर्दू कवींच्या व्यक्तिपरिचयाबरोबरच त्यांच्या पत्रंचा मराठी अनुवाद.
  • समग्र कै. डॉ. ना. गो. नांदापूरकर : खंड १, २. (या पुनर्मुद्रित पुस्तकाची संपादित व जोशीलिखित प्रस्तावनेसहित नवी आवृत्ती
  • समग्र सेतुमाधवराव पगडी : पगडींच्या ६५ इंग्रजी ग्रंथांचे संपादन, प्रकाशन आणि प्रस्तावनालेखन.
  • लक्ष्मणास्वयंवर अर्थात विवेक विळास : कवी डिंभ या १७व्या शतकातील महानुभाव कवीच्या ३००० ओव्यांच्या काव्याची संपादित आवृत्ती, द. पं. जोशींलिखित २३ पानांच्या विस्तृत चिकित्सक प्रस्तावनेसह.
  • व्यक्तिविशेष : हैदराबाद परिसरातील मराठी विचारवंत, संशोधक, साहित्यिक आणि राजकारणी व्यक्तींचा परिचय करून देणारे २८ लेख.
  • हैदराबादची हस्तलिखिते (सूची)
  • हैदराबाद : विमोचन आणि विसर्जन कै. प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी १९७८ मध्ये दिलेली व्याख्याने आणि अन्य लेख यांच्या आधारे सिद्ध केलेला ग्रंथ.

पुरस्कार व गौरव[संपादन]

  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे दोनदा उपाध्यक्षपद.
  • जवळ बाजार येथील परभणी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, इ.स. १९९८

अधिक वाचन[संपादन]

  • भाषा आणि जीवन, ३०:२/ उन्हाळा २०१२

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ दुसर्‍या पिढीचे आत्मकथन. p. २२३.