Jump to content

दीर्घिकांचे संरचनाधारित वर्गीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नादकाट्याच्या आकारातील आकृतीचा हबल अनुक्रम

दीर्घिकांचे संरचनात्मक वर्गीकरण ही दीर्घिकांचे त्यांच्या दृश्य स्वरूपावरून विविध गटात वर्गीकरण करणारी पद्धत आहे. दीर्घिकांचे वर्गीकरण करणाऱ्या अनेक पद्धती आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत एडविन हबल याने बनवलेली हबल अनुक्रम ही आहे. पुढे जेरार्ड् डि वोकुला आणि ॲलन सॅंडेज यांनी तिचा विस्तार केला.

हबल अनुक्रम

[संपादन]

हबल अनुक्रम ही एडविन हबल याने १९२६ मध्ये तयार केलेली दीर्घिकांची संरचनात्मक वर्गीकरण पद्धत आहे.[][] हबलने दीर्घिकांचे त्यांच्या दृश्य स्वरूपावरून तीन प्रमुख गटांत वर्गीकरण केले:

  • लंबवर्तुळाकार दीर्घिका छायाचित्रांमध्ये लंबवर्तुळाकार आकाराच्या दिसतात आणि त्यांचे तीव्रतेचे वितरण सपाट, कोणतीही वैशिष्ट्ये किंवा अनियमितता नसणारे असते. त्यांना "E" या लॅटिन अक्षराने दर्शवले जाते त्यापुढे एक पूर्णांक असतो जो त्यांची आकाशातील विवृत्तता दर्शवतो.
  • सर्पिलाकार दीर्घिका तबकडीसारख्या चपट्या असतात. त्यांच्यातील तारे सर्पिलाकार आकाराचे फाटे बनवतात आणि त्यांच्या केंद्रस्थानी ताऱ्यांच्या केंद्रीकरणाने तयार झालेला जो तेजोगोल असतो, तो लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे दिसतो. या दीर्घिकांना "S" या अक्षराने दर्शवले जाते. अंदाजे दोन तृतीयांश सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये मधल्या केंद्रापासून दोन सरळ भुजा फुटून त्यांच्यापासून सर्पिल फाटे फुटलेले दिसतात. अशा भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकांना "SB" हे चिन्ह दिले गेले आहे.
  • मसूराकार दीर्घिकांमध्ये केंद्रस्थानी तेजस्वी तेजोगोल असतो आणि त्याच्याभोवती तबकडीसारखी संरचना असते, पण त्यामध्ये सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे सर्पिलाकार फाटे नसतात आणि त्यांच्यामध्ये नव्या ताऱ्यांची निर्मिती इतर दीर्घिकांच्य तुलनेने कमी वेगाने होते.
विश्वाच्या इतिहासात हबल अनुक्रम.[]

या मुख्य गटांचा दीर्घिकांमधील अधिक सूक्ष्म संरचनांच्या आधारे अधिक विस्तृत वर्गीकरण करण्यासाठी आणि आकारहीन दीर्घिकांसारख्या इतर दीर्घिका समाविष्ट करण्यासाठी विस्तार केला जाऊ शकतो.

हबल अनुक्रम सामान्यत: नादकाट्याच्या आकारात दर्शवला जातो. लंबवर्तुळाकार दीर्घिका डावीकडे असतात (विवृत्तता डावीकडून उजवीकडे वाढत जाते) आणि भुजायुक्त व भुजा नसलेल्या सर्पिलाकार दीर्घिका दोन समांतर शाखांवर दर्शवतात. मसूराकार दीर्घिका लंबवर्तुळाकार आणि सर्पिलाकार दीर्घिकांच्या मध्ये दोन शाखा मूठीला जिथे भेटतात तिथे ठेवल्या जातात. आजही दीर्घिकांचे वर्गीकरण करण्यासाठी खगोलशास्त्रामध्ये सामान्यत: हबल अनुक्रमाचा वापर केला जातो.

डि वोकुला पद्धत

[संपादन]

जेरार्ड् डि वोकुलाने १९५९ मध्ये वर्णन केलेली दीर्घिकांची वर्गीकरण पद्धत हबल अनुक्रमाचे विस्तृत रूप आहे.[] डि वोकुलाने असा दावा केला की, हबलने सर्पिलाकार दीर्घिकांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेले भुजा असणे किंवा नसणे आणि सर्पिलाकार फाट्यांच घट्टपणा हे निकष अनेक प्रकारच्या संरचनांमध्ये आढळलेल्या या दीर्घिकांचे वर्गीकरण करण्यासाठी पुरेसे नाहीत. त्याने असाही दावा केला की कडे (रिंग) आणि भिंग (लेन्स) हे सर्पिलाकार दीर्घिकांचे मुख्य रचनात्मक घटक आहेत[]

डि वोकुला पद्धतीमध्ये हबलचे लंबवर्तुळाकारसर्पिलाकारमसूराकार आणि आकारहीन हे दीर्घिकांचे मूळ प्रकार कायम ठेवले आहेत. हबलच्या पद्धतीला परिपूर्ण करण्यासाठी डि वोकुलाने पुढील तीन निकष वापरून सर्पिलाकार दीर्घिकांची अधिक विस्तृत वर्गीकरण पद्धत बनवली:

  • भुजा. दीर्घिकांच्या केंद्रकाजवळ भुजा आहे की नाही यावरून त्यांना विभागण्यात येते. हबलच्या भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकांच्या SB या चिन्हाला जोडून भुजा नसणाऱ्या दीर्घिकांना त्याने SA हे चिन्ह दिले. त्याने क्षीण भुजायुक्त दीर्घिकांसाठी दोघांच्या मधला SAB हा नवा वर्गदेखील बनवला.[] मसूराकार दीर्घिकांचेसुद्धा भुजायुक्त (SA0) किंवा भुजा नसलेल्या (SB0) दीर्घिका असे वर्गीकरण केले जाते. त्यामधले S0 हे चिन्ह अशा दीर्घिकांसाठी राखीव ठेवले आहे ज्या दीर्घिकांमध्ये भुजा आहे की नाही हे सांगता येत नाही.
  • कडे (रिंग). दीर्घिकांना ज्यांच्यामध्ये कडे आहे अशा (चिन्ह '(r)') आणि ज्यांच्यामध्ये कडे नाही अशा (चिन्ह '(s)') दोन गटांत विभागण्यात येते. अवस्थांतरातील दीर्घिकांना '(rs)' या चिन्हाने दर्शवण्यात येते.[]
  • सर्पिलाकार फाटे. हबलच्या योजनेप्रमाणे दीर्घिकांना त्यांच्या सर्पिलाकार फाट्यांच्या घट्टपणानुसार वेगवेगळ्या गटांत विभागण्यात येते. त्यामध्ये डि वोकुलाने काही नवीन वर्ग निर्माण केले:
  • Sd (SBd) - स्वतंत्र ताऱ्यांच्या गटांनी आणि तेजोमेघांनी बनलेले विखुरलेले, तुटक फाटे आणि अतिशय क्षीण केंद्रीय तेजोगोल.
  • Sm (SBm) - अनियमित आकार, केंद्रीय तेजोगोल नसतो.
  • Im - अतिशय ओबडधोबड दीर्घिका
हबलच्या मूळ योजनेमध्ये यातील बऱ्याच प्रकारच्या दीर्घिका Irr I या वर्गात मोडल्या जातात. Sd वर्गामध्ये हबलच्या Sc वर्गातील काही दीर्घिका येतात. Sm आणि Im प्रकारच्या दीर्घिकांना मॅजेलॅनिक ढगांवरून अनुक्रमे मॅजेलॅनिक सर्पिलाकार दीर्घिका आणि आकारहीन दीर्घिका म्हणले जाते. मोठा मॅजेलॅनिक ढग Sm प्रकारचा आहे, तर छोटा मॅजेलॅनिक ढग आकारहीन (Im) आहे.

या योजनेनुसार, वेगवेगळ्या घटकांना ज्या क्रमाने लिहिले आहे त्या क्रमाने एकत्र करून एखाद्या दीर्घिकेचे संपूर्ण वर्गीकरण दिले जाते. उदा. एका कमी घट्ट फाटे आणि कडे असणाऱ्या क्षीण भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकेला SAB(r)c या चिन्हाने दर्शवले जाते.

Colored dice with white background
एनजीसी ६७८२: भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका (प्रकार SB(r)0/a), हिच्यामध्ये वेगवेगळ्या त्रिज्येची तीन कडी आहेत.
Colored dice with checkered background
एनजीसी ७७९३: SA(s)d या प्रकारची सर्पिलाकार दीर्घिका
Colored dice with checkered background
मोठा मॅजेलॅनिक ढग: SBm या प्रकारची दीर्घिका


सांख्यिकी हबल टप्पा
हबल टप्पा T −६ −५ −४ −३ −२ −१ १० ११
डि वोकुला वर्ग[] cE E E+ S0 S00 S0+ S0/a Sa Sab Sb Sbc Sc Scd Sd Sdm Sm Im
जवळचा हबल वर्ग[] E S0 S0/a Sa Sa-b Sb Sb-c Sc Sc-Irr Irr I

यर्क्स (किंवा मॉर्गन) पद्धत

[संपादन]

ही पद्धत अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ विल्यम विल्सन मॉर्गन याने फिपिल कीनन याच्या सोबतीने बनवली. यांनी ताऱ्यांची त्यांच्या वर्णपटावर आधारित एमके वर्गीकरण पद्धत बनवली. यर्क्स पद्धती दीर्घिकातील ताऱ्यांचा वर्णपट; प्रत्यक्ष व आभासी आकार आणि मध्यभागातील केंद्रीकरणाची पातळी यांच्या आधारे दीर्घिकांचे वर्गीकरण करते.

वर्णपट प्रकार
स्पष्टीकरण
a प्रमुख तारे: A
af प्रमुख तारे: A–F
f प्रमुख तारे: F
fg प्रमुख तारे: F–G
g प्रमुख तारे: G
gk प्रमुख तारे: G–K
k प्रमुख तारे: K
कल स्पष्टीकरण
दीर्घिका "फेस-ऑन" आहे
दीर्घिका "एज-ऑन" आहे

देवयानी दीर्घिकेचे वर्गीकरण kS5 असे केले जाते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Hubble, E. P. (1926). "Extra-galactic nebulae". Contributions from the Mount Wilson Observatory / Carnegie Institution of Washington (इंग्रजी भाषेत). 324: 1–49. Bibcode:1926CMWCI.324....1H.
  2. ^ हबल, एडविन. द रेल्म ऑफ द नेब्यूली (The Realm of the Nebulae). New Haven. LCCN 36018182.
  3. ^ "हबल एक्स्प्लोअर्स द ओरिजिन्स ऑफ मॉडर्न गॅलॅक्सीज् (Hubble explores the origins of modern galaxies)". १८ मार्च, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b De Vaucouleurs, G. (1959). "Classification and Morphology of External Galaxies". Handbuch der Physik (इंग्रजी भाषेत). 53: 275. Bibcode:1959HDP....53..275D.
  5. ^ a b बिन्नी, जे; Merrifield, M. गॅलॅक्टिक ॲस्ट्रॉनॉमी (Galactic Astronomy) (इंग्रजी भाषेत). Princeton.
  6. ^ a b de Vaucouleurs, Gérard (April 1963). "Revised Classification of 1500 Bright Galaxies". Astrophysical Journal Supplement (इंग्रजी भाषेत). 8: 31. Bibcode:1963ApJS....8...31D. doi:10.1086/190084.