मसूराकार दीर्घिका
दीर्घिकांच्या संरचनात्मक वर्गीकरणामध्ये मसूराकार दीर्घिका किंवा बहिर्गोल भिंगाकार दीर्घिका (Lenticular galaxy) लंबवर्तुळाकार आणि सर्पिलाकार दीर्घिकांच्या मध्ये असतात.[२] मसूराकार दीर्घिका सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे चपट्या तबकडीसारख्या असतात आणि त्यांनी जवळपास सर्व आंतरतारकीय माध्यम वापरलेले असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये नवीन ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग अतिशय कमी असतो.[३] तरीही त्यांच्या तबकडीमध्ये लक्षणीय प्रमाणात धूळ कायम राहू शकते. त्यामुळे लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे त्यांच्यामध्ये मुख्यत: जुने तारे असतात. त्यांच्यामध्ये सर्पिलाकार फाटे नसल्याने जर त्या फेस-ऑन कललेल्या असल्या तर त्यांच्यामध्ये आणि लंबवर्तुळाकार दीर्घिकांमध्ये फरक करणे अतिशय अवघड असते.
आकार आणि रचना
[संपादन]वर्गीकरण
[संपादन]मसूराकार दीर्घिकांमध्ये सपाट तबकडीसारखा घटकही असतो आणि ठळक तेजोगोलही असतो. त्यांच्यामध्ये स्पष्ट सर्पिलाकार फाटे नसतात, पण केंद्राजवळ भुजा असू शकते.
मसूराकार दीर्घिकांना सर्पिलाकार आणि लंबवर्तुळाकार दीर्घिकांमधील कमी आकलन असलेली संक्रमण अवस्था समजले जाते, ज्यामुळे त्यांना हबल अनुक्रमावर मध्यभागी ठेवले आहे. हे त्यांच्यामध्ये तबकडी आणि तेजोगोल हे दोन्ही घटक असल्यामुळे होते. तबकडीमध्ये कोणत्याही प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना नसते, त्यामुळे तिचे सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे वर्गीकरण करता येत नाही. तेजोगोल गोलाकार असल्याने लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे वर्गीकरण अयोग्य ठरते. त्यामुळे या दीर्घिकांचे त्यांच्यातील धूळीचे प्रमाण किंवा केंद्रीय भुजेचा ठळकपणा यावरून वर्गीकरण केले जाते. भुजा नसलेल्या मसूराकार दीर्घिकांचे प्रकार S01, S02 आणि S03 हे तीन प्रकार आहेत. यामध्ये पायथ्याशी असलेले अंक तबकडीमधील धूळ अवशोषणाचे प्रमाण दर्शवतात. त्याचप्रकारे भुजा असलेल्या मसूराकार दीर्घिकांचे प्रकार SB01, SB02 आणि SB03 असे आहेत.
भुजा
[संपादन]सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे मसूराकार दीर्घिकांमध्ये केंद्रीय भुजा असू शकते. जरी साध्या मसूराकार दीर्घिकांचे वर्गीकरण धुळीच्या प्रमाणाच्या आधारे केले जात असले तरी भुजायुक्त मसूराकार दीर्घिकांचे वर्गीकरण भुजेच्या स्पष्टतेनुसार करतात. या दीर्घिकांमधील भुजांचे सखोल संशोधन झालेले नाही. भुजांच्या गुणधर्मांचे आणि त्यांच्या निर्मितीचे आकलन मसूराकर दीर्घिकांची निर्मिती आणि उत्क्रांती समजण्यासाठी उपयुक्त ठरेल.
घटक
[संपादन]अनेक गोष्टींमध्ये मसूराकार दीर्घिकांतील घटक व त्यांची रचना लंबवर्तुळाकार दीर्घिकांसारखी आहे. उदा. दोघांमध्ये मुख्यत्वे जुने, लाल तारे असतात. या दीर्घिकांमधील सर्व तारे अंदाजे एक अब्ज वर्ष जुने असतात. याव्यतिरिक्त मसूराकार दीर्घिकांमध्ये गोलाकार तारकागुच्छांचे प्रमाण सारखी तेजस्विता आणि वस्तुमान असलेल्या सर्पिलाकार दीर्घिकांपेक्षा जास्त असते. त्यांच्यामध्ये रेण्वीय वायूचे प्रमाणसुद्धा अत्यंत कमी असते किंवा अजिबात नसते (म्हणून ताऱ्यांच्या निर्मितीचा अभाव असतो) आणि हायड्रोजन αचे प्रमाण किंवा २१-सेंमी उत्सर्जन कमी असते. लंबवर्तुळाकर दीर्घिकांच्या तुलनेत यांच्यामध्ये धुळीचे प्रमाण जास्त असू शकते.
निर्मिती सिद्धान्त
[संपादन]मसूराकार दीर्घिकांची तबकडीसारखी संरचना असे सुचवते की त्या फाटे नाहीसे झालेल्या क्षीण व निस्तेज सर्पिलाकार दीर्घिकांपासून तयार झाल्या. वैकल्पिकरीत्या, या दीर्घिका सर्पिलाकार दीर्घिकांपेक्षा जास्त तेजस्वी असल्याने त्या केवळ क्षीण सर्पिलाकार दीर्घिकांच्या अवशेष नाहीत असे सूचित होते. मसूराकार दीर्घिका दीर्घिकांच्या विलीनीकरणातून तयार झाल्या असाव्यात, ज्यामुळे त्यांच्या वस्तुमानात वाढ होते आणि नवीन दीर्घिकेला तबकडीसारखा फाटे नसलेला आकार मिळतो.[४] अलीकडील संशोधन असे सुचवते की, तेजस्वी मसूराकार दीर्घिकांच्या उत्क्रांतीचा लंबवर्तुळाकार दीर्घिकांशी आणि कमी तेजस्वी दीर्घिकांचा सर्पिलाकार दीर्घिकांशी जवळचा संबंध आहे.[५]
उदाहरणे
[संपादन]- कार्टव्हील दीर्घिका, शिल्पकार तारकासमूहातील ५० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील मसूराकर दीर्घिका
- एनजीसी २७८७, भुजायुक्त मसूराकार दीर्घिका
गॅलरी
[संपादन]-
हबल अनुक्रमातील S0 प्रकारची एमआरके ८२० ही मसूराकार दीर्घिका.
-
मेसिए ८४ ही मसूराकार दीर्घिका तिच्यातील महास्फोटासाठी प्रसिद्ध आहे.
-
एनजीसी ६८६१ या मसूराकार दीर्घिकेचा स्कॉटिश खगोलशास्त्रज्ञ जेम्स डनलॉप याने १८२६ साली शोध लावला.
संदर्भ
[संपादन]- ^ "अ गॅलॅक्सी इन ब्लूम (A galaxy in bloom)". 13 July 2015 रोजी पाहिले.
- ^ R. J. Buta, H. G. Corwin, Jr., S. C. Odewahn (2007s).
- ^ DeGraaff, Regina Barber; Blakeslee, John P.; Meurer, Gerhardt R.; Putman, Mary E. (December 2007). "A Galaxy in Transition: Structure, Globular Clusters, and Distance of the Star-Forming S0 Galaxy NGC 1533 in Dorado". The Astrophysical Journal. 671 (2): 1624–1639. Bibcode:2007ApJ...671.1624D. doi:10.1086/523640.CS1 maint: multiple names: authors list (link)
- ^ Blanton, Michael; John Moustakas (2009). "Physical Properties and Environments of Nearby Galaxies". Annual Review of Astronomy and Astrophysics. 47 (1): 159–210. arXiv:0908.3017. Bibcode:2009ARA&A..47..159B. doi:10.1146/annurev-astro-082708-101734.
- ^ Sidney van den Bergh. "Luminosities of Barred and Unbarred S0 Galaxies". The Astrophysical Journal. 754: 68. arXiv:1205.6183. Bibcode:2012ApJ...754...68V. doi:10.1088/0004-637X/754/1/68.