ढेकूण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Bed bug, Cimex lectularius (9627010587).jpg

ढेकूण हा निशाचर व रक्तशोषक कीटक आहे. मानवाखेरीज उंदीर, ससे, गिनीपिग, घोडे, गुरे व कोंबड्या यांना उपद्रव देतो. प्रौढ ढेकूण तांबूस तपकिरी, लांबट वर्तुळाकार, पसरट, ४ ते ५ मिलिमीटर लांब व वरवर पहाता पंखहीन असून त्याच्या सर्व अंगावर आखूड व दाट केस असतात. अगदी कमी वाढ झालेली, खवल्यांसारखी पंखांची पहिली जोडी फारच अस्पष्ट आणि अकार्यक्षम असते. ढेकणाला येणारा विशिष्ट अप्रिय वास हा त्याच्या गंध ग्रंथींतून निघालेल्या स्रावामुळे येतो.

रचना[संपादन]

नराचे उदर बरेच टोकदार असते व त्याच्या शेवटी आठव्या खंडाच्या (भागाच्या) डाव्या बाजूच्या खोल खाचेत मोठे वाकडे शिश्न असते. मादीच्या चौथ्या (किंवा पाचव्या) उदरखंडावर उजव्या बाजूला मैथुनकोष्ठ (पिशवी) असतो. याला रिबागा इंद्रिय म्हणतात. याच्या पलीकडे कोशिकीय (पेशीय) ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचा) पुंजका असतो, त्याला बर्लेस इंद्रिय म्हणतात. मैथुनाच्या वेळी नर रिबागा इंद्रियात शुक्राणू सोडतो व तेथून ते बर्लेस इंद्रियातून जाऊन जननमार्गात पोहोचतात.

== अंडी व पिले अनुकूल परिस्थितीत सुमारे २१ ते २३ अंश सेल्सिअस तापमान व भरपूर अन्नपुरवठा असताना दिवसाला ३ ते ४ या हिशोबाने मादी सरासरीने २०० किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते. १० अंश सेल्सिअस खालच्या तापमानात मादी अंडी घालीत नाही. उपासमार झालेली मादी अंडी घालणे बंद करते. अंडी लांबट, पांढरट, डोळ्यांनी सहज दिसतील एवढी मोठी असून त्यांच्या एका टोकाला स्पष्ट टोपी असते. ती फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत चिकटवून ठेवलेली असतात. ६ ते १७ दिवसांत अंडी फुटून त्यांतून पिले बाहेर पडतात. पिले प्रौढासारखी दिसतात पण फिक्या पिवळ्या रंगाची असतात. पाच वेळा कात टाकून पिलांना प्रौढावस्था प्राप्त होते. अनुकूल तापमानात पिलाला प्रौढावस्था प्राप्त होण्यास ४ ते ६ आठवडे लागतात. एका वर्षात ढेकणाच्या तीन किंवा त्यांपेक्षा जास्त पिढ्या होतात.

राहण्याच्या व लपण्याच्या जागा[संपादन]

दिवसा ढेकूण गाद्या, उश्या, कपाटे, फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत लपून बसतात. ते आगगाडीचे डबे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, हॉटेले, सैन्याच्या बरॅकी इत्यादी ठिकाणी विशेष आढळतात. रात्री तसेच दिवसाही अंधाराच्या जागी ते माणसाला उपद्रव देतात. माणसाचे रक्त शोषून घेतल्यावर ते आपल्या लपण्याच्या जागेत जाऊन बसतात व अन्नपचन करतात. अन्नपचनासाठी त्यांना बरेच दिवस लागतात. ढेकूण अन्नाशिवाय तीन महिन्यांपर्यंत जगू शकतात.

माणसाचे तापमान व त्याच्या बसण्याचा दाब या दोन संकेतांनी ढेकूण लपलेल्या फटीतून बाहेर येऊन माणसाला चावा घेतो. चावण्यापूर्वी तो लाला ग्रंथींचा स्राव चावण्याच्या जागेवर सोडतो व नंतर आपल्या शुंडाने (सोंडेसारख्या अवयवाने) छिद्र करतो. स्रावामुळे छिद्र करण्याची वेदना जाणवत नाही व रक्त शोषताना ते गोठत नाही. ढेकणाच्या चाव्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही. परंतु त्याच्या विषामुळे थोडीशी खाज सुटणे, आग होणे व गांधी येणे हे परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींत कमीअधिक प्रमाणात दिसून येतात. काही व्यक्तींत हे परिणाम एका आठवड्यापेक्षा जास्त काळही टिकतात. ढेकणामुळे विविध रोगांचा प्रसार होत असावा असे शास्त्रज्ञांना वाटते, परंतु अजून तसा सबळ पुरावा मिळालेला नाही.[१]

बंदोबस्त[संपादन]

ढेकणांच्या वसतिस्थानावर डीडीटी, क्लोरडान किंवा लिंडेन ही कीटकनाशके फवारून त्यांचा बंदोबस्त करता येतो. परंतु या कीटकनाशकांच्या फवारणीने ढेकूण मेले नाहीत; तर डायझिनॉन, मॅलॅथिऑन यांसारखी अधिक प्रभावी कीटकनाशके वापरावी लागतात. उकळते पाणी किंवा रॉकेल यांचा ढेकणांच्या अंड्यांवर परिणाम होत नाही.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ज.वि. जमदाडे. ढेकूण. मराठी विश्वकोश (आॅनलाईन ed.). मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्नकोश निर्मिती मंडळ. २५ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.