डच वखार (वेंगुर्ला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डच वखार महाराष्ट्राच्या वेंगुर्ला शहरातील डच ईस्ट इंडिया कंपनीने बांधलेली वखार आहे

स्थान[संपादन]

ही वखार कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. कोकण रेल्वेच्या गोवा, दक्षिण भारताकडे जाणाऱ्या आगगाडीने कुडाळ किंवा सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उतरून पुढे राज्य परिवहन महामंडळाच्या बसने वेंगुर्ला बाजार बसथांब्यावर उतरावे. तेथून पुढे बंदराकडे जाताना डाव्या बाजूला असणाऱ्या एका गल्लीत शेवटी ही वखार आहे.

इतिहास[संपादन]

युरोपीय व्यापाऱ्यांचे सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात आगमन झाले. त्यांनी आपला खरेदी विक्री केलेला माल सुरक्षित साठविण्यासाठी इमारती बांधल्या. ह्या इमारती म्हणजेच वखारी. ब्रिटिशांनी कलकत्ता,सुरत, मद्रास, मुंबई वगैरे ठिकाणी वखारी बांधल्या. डचांनी इ.स.१६०२ मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीमार्फत व्यापार वाढवून पहिली बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून लौकिक मिळविला.डचांनीही व्यापारी मालाची साठवणूक व संरक्षणासाठी भारतात वखारींची बांधणी केली. इ.स.१५६७ मध्ये डचांनी वेंगुर्ल्यात एक किल्ला बांधला.पहिली वखार त्यांनी इ.स.१६०५ मध्ये मच्छलीपट्टन येथे बांधली. त्यानंतर त्यांनी सुरत, चिनसुरा, कासिमबझार, पाटण,नेगापटम, कोचीन इत्यादी ठिकाणी वखारी बांधल्या.डच भारतात व्यापारी उद्देशाने आले होते त्यामुळे त्यांनी राजकीय कारणांसाठी वखारींचा उपयोग केला नाही.

वेंगुर्ला वखार[संपादन]

डचांनी इसवी सन १६३७ मध्ये विजापूरच्या सुलतानांकडून परवानगी घेऊन वेंगुर्ला येथे वखार बांधली. वखारीचा कारभार त्याकाळी थेट जकार्तामधून होई. सुरुवातीला इमारतीचा वापर मलबारच्या दिशेने जाणाऱ्या बोटींना मध्यवर्ती थांबा म्हणून केला जात होता आणि नंतर स्थानिक वस्तू, पदार्थ, उत्पादने यांचा व्यापार केला जाऊ लागला. ह्या इमारतीचे स्थापत्य युरोपीय पद्धतीचे आहे. डचांची निशाणी असलेल्या ह्या वखारीला इ.स.१६७४ पासून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. तिची देखभाल व दुरुस्ती दुर्लक्षित आहे. वखारीचे बांधकाम इ.स.१६३७ ते १६५५ पर्यंत चालले. किल्ल्यासारखे बुरूज असलेली ह्या वखारीच्या बांधकामाला त्याकाळी तीन हजार गिल्डर्स (नेदरलॅंडचे चलन) खर्च आला होता. त्याकाळात वखारीमध्ये मर्यादित तोफखाना होता.वखारीच्या सभोवताली कोरडा खंदक असून त्यावरून रहदारी करण्यासाठी अस्थायी साकव होता. इसवी सन१६३७ ते इसवी सन १८५० दरम्यान इमारतीच्या बुरूजांचे आकार बदलताना इमारतीचे क्षेत्रसुद्धा वाढविले. सभोवताली कुंपणाच्या आत कोठार, निवासी सदनिका, छोटासा दवाखाना इत्यादींचा समावेश होता. प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला लहान बाग आणि एक विहीर होती. डाव्या बाजूला काही मुस्लिम कबरी आणि माळी व नोकरांची घरे होती. वखारीची मुख्य इमारत उत्तर दक्षिण पसरलेली आयताकार आहे. पूर्वेला एक सामायिक व्हरांडा आहे. पूर्वेकडील दर्शनी भाग तीन कमानींमध्ये दोन खांबांवर विभागण्यात आला आहे. पश्चिमेकडे टी आकारात पायऱ्या आहेत आणि खाली छोटा खोलीवजा दवाखाना होता. सेवेकऱ्यांसाठी राहण्याची जागा होती तळमजल्यावर राहण्यासाठी सोय असावी.आतील भागात नक्षीदार गिलावा होता.वर भिंतीवर दिसणाऱ्या खोबण्यांवरून तिथे पोटमाळा असावा.पहिल्या मजल्यावरील खिडक्यांमधून सभोवतालचा परिसर दिसतो. इथून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अंरूद जिना आहे. इसवी सन १६८३ मध्ये औरंगजेबाच्या फौजांनी वेंगुर्ला शहरात हल्ला केला होता तेव्हा औरंगजेबाचा मुलगा अकबर ह्याने ह्या वखारीत आश्रय घेतला होता. इ.स.१७६६ च्या सुमारास वाडीकर सावंतांचा वेंगुर्ल्यावर अंमल झाला. नंतर ब्रिटिशांची सत्ता आली. इ.स.१८६२ नंतर वखार विनावापर राहिली आणि इथल्या इमारतीचे लाकडी भाग आणि इतर वस्तू चोरीला गेल्या. डचांची महाराष्ट्रात असलेली ही एक जीर्ण होत चाललेली वास्तू आहे.

संदर्भ[संपादन]

  • महाराष्ट्र टाईम्स, शनिवार ७ ऑगस्ट २०२१.