ठाणेश्वरची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ठाणेश्वरची लढाई ही पृथ्वीराज चौहानमुहंमद घोरी यांच्यातील ऐतिहासिक महत्त्वाची लढाई. ठाणेश्वर (स्थानेश्वर) हे हरयाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्राच्या पश्चिमेस आहे. १००८ मध्ये मुहंमद गझनीने पंजाबचा राजा अनंगपाळ याचा अटक (पाकिस्तान) येथे पराभव केल्यानंतर १०१४ मध्ये ठाणेश्वरवर स्वारी करून त्याने ते संपूर्ण लुटले. त्यानंतर ११९१ मध्ये दिल्लीचा महाराजा पृथ्वीराज चौहान व मुहंमद घोरी यांच्यात हिंदुस्थानावरील आधिपत्यासाठी प्रथम लढाई ठाणेश्वरच्या दक्षिणेस सु. २० किमी.वर असलेल्या तरौरी (तरावरी) गावाजवळ झाली.

या लढाईत राजपूत घोडदळांनी घोरीच्या घोडदळाच्या बगलांवर व समोरून हल्ले केले. पृथ्वीराजाचा बंधू गोविंदराय व मुहंमद घोरी यांच्यात द्वंद्व होऊन घोरी जखमी झाला व घोरीच्या सैन्याने पळ काढला. त्यामुळे हिंदुस्थान काबीज करण्याचा घोरीचा पहिला प्रयत्न फसला परंतु पुढे ११९२ मध्ये तरौरीजवळच पृथ्वीराज व घोरी यांच्यात पुन्हा लढाई झाली. त्यावेळी जयचंद राजपूत पृथ्वीराजाच्या सैन्यात सामील झाला नव्हता. घोरीने पृथ्वीराजाच्या सैन्यावर हुलकावणीचे हल्ले केले. परिणामतः राजपूत सेनेत गोंधळ उडाला व त्याच वेळी अफगाण घोडदळाने निकराचा हल्ला करून राजपूतांचा पराभव केला. त्यामुळे भारताहिंदूंच्या साम्राज्यसत्तेचा पूर्णतः मोड होऊन इस्लामी राज्यसत्ता प्रस्थापित झाली.