टिपऱ्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लाकडाच्या बारा ते चौदा इंच लांबीच्या रंगवलेल्या आणि क्वचित गोंडा लावलेल्या दंडगोलाकार काठ्यांना टिपऱ्या म्हणतात. दांडिया खेळात फेर धरून गरबा करताना टिपऱ्यांचा तालासाठी उपयोग होतो.[१]

इतिहास[संपादन]

टिपऱ्यांचा खेळ हा एक प्राचीन खेळ आहे. श्रीकृष्ण गोकुळात गोप-गोपींबरोबर टिपऱ्या खेळल्याची वर्णने आहेत. कृष्णाच्या टिपरी खेळावर मराठीत अनेक अभंग किंवा पोवाडे आहेत.
उदा०-खेळसी टिपऱ्या घाई रे | वाचे हरीनाम गाई रे |
टिपरीस टिपरी चुंकू जाता बाई |
पडसी यमाच्या घाई रे ||१||

सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे |
एका खेळा दोन्ही गुंतला | यमाजी घालील डोळा रे |
वाया खेळ खेळतोसी बाळा रे | सावध होईपाहे डोळा रे |
एका जनार्दनी शरण जाता |
चूकशील कळी काळा रे ||३||

या खेळात दहा – बारा माणसे फेर धरून नाचतात व नाचताना आपल्या डाव्या – उजव्या बाजूच्या नर्तकांच्या टिपरीवर आळीपाळीने आपल्या टिपरीचा आघात करतात. काही ठिकाणी खेळाच्या आरंभी दोन-दोन नर्तक एकमेकांकडे तोंड करून उभे राहतात व परस्परांच्या टिपरीवर आघात करून नाचू लागतात. या नाचाच्या विविध गती असून, त्या करताना वेगवेगळी गीते म्हणतात. त्यातील काही गीते अशी –

१) एक टिपरी घे दुसरीस मार गे,तिसरी घेऊन चौथीला |
पाचवी घेऊन साहवी फिर गे,सातवी बदल ||
२) राधाकृष्ण गे कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी |
३) हरीस खेळता आनंद चित्ता हरिगुण गाता,
अघटित रे | धावता धरणी न पुरे ||

या नृत्याला झांजा व ढोलके यांची साथ असते. कित्येकदा टिपऱ्यांच्या नाचाबरोबर नर्तक गोफही विणतात. टिपऱ्यांचा खेळ हा रासक्रीडेतलाच एक प्रकार आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड २
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड २