जॉर्ज एडवर्ड बेटमन सेंट्सबरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉर्ज एडवर्ड बेटमन सेंट्सबरी (२३ ऑक्टोबर १८४५-२८ जानेवारी १९३३). इंग्रजी साहित्याचा ख्यातनाम इतिहासकार. जन्म साउथॅम्पटन, हँपशर येथे. मेर्टन कॉलेज, ऑक्सफर्डमधून तो एम्. ए. झाला (१८६८) तथापि त्याला हवी असलेली मेर्टन कॉलेजची अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) न मिळाल्यामुळे निराश होऊन जवळपास दहा वर्षे त्याने शिक्षक म्हणून व्यतीत केली. शिक्षकी पेशात असतानाच त्याने फ्रेंच साहित्याचा अभ्यास सुरू केला. तसेच अकॅडमी  ह्या नियतकालिकात परीक्षणे लिहावयास आरंभ केला.

फॉर्टनाइटली रिव्ह्यू  ह्या नियतकालिकासाठी फ्रेंच कवी शार्ल बोदलेअर  ह्याच्यावर त्याने लिहिलेल्या समीक्षात्मक निबंधामुळे (१८७५) त्याने वाङ्‌मयक्षेत्राचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर लेखनावरच आपला चरितार्थ चालवण्याचे त्याने ठरवले. एन्‌सायक्लोपीडिआ ब्रिटानिका  मध्ये त्याने चरित्रात्मक नोंदी आणि फ्रेंच साहित्यावर एक लेख लिहिला (नववी आवृ. १८७५-८९). फ्रेंच साहित्यावर त्याने समीक्षात्मक लेखनही केले तथापि प्रायमर ऑफ फ्रेंच लिटरेचर (१८८०), ए शॉर्ट हिस्टरी ऑफ फ्रेंच लिटरेचर (१८८२) आणि स्पेसिमेन्स ऑफ फ्रेंच लिटरेचर फ्रॉम व्हीयाँ टू ह्यूगो  (१८८३) ह्या फ्रेंच साहित्यविषयक त्याच्या ग्रंथांना मोठे यश प्राप्त झाले. समकालीन फ्रेंच कादंबरीकारांवरही त्याने लेख लिहिले.

इंग्रजी साहित्यावरील त्याच्या विस्तृत समीक्षात्मक लेखनाचा प्रारंभ इंग्रज कवी जॉन ड्रायडन  ह्याच्यावरील लेखनाने झाला (१८८१). त्यानंतर इंग्रजी साहित्यावर त्याने बरेच लेखन केले. एसेज इन इंग्लिश लिटरेचर १७८०-१८६० (१८९०) मध्ये त्याने लिहिलेल्या अनेक निबंधांपैकी त्याचे वेचक निबंध संकलित करण्यात आलेले आहेत. १८९५ मध्ये एडिंबरो विद्यापीठातील इंग्रजी साहित्याच्या अध्यासनावर त्याची नेमणूक झाली. एडिंबरो विद्यापीठात असताना त्याने लिहिलेल्या ए शॉर्ट हिस्टरी ऑफ इंग्लिश लिटरेचर (१८९८) ह्या ग्रंथाला उत्तम प्रसिद्धी मिळाली. हिस्टरी ऑफ क्रिटिसिझम अँड लिटररी टेस्ट इन यूरोप फ्रॉम अर्लिएस्ट टेक्‌स्ट्स टू द प्रेझेंट डे (३ खंड, १९००-०४) हा त्याचा ग्रंथ त्यानंतर प्रसिद्ध झाला. आजही ह्या ग्रंथाचे मोल मोठे आहे. इंग्रजी साहित्यात काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या छंदःशास्त्रासारख्या क्षेत्रातही त्याने लक्षणीय कामगिरी बजावली. ह्यासंदर्भात हिस्टरी ऑफ इंग्लिश प्रोसोडी फ्रॉम द ट्‌वेल्फ्थ सेंचरी टू द प्रेझेंट डे (३ खंड, १९०६-१०), हिस्टॉरिकल मॅन्युअल ऑफ इंग्लिश प्रोसोडी (१९१०) हे त्याचे ग्रंथ त्या दृष्टीने निर्देशनीय आहेत.

विविध कालखंडांतील इंग्रजी साहित्यावर त्याने केलेले लेखन आजही महत्त्वाचे आहे. उदा., ए हिस्टरी ऑफ एलिझाबेदन लिटरेचर (१८८७), द फ्लरिशिंग ऑफ रोमान्स अँड द राइज ऑफ ॲलिगरी (१८९७), मायनर पोएट्स ऑफ द कॅरोलाइन पीरिअड (३ खंड, १९०५-२१). सर वॉल्टर स्कॉट आणि मॅथ्यू आर्नल्ड ह्यांसारख्या लेखकांवरही त्याने लिहिले. केंब्रिज ऑफ इंग्लिश लिटरेचर मध्ये त्याने २१ प्रकरणे लिहिली (१९०७-१६). त्याचे वाचन भरपूर होते आणि त्यातून त्याने मिळवलेल्या ज्ञानाचा भक्कम आधार त्याने लिहिलेल्या साहित्येतिहासविषयक लेखनाला आहे. साहित्याचा इतिहास लिहिताना साहित्यातील विविध प्रवाह आणि विकासाचे टप्पे त्याने दाखविले तथापि विषय आणि आशय ह्यांच्या पेक्षा शैलीची जाणीव त्याने जास्त जोपासली. त्याच्या लेखनाची शैली अनौपचारिक, संभाषणात्मक आणि जिवंत असल्यामुळे त्याच्या साहित्याची वाचनीयता वाढली. समीक्षाक्षेत्रात नवीन प्रणाली त्याने निर्माण केली नाही मात्र आस्वादकता हे त्याने समीक्षेचे प्रधान लक्ष्य मानले.

बाथ, समरसेट येथे तो निधन पावला.