Jump to content

जैव ऊर्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समुचित संपदा ईएलएफडी गॅसिफायर शेगडी

स्रोत[संपादन]

समुचित ट्रॅशफ्लॅशर कोळसा भट्टी

जैव ऊर्जा ही जैव स्रोतातून मिळवली जाणारी ऊर्जा होय. लाकडूफाटा आणि विविध स्वरूपातला सेंद्रीय कचरा ही जैव ऊर्जास्रोतांची उदाहरणे आहेत.

लाकूडफाटा व इतर कचरा थेट जाळून ऊर्जा मिळवता येते. पारंपरिक चुली हे याचे सर्वात प्रचलित उदाहरण आहे. मात्र या चुली अत्यंत अकार्यक्षम असतात, व त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. लाकूडफाटा व जैव कचरा यांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून विविध स्वरूपातील इंधनेही तयार करता येतात. जैव पदार्थांपासून ऊर्जा मिळवण्याचा हा दुसरा पर्याय आहे.

गॅसिफायर हे जैव ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्याच्या साधनाचे एक उदाहरण आहे. यामध्ये लाकूडफाटा किंवा सेंद्रीय कचऱ्याचे वूडगॅसमध्ये रूपांतर केले जाते, व मग हा गॅस जाळून उष्णता मिळवता येते (उदा. गॅसिफायर शेगड्या) किंवा या गॅसवर जनरेटर चालवून वीजनिर्मितीही करता येते.

वर्गीकरण[संपादन]

लाकूड जाळून पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी उष्णता मिळवता येणे, आणि त्या उष्णतेचा अन्न भाजण्यासाठी, ऊब मिळवण्यासाठी, रात्री प्रकाश मिळवण्यासाठी, इ. पद्धतीने वापर करणे ही माणसाकडून झालेल्या ऊर्जा निर्मिती व ऊर्जा वापराची पहिली उदाहरणे आहेत. त्या अर्थाने जैव ऊर्जा हा सर्वात पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. पण पारंपरिक या सदरात मोडणारे इतर ऊर्जास्रोत (उदा. दगडी कोळसा) नूतनक्षम किंवा अक्षय नाहीत. झाडे झुडपे मात्र मुळापासून काढून टाकली नाहीत, तर कितीही तोडली तरी पुन्हा वाढत रहातात. अर्थात त्यासाठी तोडण्याचा वेग आणि वाढण्याचा वेग यांच्यात संतुलन असावे लागते. पण शेतीसारख्या उद्योगात दरवर्षी नव्याने लागवड होतच असते, आणि पीक तयार झाले की त्याच्या उपयुक्त भागाबरोबरच (उदा. धान्य, कापूस, इ.) काडीकचराही (उदा. पाचट, तुराट्या, पराट्या, इ.) तयार होत असतो. त्यामुळे काडीकचऱ्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर हा नवीकरणीय या वर्गात मोडू शकतो. थोडक्यात म्हणजे लाकूडफाटा, काडीकचरा हे स्रोत जैवचक्रानुसार पुन्हा पुन्हा उपलब्ध होत असल्यामुळे जैव ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जा समजली जाते. तेव्हा जैव ऊर्जा हा पारंपरिक आणि तरीही नवीकरणीय असा एकमेव ऊर्जा स्रोत आहे.

जैव इंधने[संपादन]

खनिज इंधनांना नवीकरणीय असा थेट पर्याय जैव इंधनांमधून मिळू शकतो. घन, द्रव, व वायू या तिन्ही स्वरूपातील खनिज इंधनांना पर्यायी जैव इंधने उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर जैव इंधनांची निर्मिती करणे खर्चिक, अव्यवहार्य, आणि काही परिस्थितीत पर्यावरणासाठी हानीकारकही ठरू शकते. या दृष्टीने काडी कचरा म्हणून जाळून टाकल्या जाणाऱ्या जैव पदार्थांपासून जिथे उपलब्ध आहे तिथे, या पद्धतीने इंधनांची निर्मिती करण्याच्या काही सोप्या पद्धती जास्त उपयुक्त ठरतात. उदा. काडीकचऱ्यापासून कोळसा पावडर तयार करणे अतिशय सोपे आहे. अगदी आपल्या बागेतील कचऱ्याचा आपला आपण कोळसा बनवू शकतो. काडीकचऱ्याचा इंधन बनवण्यासाठी जेव्हा वापर केला जातो, तेव्हा त्यातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे घटक इंधनाचा भाग बनतात, तर वनस्पतींच्या अवशेषात मातीतून आलेले फॉस्फरस, पोटॅशिअम, इतर काही सूक्ष्मद्रव्ये हे घटक इंधन बनवण्याच्या प्रक्रियेतला कचरा म्हणून बाहेर पडतात. जमिनीत रासायनिक खत म्हणून घातले जाणारे हेच सारे घटक आहेत. त्यामुळे जैवभारापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत मागे रहाणारा कचरा हे एक चांगले खत बनते.

समुचित घरगुती बायोगॅस संयंत्र - शहरी घरांसाठी
समुचित घरगुती बायोगॅस संयंत्र - ग्रामीण घरांसाठी

बायोगॅस संयंत्र हे याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. खरकटे अन्न, अन्नप्रक्रिया उद्योगातील कचरा, शेण, काडीकचरा, अशा सर्व सेंद्रीय पदार्थांपासून कमी जास्त प्रमाणात बायोगॅस मिळवता येतो. या प्रक्रियेत बाहेर पडणारी मळी ही खत म्हणून वापरली जाते. किंबहुना बऱ्याच ठिकाणी बायोगॅस संयंत्राचा मुख्य उपयोग सेंद्रीय खत तयार करण्यासाठी केला जातो, व त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसकडे सह-फायदा म्हणून पाहिले जाते.

अर्थात नैसर्गिक शेतीच्या नव्या संकल्पनेनुसार काडीकचऱ्याचा अतिशय अल्प भाग खत म्हणून वापरून काम भागते. त्यामुळे उरलेला काडीकचरा जैव इंधनाचा स्रोत म्हणून वापरण्यात पर्यावरणाची हानी नाही.