चिपको आंदोलन
झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | conservation movement | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
| |||
![]() |
चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली.
ठेकेदार झाडं कापायला असंख्य माणसं घेऊन आला की ‘त्या’ झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या आणि ‘पेड कटने नही देंगे’च्या घोषणा द्यायच्या. एप्रिल १९७३ मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात ‘चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली. अलकनंदा खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यातून आंदोलन उभे राहिले. ‘दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे याच जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती, ती नाकारली गेली होती. त्यामुळे साहजिकच व्यापारी कंपनीला दिलेल्या परवानगीला लोकांनी विरोध केला. त्यातून ‘चिपको’ आंदोलन उभे राहिले. त्यात गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. गौरादेवीने गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात ‘चिपको’ आंदोलन सुरू केले.
जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार होते तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली. ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या. पण, एकीनीही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही. शेवटी मजूरांनी माघार घेतली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन होतं. पुढे हे आंदोलन ‘चिपको’ आंदोलन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दि.२१ मे २०२१ रोजी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोना ने निधन झाले.
इतिहास[संपादन]
बिश्नोईंचे हत्याकांड[संपादन]
इ.स. १७३०मध्ये जोधपूरच्या महाराज अभयसिंह यांनी राजवाडा बांधायचा ठरवले. त्यासाठी चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे होते. ते शोधताना जोधपूरपासून सोळाच मैलांवर बिश्नोईंचे खेजडली गाव होते. गावाजवळ खेजडीची मुबलक झाडी होती, जवळच चुन्याच्या खाणीही होत्या. राजाचे कामगार कुऱ्हाडी घेऊन खेजडलीला पोचले. बिश्नोई लोकांनी विरोध केला. संतप्त दिवाणाने हुकूम केला, "चला, झाडे तोडा.' सारे गावकरी विनवण्या करू लागले, "आमचा धर्म तुडवू नका, ही वृक्षसंपदा नासू नका." वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. त्यात गावातली अमृतादेवी आघाडीवर होती. सैनिकांच्या तलवारीने अमृतादेवीबरोबर गावातले ३६३ गावकरी मारले गेले. आणि बिश्नोईंचे जीव गेल्यावर राजाची मग्रुरी उतरली. तो खेजडलीला पोचला, माफी मागितली. यापुढे बिश्नोईंच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही, अशी हमी दिली.
गढवालची गौरीदेवी[संपादन]
अमृतादेवीचा कित्ता गढवालच्या गौरीदेवीने गिरवला. गढवालमधील रेनी गावाजवळची झाडे तोडण्यासाठी ठेकेदारची माणसे आली, तेव्हा गावातल्या पुरुषांना नुकसानभरपाई देण्याच्या आमिषाने चमोलीला नेण्याताले होते. गावात फक्त स्त्रियाच होत्या. गावातील महिला मंगल दलाची प्रमुख असलेली गौरीदेवी हिने गावतल्य बायकांना जमा केले आणि त्यांनी रात्रभर झाडांना चिपकून उभ्या राहिल्या हे ‘चिपको आंदोलन’ देशभर गाजले आणि गौरीदेवीमुळे समाजाला एक नवा आदर्श मिळाला.
किंकरीदेवी[संपादन]
एका दलित शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि वयाच्या १४ व्या वर्षी शामुराम या वेठबिगाराशी विवाहबद्ध झालेल्या किंकरीदेवीचे आपल्या परिसरातील निसर्गाशी, शेतमळ्यांशी आणि पहाडांशी घट्ट नाते जुळले होते. पतिनिधनानंतर उदरनिर्वाहासाठी वयाच्या २२ व्या वर्षी हातात झाडू धरावा लागलेल्या किंकरीदेवीला आपल्या भोवतालच्या परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे घडवले जाणारे बदल जाणवत होते. तेव्हा हिमाचलमधल्या पहाडांकडे चुनखडीच्या खाणींसाठी खाणमालकांची वक्र नजर वळली होती आणि हिमालयातील अस्थिर भूकवचाचा विचार न करता पहाड खोदायला सुरुवात झाली. या बेफाम खाणकामामुळे भूस्खलनाचे प्रकार वाढू लागले होते, जमिनीवरचे झाडांचे हिरवे छत्र तुटू लागल्याने जमिनीची धूप वेगाने होऊ लागली होती आणि त्यामुळे पहाडातील शेतीवर दुष्परिणाम होऊ लागले होते. निसर्गाचा हा विनाश पाहून किंकरीदेवी अस्वस्थ झाली आणि तिने याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली.
आपण एक कामगार आहोत, आपल्याला लिहिता-वाचताही येत नाही, आपण या मुजोर खाणमालकांविरुद्ध कसा लढा देऊ शकू, असा विचारही तिच्या मनात आला नाही. तिला ‘पीपल्स अॅक्शन फॉर पीपल इन नीड’ या स्थानिक ‘एनजीओ’ची मदत मिळाली आणि तिने सिमल्याच्या उच्च न्यायालयामध्ये एकाच वेळी ४८ खाणमालकांविरुद्ध जनहितार्थ खटला दाखल केला. मात्र सत्तेशी लागेबांधे असलेल्या खाणमालकांनी किंकरीदेवी हे सारं केवळ पैसे उकळण्यासाठी करते आहे आणि आम्ही निसर्गाची हानी करत नाही, असा दावा केला. न्यायालयात जेव्हा खटला सुनावणीसाठी येईना, तारखांवर तारखा पडू लागल्या तेव्हा न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी किंकरीदेवीने न्यायालयाबाहेर आमरण उपोषण आरंभले आणि तब्बल १९ दिवसांनंतर न्यायालयाने किंकरीदेवीच्या केसची दखल घेतली, पण तोपर्यंत किंकरीदेवीचे नाव केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातील प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले होते.
किंकरीदेवीने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हिमाचलमधील खाणकामावर तत्कळ स्थगिती आणली आणि संपूर्ण हिमाचल प्रदेशात पहाडांमध्ये ब्लास्टिंग करण्यावर ब्लॅंकेट बॅन आणला. काही वर्षांनंतर खाणमालक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले आणि १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावत उच्च न्यायालयाच्याच निर्णयावर शिक्कामोर्बत केले. आपल्या परिसरातील निसर्ग वाचवण्यासाठी किंकरीदेवीने दिलेला लढा तत्कालीन अमेरिकेची फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांच्या कानावर गेला आणि त्यांनी चीनमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला, किंकरीदेवीला तिची गोष्ट सांगण्यासाठी आणि जगभरातील स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी आमंत्रित केले. १९९५सालच्या पेकिंग येथे भरलेल्या त्या ४थ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचा आरंभ करताना, अमेरिकेची (तत्कालीन) फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन आणि म्यानमारच्या आंग सान स्यू की यांच्या उपस्थितीत किंकरीदेवीने दीपप्रज्वलन केले.
थिमक्का[संपादन]
नॅशनल सिटिझन अॅवॉर्डने गौरवलेल्या कर्नाटकातील थिमक्का यांना ‘साळुमरदा’ (झाडांची रांग) या टोपणनावानेच ओळखतात. हुळिकळ गावातल्या थिम्मक्काने आपला पती चिक्कय्याच्या मदतीने भोवतालच्या चार किलोमीटरच्या परिसरात एकूण ३८४ वडाची झाडे लावून ती जगवली आहेत. पोटी मूलबाळ नसलेल्या थिम्मक्काने या झाडांची काळजी स्वतःच्या मुलांसारखी घेतली, प्रसंगी चार चार किलोमीटरवरून पाणी आणून घातले. आज हुळिकळ ते कुडूर हा महामार्ग थिम्मक्काने लावलेल्या वटवृक्षांच्या छायेखाली झाकला गेलेला आहे. २०१६ मध्ये ‘बीबीसी’ने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील शंभर प्रभावशाली आणि प्रेरणादायी स्त्रियांच्या यादीत थिम्मक्काचा समावेश केला होता.हे आंदोलन अहिंसक आंदोलन म्हणून ओळखले जाते.
संदर्भ[संपादन]
दै.सकाळमधील लेख Archived 2016-03-04 at the Wayback Machine.