चर्चा:द टेस्टामेंट्स
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा -- अभय नातू (चर्चा) ००:१३, १७ मार्च २०२४ (IST)
cc: @Sane864:
द टेस्टामेण्टस् ज्येष्ठ कॅनेडियन लेखिका मार्गारेट ॲटवूड यांची २०१९ सालचा मॅनबुकर पुरस्कार प्राप्त इंग्रजी कादंबरी. यापूर्वी २००० साली द ब्लाइंड ॲसेसिन या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. परीक्षक मंडळाने नियमांना बगल देऊन मार्गारेट अॅटवूड आणि आफ्रो-ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो यांच्या पुस्तकांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर केला. १९८५ साली ॲटवूड यांची द हँडमेड्स टेल ही सुप्रसिद्ध कादंबरी प्रकाशित झाली होती. ही कादंबरी डिसटोपिअन अर्थात नजीकच्या काळात येऊ घातलेल्या वाईट भविष्याचे चित्रण करते. या पुस्तकाला देखील बुकरचे नामांकन मिळाले होते. या कादंबरीत पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवर होणारे अनन्वित लैंगिक अत्याचार तसेच स्त्रीचा उपयोग केवळ पुनरुत्पादनासाठीच केला जातो यावर प्रकाश टाकलेला आहे. ही कादंबरी प्रचंड गाजली. याच कादंबरीचा उत्तरार्ध द टेस्टामेण्ट्स या कादंबरीमध्ये मांडला गेला आहे. द टेस्टामेण्ट्स या कादंबरीत सत्तासंघर्ष व लिंग भेदावर परखड भाष्य केले आहे. अॅटवूड या बुकर पुरस्कार पटकावणाऱ्या सर्वात वयोवृद्ध विजेत्या आहेत.
मार्गारेट ॲटवूड यांच्या लेखनाचा परीघ हा बहुआयामी आहे. महिलांवरील अत्याचार व त्यांच्या समस्या, कॅनडाचा इतिहास, पर्यावरण, विज्ञान आणि त्यातील कल्पना, प्राण्यांचे अधिकार, राजकारण अशा विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यशैलीच्या कट्टर विरोधक म्हणूनही ॲटवूड यांची ओळख आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर द हॅण्डमेड्स टेल या पुस्तकाचा खप वाढल्याचा दावा ॲटवूड यांनी केला होता. ॲटवूड यांच्याकडून प्रेरणा घेत २०१७ साली कॅनडामध्ये ‘द हॅण्डमेड्स कोअलिशन’ या राजकीय गटाची स्थापना करण्यात आली. ॲटवूड या पटकथा लेखकही आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांवर अनेक चित्रपट, मालिका तयार झाल्या आहेत.
२०१७ साली द हॅण्डमेड्स टेल या कादंबरीवर आधारीत मालिका प्रदर्शित झाली. याचा पुढील भाग कसा असेल याबद्दल लोकांच्या मनातील उत्सुकता द टेस्टामेण्ट्स या कादंबरीच्या रूपाने संपणार होती. त्यामुळे द टेस्टामेण्ट्स ही कादंबरी प्रकाशनापूर्वीच बहुप्रतीक्षित होती. या कादंबरीत तीन वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांचे आत्मकथन एकत्र गुंफलं आहे. ऑंट लिडीया अॅग्नेस आणि डेझी या अनुक्रमे गीलियड आणि कॅनडात राहणाऱ्या तरुणींची निवेदने यात येतात. या तीनही स्त्रिया जुलमी रिपब्लिक ऑफ गीलियड या राष्ट्राला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतात. कादंबरीतील पहिली निवेदिका लिडिया आपलं आत्मकथन ‘आर्डूवा हॉल होलोग्राफ’ या शीर्षकाखाली लिखित स्वरूपात मांडते तर अन्य दोन निवेदिका आपले आत्मवृत्त मौखिक स्वरूपात मांडतात. ऑंट लिडिया आपल्या पूर्वायुष्यातील तिच्या न्यायाधीशाच्या पेशाबद्दल लिहिते. अमेरिकेचे प्रस्थापित सरकार पाडून ख्रिश्चन धर्मावर आधारित रिपब्लिक ऑफ गीलियडची निर्मिती होते. बायबलचा आधार घेऊन तरुण स्त्रिया शासकीय अधिकाऱ्याना लैंगिक भूक भागवण्यासाठी गुलाम म्हणून वाटण्यात येतात. स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होतात. त्यांना शिक्षण व अन्य मानवी हक्क नाकारून मुलं जन्माला घालणारी वस्तू म्हणून वागवण्यात येते. गीलियड मध्ये वजनदार असलेला कमांडर ज्युड ऑंट लिडियाला गीलियड साम्राज्यात स्त्रियांचे शोषण करण्यासाठी मदत करायला सांगतो. जिवाच्या भीतीने ती होकार देते; मात्र मनातून हे साम्राज्य नष्ट करण्यासाठी व्यवस्थेत राहूनच छुप्या पद्धतीने ही व्यवस्था पोखरण्यासाठी सिद्ध होते.
कादंबरीतील दुसरी नयिका अॅग्नेस जेमिमा ही गीलियड साम्राज्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेली आहे. तिचं आनंदी बालपण आईच्या मृत्यूनंतर विस्कटतं. ती मोठी होत असतानाच गीलियड साम्राज्यात स्त्रियांवर होणारे अनन्वित अत्याचार आपल्या डोळ्याने पाहते. घरातील बाळाला जन्म देताना हँडमेडचा झालेला मृत्यू जवळून अनुभवते. अॅग्नेसची सावत्र आई तिचं लग्न कमांडर ज्युडबरोबर लावून द्यायचं ठरवते. अॅग्नेसचा याला विरोध असतो. लीडियाची व तिची एक दिवशी भेट होते. लिडियाच्या सांगण्यावरून ती ऑंट बनते. ऑंट बनल्यावर तिची त्या लग्नापासून सुटका होते. तिला अन्य स्त्रियांना निषिद्ध असलेलं लेखन व वाचन करता येतं. गीलियड साम्राज्य हे म्हणायला धार्मिक असून बायबलच्या अनेक तत्त्वांची पायमल्ली करून फक्त काही निवडक सत्ताधीशांच्या हातातील बाहुलं बनलं आहे हे तिला उमगतं. गीलियड सत्ताधीशांच्या भ्रष्टाचार व ऱ्हास पावलेल्या नैतिकतेचे पुरावे तिला मिळतात.
कादंबरीतील तिसरी निवेदिका डेझी आहे. ती कॅनडातील टोरंटो इथे वाढली. तिचे पालक मेलानी व नील हेगीलियड साम्राज्याच्या भ्रष्टाचाराची पुरावे जमा करण्यासाठी मेडे या संघटनेचे कॅनडामध्ये पेरलेले हस्तक असतात. गीलियड साम्राज्यात होणाऱ्या मानवी हक्कांच्या पायमल्ली विरुद्ध आयोजित एका मोर्चामध्ये डेझी सहभागी होते. मोर्चाला हिंसक वळण मिळते व तिच्यावर हल्ला होतो. त्यातून तिला अॅडा नावाची एक मध्यमवयीन स्त्री वाचवते. डेझीच्या १६ व्या वाढदिवशी तिचे पालक एका अपघातात मरण पावतात. अॅडाच्या मदतीने डेझी मेडे या संघटनेच्या लोकांपर्यंत पोहोचते. ही संघटना गीलियड साम्राज्यातील मानवी हक्काच्या पायमल्लीला वाचा फोडणारी संघटना आहे. डेझीला कळतं किती तिचे खरे पालक मेलडी व नील नसून ती गीलियडमध्येच जन्माला आली होती. या जुलमी वातावरणातून मोकळ्या वातावरणात जीवन जगण्यासाठी तिला एका दाईने कॅनडामध्ये छुप्या पद्धतीने आणले होते. गीलियडचे जुलमी साम्राज्य पाडण्यासाठी कुठल्यातरी मार्गाने तिथे प्रवेश करणे आवश्यक होते. ती गीलियड मध्ये प्रवेश करते व तिची अॅग्नेस व लिडिया यांच्याशी भेट होते. लिडिया डेझीच्या दंडावर गीलियड मधील भ्रष्टाचाराच्या माहितीचा दस्तऐवज असणारा मायक्रोडोट म्हणून देते. ही गुपित कागदपत्र व पुरावे घेऊन अॅगनेस व डेझी कशाबशा बाहेर पडतात व कॅनडामध्ये येतात. पुराव्यांच्या आधारे गीलियड साम्राज्य सत्तेतून बाहेर पडतं. कादंबरीच्या शेवटच्या भागात एक प्राध्यापकाला पिक्सोटो या तीनही निवेदिकांनी लिहिलेल्या आत्मकथनांचा अभ्यास करताना दाखवले आहे
गिलियड या शोषणाधारित दडपशाही राजवटीची अंतर्गत उतरंड कशी काम करते; तिच्या दडपणासमोर मान तुकवताना, सत्तेसाठी झगडताना, सत्ता मिळवताना, वापरताना, पेलताना माणसांची जडणघडण कशी होत जाते; इतर सामाजिक संस्थांमध्ये विकृती कशा प्रवेश करतात; माणसे स्वतःशी कोणकोणत्या तडजोडी करतात आणि आपल्या सदसद्विवेकबुद्धीला कसकशी सामोरी जातात आणि तरीही माणसे माणसांइतकीच भली नि स्खलनशील कशी उरू शकतात, अशा अनेकानेक प्रश्नांचा थक्क करणारा वेध या कादंबरीत घेतला जातो. कादंबरीच्या शेवटाकडे गिलियडच्या अंताची सुरुवात आहे. शेवटाकडे येताना कादंबरी काहीशी चित्तथरारक, घटनाप्रधान आणि वेगवाग होत गेली आहे. पण कथाभागाला एखाद्या कुमारवयीन साहसकथेचे अविश्वसनीय व सुलभीकृत रंग आहेत. सध्याच्या समाज-विकृतींच्या विज्ञानाचे अचूक वर्णन या कादंबरीमध्ये आले आहे. अशा पद्धतीचे विस्तृत परीक्षण या कादंबरीसंदर्भात समीक्षकांकडून करण्यात आले आहे. द टेस्टामेण्ट्स म्हणजे एक उत्तम आणि दमदार असा उत्तरार्ध मांडणारी कादंबरी असून एखाद्या गोथिक कादंबरीला साजेशी असणारी व कथानकला अनेक अनपेक्षित वळणे देऊन वाचकांचा श्वास रोखून धरणारी आहे. स्वतः लेखिकेच्या मते या कादंबरीचा मूळ गाभा हा भविष्याबद्दल आशादायी चित्र निर्माण करणे असा आहे. असेही मत समीक्षकांनी या कादंबरीबद्दल व्यक्त केले आहे. या कादंबरीला २०२० सालच्या ब्रिटिश बुक अॅवार्ड साठी नामांकन मिळाले होते.