चंदूकाका जगताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंदूकाका जगताप (१९४८ - २८ जानेवारी, २०१८) हे पुणे जिल्ह्यातील राजकारणी होते. हे सासवडचे रहिवासी असून सासवड नगरपरिषदेचे ते १९८५ ते १९९२ व पुन्हा २००२ ते २००७ या काळात ते नगराध्यक्ष होते. १९८५ सालापासून सतत सात वेळा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. २००४मध्ये सात महिन्यांसाठी ते पुणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून गेले. तर २००८पासून तीन वर्षांसाठी ते राज्य सहकार परिषदेचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]

सासवडमध्ये त्यांनी संत सोपानकाका बँकेची, तर खळद येथे पुरंदर मिल्क या उद्योगाची स्थापना केली. सासवडचे श्री शिवाजी शिक्षण मंडळ आणि पुरंदर नागरी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. वीर धरणातून सासवडसाठी झालेली पाणी योजना त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात पूर्ण झाली.[ संदर्भ हवा ]

कौटुंबिक माहिती[संपादन]

जगताप यांचे लहानपण गरिबीत गेले. सासवडच्या माजी नगराध्यक्षा आणि नगरपरिषदेच्या गटनेत्या आनंदीकाकी जगताप या चंदूकाकांच्या पत्नी होत, तर पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आणि पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे पुत्र तर राणी व सोनल या दोन मुली होत. माजी वनमंत्री पतंगराव कदम हे जगतापांचे व्याही होत.[ संदर्भ हवा ]

चंदूकाका जगतापांची कार्यक्रमात धक्काबुक्की आणि निषेध[संपादन]

सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीने ९-१२-२०१६ रोजी सासवडच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन प्रांगणात घेतलेल्या एका खुल्या चर्चेच्या कार्यक्रमात चंदूकाका जगताप यांनी सेना लोकमित्र जनसेवा विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेश विजय दळवी यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालेला हा प्रकार सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.[ संदर्भ हवा ]

चर्चेच्या वेळी चंदूकाका जगताप यांनी उशिरा येऊन डॉ. राजेश विजय दळवी यांना खांद्याला ढकलून गालावर थपडी मारत बाजूला केले. दळवींना बाजूला करून जगताप यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशेजारील जागा मिळवत अरेरावी केली. हा प्रकार कॅमेऱ्यात चित्रबद्ध होत आहे याचे भान राखून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जनमत आघाडीचे प्रमुख संजय जगताप यांनी चंदूकाकांना बाजूला जाण्याचा व काही न बोलण्याचा सल्ला दिला.[ संदर्भ हवा ]

‘सासवड शहरात तुमच्या आघाडीची १५ वर्षे सत्ता असून विकासकामे झाली नाहीत. उलट तुमची दहशत व गुंडगिरी मोठ्या प्रमाणात आहे,’ असा प्रश्न निवेदकाने विचारला असताना त्याच वेळी वरील प्रकार घडला. त्याच्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या प्रकारानंतर राष्ट्रीय चर्मकार समाज संघटनेच्या वतीने चंदूकाका जगताप आणि संजय जगताप यांच्या जनमत विकास आघाडीच्या निषेधार्थ लेखी पत्रके प्रसिद्ध करून शहरभर जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.[ संदर्भ हवा ]