गोविंद नारायण माडगांवकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोविंद नारायण माडगांवकर (इ.स. १८१५ - १५ मार्च, इ.स. १८६५) हे एक मराठी लेखक होते. त्यांचा जन्म पोर्तुगीज भारतात गोवे प्रांतातील माडगांवजवळच्या पेरी या गावी झाला.

जीवन[संपादन]

गोविंद माडगांवकर यांचे वडील नारायणराव हे पेरी येथे पोर्तुगाली तपकीर विकून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. कुटुंबाचा निर्वाह होणे त्याठिकाणी कठीण झाल्याने इ.स. १८२४ साली म्हणजेच गोविंदच्या वयाच्या नवव्या वर्षी ते मुंबईला आले व तिथे त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. मुंबईत गोविंदांचे वडील सचोटीने चोख व्यवहार करीत त्यामुळे व्यापारी, गिर्हाईके व इतर लोकात त्यांची चांगली पत होती परंतु इ.स. १८३३ साली त्यांचा अंत झाल्याने कुटुंबपोषणाचा सगळा भार व जबाबदारी अल्पवयातच गोविंदांच्या अंगावर पडली. गोविंदजींचे बहुतेक मराठी व इंग्रजी शिक्षण मुंबईतच झाले. वडीलांच्या निधनाने त्यांचा शाळेतला अभ्यासक्रम सुटला व त्यांना उदरनिर्वाहाच्या मार्गास लागणे भाग पडले.

मुंबईतच विल्सन यांच्या मिशनरी शाळेत त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. पुढे अखंड तीस वर्षे त्यांनी तिथेच अध्यापनाचे काम केले. शिकवण्याची आणि शाळेच्या देखरेखीची दगदग झेपेना म्हणून इ.स. १८६३ साली गोविंदजींनी आपले मिशनरी शाळेतील काम सोडले. नंतर २८ जानेवारी, इ.स. १८६४ रोजी त्यांचा शाळेतील शिष्यवर्ग आणि मित्रमंडळी यांनी त्यांना मानपत्र आणि दोन हजार रूपयांची थैली देऊन त्यांचा मोठा गौरव केला. दिनांक १५ मार्च, इ.स. १८६५ रोजी वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

लेखन[संपादन]

 • अचाट खाणे मसणात जाणे
 • अति सर्वत्र वर्जयेत्
 • अन्न
 • उद्भिजन्य पदार्थ
 • कापूस
 • कावळ्याचा घरटा व मधाचे पोळे
 • द्रव्येण सर्वे वशा:
 • बळी तो कान पिळी
 • भरतखंडातील कारागीर
 • मुंबईचे वर्णन (दोन नकाशांसह)
 • रेशमी रुमाल
 • ऋणनिषेधक बोध
 • कुटुंबसुधारणा

 • दारूपासून अनर्थ
 • नीतिसंवाद
 • पत्रावळी व द्रोण
 • भोजनबंधू पानतंबाखू
 • यत्नेन किं दुर्लभम्
 • लोखंडी सडकांचे चमत्कार
 • वृक्षवर्णन
 • व्यवहारोपयोगी नाटक
 • शुचिर्भूतपणा
 • सत्यनिरूपण[टीप १]
 • सुलेखनविद्या
 • सृष्टीतील चमत्कार
 • हिंदु लोकांच्या रीति सुधारण्याविषयी बोध

वरील ग्रंथांपैकी उद्भिजन्य पदार्थ व सत्यनिरूपण या दोन्हींचे गुजराती भाषेत भाषांतर करुरू त्यांनी प्रसिद्ध केले. याव्यतिरिक्त वासुदेव कृष्ण महाले यांनी लिहिलेला 'रोम शहराचा इतिहास' त्यांनी तपासून शुद्ध केला. 'ज्ञानप्रसारक' नावाच्या मासिकातही त्यांचे अनेक लेख छापले गेले होते.

गोविंद नारायण माडगांवकर यांचे इ.स. १८६३ साली प्रसिद्ध झालेले ‘मुंबईचे वर्णन' हे पुस्तक असे आहे की, ते कधीही काढून वाचत बसावे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती शंभर वर्षांनी म्हणजे इ.स. १९६१ साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने जेव्हा काढली, तेव्हा त्याला प्रस्तावना लिहिणार्‍या न.र. फाटक यांनी दुसरी आवृत्ती येण्यासाठी शंभर वर्षे जावी लागली' याबद्दल खेद व्यक्त करून म्हटले होते, ‘माडगावकरांनी मराठी वाङ्‌मयासंबंधात स्वतःच्या काळातले जे दैन्य वर्णिले आहे, ते चालू वाङ्‌मयाच्या एक दोन शाखा सोडल्या आणि काही व्यक्ती वगळल्यास आजदेखील कायम आहे असेच दिसून येते.'[१]


सु.रा. चुनेकर आणि स.गं. मालशे यांनी माडगांवकरांच्या संकलित वाड्मयाचे संकलन केले आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ मुकुंद टाकसाळे (६ मे २००२). "सक्काळी सक्काळी: छापील पुस्तकाचा धसका" (मराठी मजकूर) (गुगल आवृत्ती.). लोकसत्ता. २३ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. 


तळटीपा[संपादन]

 1. ^ मुंबई कौन्सिलचे सभासद जॉन किनोबी यांनी ऑक्टोबर, इ.स. १८५१ साली बक्षिसासाठी ग्रंथ मागितले होते, त्यात या ग्रंथाला बक्षीस मिळाले. या ग्रंथाच्या शेवटी ग्राहकांची जी यादी दिली आहे त्यावरून गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड, चीफ जस्टिस अकीन पेरी, मेजर ली ग्रॅड जेकब, सर जमसेटजी जीजीभाई यांनी या ग्रंथाच्या प्रत्येकी वीस-वीस प्रती घेतल्या, असे दिसते..