गुंतवणूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुंतवणूक म्हणजे स्वतःचे किंवा आपल्या व्यवस्थापनाचे जास्तीचे पैसे अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने बँकेच्या स्वाधीन करणे वा दुसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला त्याच्या उद्योगासाठी देणे.

या दुसऱ्या उद्योगाला होणाऱ्या नफ्याचा हिस्सा गुंतवणूकदाराला व्याजाच्या, लाभांशाच्या किंवा बोनसच्या रूपात मिळतो.

हा दुसरा उद्योग आपल्याच मालकीचा असावा असे नाही. गुंतवणुकीचा उद्देश अधिक उत्पन्न मिळवणे हा असला तरी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक उत्पन्न मिळेलच असे नाही. जिथे गुंतवणूक केली त्या उद्योगाला फायदा झाला नाही तर आपली गुंतवणूक किमान काही काळासाठी व्यर्थ जाऊ शकते.

गुंतवणुकीचे प्रकार[संपादन]

१) कंपन्याचे भाग भांडवल

२) मुच्युअल फंडाचे वा युनिट ट्रस्टचे युनिट्स

३) बँकातील चालू वा बचत खाती किंवा मुदतीच्या ठेवी

४) पतपेढ्या, चिट फंड, क्रेडिट सोसायट्या यांतील ठेवी

५) भिशी योजना

६) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजना

७) पोस्ट खात्यातील विविध अल्पबचत योजना

८) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

९) प्रॉव्हिडंट फंड

१०) वैयक्तिक विमा योजना

११) सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले कर्जरोखे


म्युचुअल फंड[संपादन]

म्युचुअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडाचे प्रबंधक पुष्कळ गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात व तो विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध किंवा बाजारातील अन्य विकाल्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात. यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते. संयुक्तरीत्या म्युचुअल फंडाकडून जो पैसा सांभाळला जातो त्यास सहसा खाते (पोर्टफ़ोलिओ) असे संबोधतात. प्रत्येक युनिटमध्ये गुंतवणूकदारांची समान मालकी असतेच, शिवाय जे उत्पन्न ही संपूर्ण रक्कम तयार करते त्यातही असते. म्युचुअल फंडांची त्यांच्या रचनेनुसार विभागणी होते. खुल्या योजना नेहमीच युनिटची विक्री व खरेदी करीत असतात. जेव्हा फंड विकतात तेव्हा  गुंतवणूकदार खरेदी करतात आणि जेव्हा गुंतवणूकदार पैसा काढतात, तेव्हा हे फंड पुन्हा युनिटची खरेदी करतात. खरेदी किंवा पैसे काढणे हे सर्व एकूण मालमत्तेच्या किमतीवर आधारीत असते.

म्युचुअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण करू शकता. शिवाय जोखीम देखील थोडी कमी होते.

म्युचुअल फंडाची ठळक वैशिष्ठे :[संपादन]

  • तज्ञांकडून व्यवस्थापन- पैसा हा नेहमी त्या फंडाच्या प्रबंधकाकडून गुंतविला जातो.
  • विकेंद्रीकरण- विकेंद्रीकरण ही एक गुंतवणुकीची अशी युक्ती आहे ज्यामुळे संपूर्ण पैसा एकाच टोपलीत ठेवला जात नाही. जसे , सर्व अंडी एकाच पिशवीत असायला नकोतअसे म्हणतात !!
  • म्युचुअल फंडाच्या माध्यमातून शेअरची मालकी घेतल्यामुळे स्वतःचे शेअर किंवा रोखेपत्र यांच्यातील जी जोखीम असते ती विभागली जाते.
  • स्वस्त माध्यम- हे फंड एकाच वेळेस खूप शेअर्स विकत अथवा खरेदी करत असल्यामुळे जी काही व्यवहार किंमत असते, ती एखादया एकट्या व्यक्तीने केलेल्या व्यवहाराच्या तुलनेत अतिशय कमी येते .
  • रोख उपलब्धता- जशे शेअर, म्युचुअल फंडाचे युनिट विकून लागलीच रोख रक्कम प्राप्त होऊ शकते.
  • म्युचुअल फंडाचे युनिट घेणे सोपे आहे. पुष्कळ बँका त्यांचे स्वतःचे म्युचुअल फंड उपलब्ध करून देतात व  गुंतविण्याची रक्कम देखील लहान असते.

गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवण्यापूर्वी या सर्व बाबींचा नीट अभ्यास करूनच पैसे गुंतवायला हवेत.

म्युचुअल फंडांचे प्रकार :[संपादन]

प्रत्येक म्युचुअल फंडाचे गुंतवणुकीचे एक पुर्वनिश्चित असे उद्दिष्ट असते. ज्यात त्या फंडाचे पैसे कुठल्या प्रकारच्या प्रकारात व कशा योजनांनी गुंतविले जाणार हे ठरले असते. म्युचुअल फंडाचे खालील प्रकार आहेत.

  • खुले फंड( open ended ) : अशा फंडांची कोणतीही परिपक्वता तारीख नसते.
    • गुंतवणूकदार खुल्या फंडांचे युनिट खरेदी अथवा विक्री संपत्ति प्रबंधन करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या गुंतवणूक सेवा केंद्रावरून किंवा शेअरबाजाराच्या माध्यमातून करू शकतात.
    • खरेदी किंवा विक्री मूल्य हे नेहमी म्युचुअल फंडाच्या एकूण मालमत्ता किंमतीवर आधारित असते.
  • ठराविक काळात बंद होणारे फंड ( close ended ):  हे फंड विशिष्ट कालावधीसाठीच चालतात.
    • एका परिपक्वता तिथीला सर्व युनिटचे पैसे परत मिळतात व योजना बंद होते.
    • याचे युनिट शेअरबाजारात नोंदणी होतात. जेणे करून रोख रक्कम पुरविता येणे सोपे होते.
    • गुंतवणूकदार, याचे युनिट शेअर बाजारातील चढाव – उतारानुसार विकत घेऊ शकतात किंवा विकू शकतात.
  • रोखेबंध फंड (BOND FUND) : एक स्थिर उत्पन्न देण्याचा प्रयत्न या प्रकारात होतो.
    • गुंतवणूक ही सहसा शासकीय व वित्तीय ऋण पत्रात असते.
    • जरी फंडाची किंमत वाढली तरी, ह्याचे मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना स्थिर पैसा पुरवणे हेच आहे.
  • समतोल फंड (BALANCED FUND) :  सुरक्षा, उत्पन्न व भांडवलात वाढ असा समतोल या तिघांच्याही संयुक्ताने यात सांभाळता येतो. योजना हीच असते कि, निश्चित उत्पन्न देणारे विकल्प व शेअर्स यात संयुक्तपणे गुंतवणूक करणे.
  • रोखे/ शेअर :  फंडगुंतवणूक ही शेअर व रोख्यांमधे असते.
    • म्युचुअल फंडाच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करतो.
    • गुंतवणुकीचे मुख्य उद्देश दिर्घावधीत भांडवलाची वाढ व त्याच बरोबर उत्पन्नात देखील वाढ करणे.
    • विविध प्रकारचे शेअर फंड असतात कारण की, विविध प्रकारचे गुंतवणुक विकल्प उपलब्ध असतात.
  • वित्तीय बाजार फंड : अतिशय कमी कालावधीत निश्चित उत्पन्न देण्यात येणाऱ्या साधनांमधे गुंतवणूक केली जाते.
    • जरी फायदा खूप जास्त नसला, तरी मुद्दल सुरक्षित राहते.
    • हे बचत खत्यापेक्षा चांगला लाभ देतात. परंतु मुदत ठेविपेक्षा हा लाभ कमी असतो.


फसव्या योजना[संपादन]

या योजना मुख्यत्वे करून चुकीच्या मार्गाचा अवलंब करून राबवल्या जातात. ज्यात गुंतवणूकदाराला छोट्या जोखमीच्या मोबदल्यात मोठ्या पैशाचे आमिष दाखवले जाते. अशा योजना जुन्या म्हणण्यापेक्षा सर्वप्रथम जो गुंतवतो अशांसाठी, एकतर त्यांच्याच पैशातून अथवा त्यानंतर येणाऱ्या गुंतवणूकदारांकडून पैसा उभा करत असतात. जेव्हा की वास्तविक नफा काहीच कमविला जात नाही. या योजनांनी जाहिरातीत दाखविलेले फायदे, नफा हे केवळ या योजनांमधील पैसा सतत वाढत राहीला पाहिजे, जेणे करून योजना सुरू राहील याच केवळ उद्देशाने दाखविलेला असतो.

ही संपूर्ण प्रक्रिया जर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले नाहीत, अथवा त्यांना वेळेवर पैसे दिले नाहीत तर मग ढासळते. सहसा अशा योजनांमधे गैरव्यवहार होण्याआधीच कायदेशीररीत्या कायद्याचे अधिकारी हस्तक्षेप करतात. कारण या योजनाच शंका घेण्यास वाव ठेवतात किंवा विनिमय संस्थांमधे नसलेल्या समभागांची विक्री यांच्या कंपनी विस्तार अधिकाऱ्यांकडून केली जाते. जितके लोक यात सहभागी होत जातात अधिकाऱ्यांची नजर अशा योजनांवर तितकीच करडी होत जाते.

अशा योजना कशा ओळखाव्यात?[संपादन]

या योजना सहसा, असे परतावे खात्रीशीर देणार जे बाजारात दुसऱ्या योजना देऊच शकत नाहीत. शिवाय अल्पावाधीचे परतावे हे अविश्वसनीयरीत्या जास्त किंवा अनाकलनीय प्रकारे स्थिर असतात, दुसऱ्या शब्दात अतिशय चांगले असतात की, ज्यावर विश्वासच बसत नाही.[ संदर्भ हवा ]