अनिल मोहिले
अनिल मोहिले | |
---|---|
मृत्यू | १ फेब्रुवारी इ.स. २०१२ |
राष्ट्रीयत्व | मराठा, भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीतकार, संगीतसंयोजक |
संगीत प्रकार | संगीतकार, संगीतसंयोजन |
कार्यकाळ | इ.स. १९६० - इ.स. २०१२ |
अनिल मोहिले (जन्म : इ.स. १९४१; मृत्यू :१ फेब्रुवारी २०१२) हे ज्येष्ठ संगीतकार होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी व [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपठांचे संगीत दिग्दर्शन व संयोजन केले आहे.
बालपण
[संपादन]लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिलेंना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच इ.स. १९६० च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर काम केलं. संगीतसंयोजनाची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवर केली . तेथेच त्यांच्या आयुष्यातील नवे लक्ष्य मिळाले आणि ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाणी यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेतले. नोटेशन वाचून वाजवणे हा प्रकार ते त्यांच्याकडे शिकले. आकाशवाणीवर श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. नोटेशन लिहिणे, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धुनांनी भरणे यासाठी लागणारं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळे यांच्याकडून मिळाले. ते स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवायचे. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जोपासली होती. वयाच्या सातव्या वर्षी आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यांचा ‘गंमत जंमत’ या मुलांच्या कार्यक्रमात एकल तबलावादनाचा कार्यक्रम सादर झाला होता.
कारकीर्द
[संपादन]त्यांच्यावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता. ८६ हिंदी चित्रपटांचे त्यांनी संयोजन केले आहे. जवळपास ७० हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केले. मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात ते संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे.
संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसेच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. मराठी चित्रपटसृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
मंगेशकर कुटुंबीयांचा उजवा हात अशी त्यांची प्रसिद्धी होती. संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही सन २००३ पासून मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिलेंकडे पाहिले जात होते. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरू केला होता. त्यातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले
अनिल मोहिले यांचे संगीत संयोजन असलेले हिंदी चित्रपट
[संपादन]- अभिमान
- कयामत से कयामत तक
- डॉन
- थोडीसी बेवफाई
- लेकिन
- शराबी
- शर्मिली
संगीत संयोजन केलेले मराठी चित्रपट
[संपादन]- अशी ही बनवाबनवी
- जिवलगा
- झपाटलेला
- थरथराट
- दे दणादण
- धडाकेबाज
- शुभमंगल सावधान
अनिल मोहिले यांचे संगीत दिग्दर्शन असलेली काही सुप्रसिद्ध हिंदी गीते
[संपादन]- तेरे मेरे मिलन की ये रैना
- दिल चीज क्या है
- दिल हुमहुम करे
- यारा सिलीसिली
संगीत दिग्दर्शन केलेली काही सुप्रसिद्ध मराठी गीते
[संपादन]- असा बेभान हा वारा
- केव्हा तरी पहाटे
- परीकथेतील राजकुमारा
- मालवून टाक दीप
- मी डोलकर
- मेंदीच्या पानावर
- ये रे घना
- शुक्रतारा
- श्रावणात घन नीळा
- ससा तो ससा
- स्वप्नातल्या कळ्यांनो
पुरस्कार
[संपादन]- राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व्हायोलिनवादनाचा राष्ट्रीय पुरस्कार
- सूरमणी पुरस्कार
- मा. दीनानाथ पुरस्कार
- राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार
- स्वरयोगी किताब
अनिल मोहिले यांचे १ फेब्रुवारी २०१२ ला पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले . ते ७१ वर्षांचे होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |