कुंकुम वृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कुंकुम वृक्ष, शेंदरी किंवा कपिला (हिंदी:कमला, राइणी; गुजराती:कपिलो; कन्नड: मळ्ळीचिलू, केसरीमावू; संस्कृत: रेचनका, कंपिल्लक; इंग्लिश: मंकी फेस ट्री; लॅटिन:मॅलोटस फिलिपीनेन्सिस) हे युफोर्बिएसी कुलातील एक वृक्ष आहे. अनेक फांद्यांचा हा एक लहान, ७·५–९  मी. उंच सदापर्णी वृक्ष महाराष्ट्रात रुक्ष, विरळ व काटेरी अथवा पानझडी जंगलात आढळतो. याशिवाय हा वृक्ष सिंध, श्रीलंका, मलाया, चीन, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांत व भारतात हिमालयाच्या पायथ्याकडे काश्मीर ते पूर्वेस आसामपर्यंत १,५५० मी. उंचीपर्यंत तसेच इतरत्र उष्ण ठिकाणी सापडतो आढळतो.

या झाडाचे साल पातळ, करडे असते. याचे खोड आतून तांबडे असते व वर वेड्यावाकड्या चिरा असतात. हे साल कातडी कमाविण्यास वापरतात. कमावलेले कातडे तांबडे होते. याच्या पानाची खालची बाजू, लहान फांद्या व फुलोरे तांबूस भुरकट असतात. पाने मध्यम आकाराची, एकाआड एक, खरखरीत, भाल्यासारखी, लांबट टोकाची, वरून गुळगुळीत व दातेरी कडाची असून खालच्या बाजूस सूक्ष्म तांबूस प्रपिंड (ग्रंथी) असतात. याची फुले लहान, पिवळी व पांढरी, बिनदेठाची, पानांच्या बगलेत किंवा शेंड्याला येणाऱ्या परिमंजरीवर नोव्हेंबर–जानेवारीत येतात. ती एकलिंगी असून पुं-पुष्पात अनेक केसरदले असतात. स्त्री-पुष्पात तीन कप्प्यांचा लवदार किंजपुट व त्यावर तीन किंजले असतात. याचे बोंड लहान करवंदाएवढे, लालबुंद भुकटीने व तारकाकृतीने केसांनी वेढलेले असून खोलगट उभ्या रेषांनी तीन भाग झालेले दिसतात. हे बोंड उभे तडकल्यावर तीन भाग होतात. त्यातील बिया गोलसर आणि काळ्या असतात. या वृक्षाचे लाकूड लालसर व मध्यम प्रतीचे बळकट, टिकाऊ व गुळगुळीत असते व शेतीची काही अवजारे, आगपेट्या, धोटे इ. वस्तू बनवण्यासाठी उपयुक्त असते.

या वृक्षाचा पाला जनावरे खातात. जमिनीचा पोत सुधारण्यास व इतर वनस्पतींचे रक्षण करण्यास ही झाडे चांगली असतात.

फळे उष्ण, रेचक, कृमिनाशक, वायुनाशक असून गळू, गुल्म (गाठ), श्वासनलिकादाह, पानथरी इत्यादींवर गुणकारी असते. पाने थंड, क्षुधाप्रवर्तक, कडवट असून त्यामुळे पोटात गुबारा धरतो व बध्दकोष्टता येते. या वृक्षाच्या फळावरील लालसर भुकटीचा रेशमी कापड रंगविण्यास उपयोग करतात. कमला ही याची एक ब्रॅंड[मराठी शब्द सुचवा] आहे. कमला पूड कडवट, सारक व रक्तस्तंभक (रक्तस्राव थांबविणारी) असल्याचा तसेच ती पोटदुखी व कातडीचे रोग यांवर उपयुक्त असल्याचा दावा आहे.