Jump to content

कालमापन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कालगणना या पानावरून पुनर्निर्देशित)

कालमापनासाठी संदर्भादाखल नियमित अशी एकादी गती आवश्यक असते. गेली हजारो वर्षे कालमापनासाठी ग्रहभ्रमणाचा --विशेषतः पृथ्वीच्या परिभ्रमणाचा-- उपयोग माणसांनी केला आहे. प्राचीन काळी माणसांनी "दिवस" आणि "रात्र" ह्यांच्या जोडलेल्या कालव्याप्तीचे २४ समान भाग केले, आणि प्रत्येक भागाला "तास" (लॅटिन/संस्कृत : होरा) अशी संज्ञा दिली; तासाचे ६० समान भाग करून प्रत्येक ६०व्या भागाला "मिनिट" (लॅटिन: मिन्युता) ही संज्ञा दिली. पुन्हा प्रत्येक मिनिटाच्या ६०व्या भागाला "सेकंद" (लॅटिन: सेकुंदा) ही संज्ञा दिली. २४ आणि ६० ह्या अंकांचे २, ३, ४, ५(?), आणि ६ ह्या अंकांनी सहज पुनर्विभाजन होऊ शकते म्हणून प्राचीन बाबिलोनी संस्कृतीत २४ आणि ६० ह्या अंकांचा वापर लोकांनी बुद्धीची चमक दाखवून कालमापनासाठी केला.

पृथ्वीच्या परिभ्रमणाखेरीज लंबकांदोलनांसारख्या इतर काही नियमित गतींचाही उपयोग लोकांनी कालमापनासाठी केला.

नव्या जमान्यात जास्तीत जास्त अचूकतेसाठी किरणोत्सर्जक सेझिअमच्या अणुकेंद्रक आणि सर्वात आतल्या इलेक्ट्रॉन कक्षेमधल्या चुंबकीय आंतर्क्रियेतील कंपनाचा उपयोग करण्यात येतो. बाहेरच्या इलेक्ट्रॉनकक्षांच्या आवरणामुळे रासायनिक, प्रकाशीय, किंवा विद्युत ह्यांसारख्या बाह्य गोष्टींचा ह्या आंतर्क्रियेवर काहीएक प्रभाव नसतो हे तिचे वैशिष्ट्य आहे. शिवाय अणूच्या मानाने ही आंतर्क्रिया प्रदीर्घ कालावधीची असल्याने ती प्रत्येक कंपनाचे मापन कमालीच्या अचूकपणेही देते. अशा ९,१९,२६,३१,७७० कंपनांचा कालावधी तो एक "सेकंद" अशी व्याख्या १९६४ साली तज्‍ज्ञांनी मुक्रर केली.

पहा: काळ