करवीरकर जिजाबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराणी जिजाबाई भोसले
महाराणी
कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ १७१४ - १७६०
अधिकारारोहण पट्टराणी पदाभिषेक
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव जिजाबाई संभाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी भवानीबाई
पती छत्रपती संभाजी द्वितीय
राजघराणे भोसले
चलन होन

महाराणी जिजाबाई भोसले ह्या छत्रपती संभाजी द्वितीय यांच्या पत्नी होत्या. कोल्हापूर संस्थानाच्या त्या महाराणी होत्या.

परिचय[संपादन]

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी राजसबाई ह्यांच्या सूनबाई तसेच करवीर राज्याचे छत्रपती संभाजी द्वितीय यांच्या पत्नी म्हणजेच महाराणी जिजाबाई होय. महाराणी जिजाबाई ह्या तोगलकर शिंधांच्या घराण्यातील नरसोजीराव शिंदे यांच्या कन्या होत्या. छत्रपती संभाजी महाराज ह्यांना एकूण ८ पत्नी होत्या. जिजाबाईसाहेब ह्या संभाजीराजांच्या चौथ्या पत्नी. महाराणी जिजाबाई ह्यांचा विवाह इ.स. १७२६ रोजी झाला. त्यांचा लग्नासाठी अंदाजे ३ लाख रुपये खर्च आला.

राज्यकारभार[संपादन]

महाराणी जिजाबाई ह्यांनी प्रत्यक्ष कारभारात सहभाग हा १७५०-५१ (छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा मृत्यूच्या किमान १० वर्ष आधी) पासून घेतला असावा कारण अनेक पत्र त्यांचा नावाने लिहली गेलेली आहेत. छत्रपती संभाजी द्वितीय ह्यांच्या मृत्यूनंतर (२० डिसेंबर १७६०) राज्यावर अनेक संकट आली पण महाराणी जिजाबाई न डगमगता आपल्या बुद्धी चातुयनि सामोरे गेल्या. १७६१-१७७३ हा बारा वर्षांचा कार्यकाळ महाराणी जिजाबाई ह्यांचा राज्यकारभाराचा कार्यकाळ होय.

राजकारण[संपादन]

छत्रपती संभाजीराजे ह्यांना पुत्र नव्हते. त्यांच्या मृत्युनंतर नानासाहेब पेशव्यांनी "महादजी भोसले- मुंगीकर यांचा धाकटा भाऊ उमाजी त्यास बरोबर धावा आणि तेथे जाऊन त्यास राजा करावा. कारभार जिजाबाईंनी करावा." असे पत्र जिजाबाईंना पाठवले. असा बेत आखला पण महाराणी जिजाबाई ह्यांना हा बेत मान्य नव्हता. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी विसाजी नारायण, सदाशिव अवधूत आणि महादजी भोसले ह्यांना फौजेसह रवाना केले. महाराणी पेशव्यांबरोबर वाटाघाटी करायचे प्रयत्न करत असताना युद्धाची देखील तयारी करत होते. अचानक एक दिवशी महाराणी जिजाबाईंच्या फौजेने हल्ला करून नानासाहेब पेशव्यांचा पराभव केला. महाराणी जिजाबाईच्या मुत्सद्देगिरीची आणि पराक्रमाची कल्पना या प्रसंगाने सर्वानाच आणून दिली. २३ जून १७६१ रोजी नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला आणि माधवराव पेशवे गादीवर बसले. शरीफजीच्या वंशातील शाहजीराजे भोसले (खानवरकर) इंदापूर परगण्यात राहत होते. त्यांचा मुलगा माणकोजी यास दत्तक घ्यावा अशी छत्रपती संभाजीराजेंची मृत्यूपूर्वी इच्छा होती.

हीच इच्छा आदेश मानून जिजाबाईसाहेबांनी माणकोजींना कोल्हापूर गादीवर बसवले आणि त्यांचं नामकरण शिवाजी असे केले. माधवराव पेशव्यांनी सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दिला. अशा प्रकारे महाराणी जिजाबाई ह्यांनी एक मोठा वारसाहक्काचा तिढा सोडवला.

दूरदृष्टी[संपादन]

इंग्रजांचे समराज्य आणि सामर्थ्य मध्ये सुद्धा ह्या काळात वाढ होऊ लागली आणि त्यांचा उपद्रव मराठ्यांचा सत्तेला होऊ लागला. हे परकीय सामर्थ्य वेळीच नष्ट नाही केले तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी कल्पना त्यांना आधीच आली होती. सावंतवाडीच्या दिवनाला १२ मार्च १७६५ रोजी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की "कोवळा मोड आहे तो मोडिल्याने उत्तम. भारी जाहलेने सर्वांचे वाईट". ह्यावरून त्यांची दूरदृष्टी स्पष्ट होते.

इतिहास संशोधक[संपादन]

कोल्हापूर इतिहासाच्या संदर्भात असे म्हणता येईल की, हे राज्य महाराणी ताराबाईसाहेब ह्यांनी स्थापन केले तर महाराणी जिजाबाई ह्यांनी त्याचे संरक्षण केले. दोन्ही महाराणी मध्ये एक गोष्ट साम्य देखील आहे की दोन्ही महाराणी प्रत्यक्ष युद्धात तलवार घेऊन भाग घेतला आहे. दोन्ही महाराणींच्या कर्तबगारीला विशेष महत्व आहे. युद्धात अनेक जय आणि पराजय आले पण त्यांनी राज्य रक्षिले हे विशेष. रियासतकार गो. स. सरदेसाई असे म्हटले आहे की, " जिजाबाई मोठी धोरणी होती. आपले व प्रतिपक्षाचे बलाबल ओळखून आणि प्रसंग पडेल त्याप्रमाणे वागून आपलाच हेका न चालिवता प्रसंगी पडते घेऊन ती आपले कार्य साधीत असे".

राजमुद्रा[संपादन]

महाराणी जिजाबाई ह्यांचा स्वतःचा शिक्का स्वंतत्र शिक्का ही होता. त्याचा मजकूर पुढील प्रमाणे,

शंभुराजस्य भार्यां जिजादेव्या धरातले । बालेंदुरी वर्धिष्णुर्मुद्रा भद्राय राजते ॥ :