एकनाथ महाराजांचा वाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे मुख्य ठिकाण पैठण हे औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.

या पैठण गावात संत एकनाथांचा वाडा आहे. एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतील श्री विजयी पांडुरंगाची मुख्य मूर्ती विराजमान आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असे गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.

पैठण गावात जे नाथांचे मंदिर आहे ते गावातील नाथांचा वाडा म्हणून जास्त प्रसिद्ध आहे या पूर्वाभिमुख वाड्यात किंवा मंदिरात प्रवेश करताच समोर लाकडी खांबांपलीकडे दिसते ते नाथांचे देवघर आहे, नाथ महाराज स्वतः या देवांची पूजा करत होते. मूळ देवघर लाकडी आहे त्यावर सुबक चांदीकाम केलेले आहे.

देवघरात सर्वात वर तुळशीची माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव पूर्ण वस्त्रालंकाराने झाकलेली असते; त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेवर आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो.म्हणून त्याला विजयी पांडुरंग असे म्हणतात. हे समोर दिसणारे सगळे देव नाथांच्या नित्यपूजेतले देव आहेत.

हा विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे. हा भगवंत नाथांना प्रसाद रूपाने मिळालेला आहे. ही मूर्ती बारा इंच उंचीची मूर्ती आहे कर्नाटकातील एक सावकार हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळे त्याने मंदिर बांधले आणि कारागिरांकडून पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली. तो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टान्त देऊन त्यांना म्हणाला, माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध तू तसे केलेस तर तुझा निर्वंश होईल. मग त्याने विचारले की या मूर्तीचे काय करू? तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे. त्यानंतर त्याने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली आणि ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सांगितले तर भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले. त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू सावकाराच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छा आहे, पण त्याच्यासारखे पंचपक्वान्ने माझ्याकडे तुला मिळणार नाहीत. वास्तविक पाहता नाथा श्रीमंत संत होता. नाथांचे पैठणात चार चौकाचे तेरा वाडे होते हजारो एकर जमीन होती,रोज कितीतरी लोक वाड्यात पुरणपोळीचे जेवण जेवत असतं तरीसुद्धा नाथ पांडुरंगाला असे म्हणाले तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरे उमटली "दास जेवू घाल वा न "म्हणजे हे नाथ महाराज मी तुमच्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुमच्याजवळ राहणार आहे . हे ही या मूर्तीचे एक वैशिष्ट्य सांगता येते, की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत. प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हणल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला. त्यांचे नाव गिरिजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणली आणि नाथांच्या समोर धरली. हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केलानी लोणी चाटले. नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना तळहात उघड करून कमरेवर ठेवला म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे.

मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतात. अशा तीन वैशिष्ट्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे वाड्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला रांजण आहे ज्यात बारा वर्षे श्रीखंड्याने पाणी भरले अशी आख्यायिका आहे आज तो व्यवस्थित झाकून सुरक्षेखातर बंदिस्त केलेला आहे हा नेहमीच्या रांजणा सारखा नाहीये तर तो २१फूट खोल आणि१ १/२ (दीड) रुंद पूर्ण काळ्या दगडी पाषाणातले बांधकाम आहे. बुडात त्याच्या मधोमध गोमुख आहे तिथून थेंब थेंब पाणी गोदावरीला जाऊन मिळते. कुठे मिळते हे मात्र अजूनही माहीत नाही... त्याकाळचे स्थापत्यशास्त्र म्हणजे साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेला हा रांजण आणि त्यावेळी ठेवलेले खाली छिद्र म्हणजे ज्या पाण्याला परक्युलेशन आहे जे पाणी झिरपत राहते त्याला वर्षभर कोंडून राहिलेले पाणी खराब होत नाही.. नाथांच्या काळात याचा नित्य वापर व्हायचा हजारो लोक रोज घरी जेवायचे.

आजही जेव्हा हा रांजण स्वच्छ केला जातो कोरडा करायला खाली जाणारी माणसे सांगतात की तिथे एकदम गार वाटते खालच्या गोमुखातून हवा येते ..रांजणातली पूर्वेकडची भिंत आहे तिथे कोनाडा आहे त्यात पांडुरंग आणि रुक्मिणीची अतिशय सुबक मूर्ती आहे जेव्हा कोणी रांजणात उतरते तेव्हाच ती दिसते. हा रांजण नेमका भरतो कधी हे ही एक वैशिष्ट्य आहे.

हा रांजण फाल्गुन वद्य द्वितीयाच्या आदल्या दिवशी उघडा केला जातो. मागच्या वर्षी जे पाणी भरलेले असते ते थोडे थोडे झिरपून अर्धे झालेले असते, ते या दिवशी उपसावे लागते. त्याच रांजणाशेजारी दुसरे छिद्र आहे त्या छिद्राला मोठ्ठे नरसाळे लावून त्यात हे उपसलेले पाणी सोडतात, जेणेकरून ते इकडे तिकडे कुठे फेकले जाऊ नये, कुणाच्या पायदळी येऊ नये हा हेतू यामागे असावा. याचे सुद्धा दुसरे छिद्र गोदावरीला जाऊन मिळाले आहे. हे सगळे फार अद्भुत आहे.

यानंतर सगळा रांजण कोरडा करून घेऊन त्याला धूप देऊन फाल्गुन वद्य द्वितीयेपासून नाथांच्या षष्ठीचा उत्सव सुरू होतो मग या रांजणाची पूजा करतात.हा रांजण केव्हा भरेल याचा मात्र काही नेम नाही.कधी पहिल्या दिवशीच तर कधी पाचव्या दिवशीही भरतो.हा रांजण ज्यांच्या हाताने भरेल त्याची श्रीखंड्या म्हणून पूजा केली जाते.

असा हा नाथ वाडा आणि त्याची ही आख्यायिका अत्यंत पवित्र, पूजनीय शांतिब्रम्ह! नाथांजवळ काय मिळते तर परम शांती. शांतीचा उगमच त्यांच्यातून होतो.

"सकल संतांचा हा राजा : स्वामी एकनाथ माझा" असे निळोबारायांनी म्हणलेले आहे याची प्रचिती येते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी आणि त्यांचे गुरू दत्तात्रय महाराज म्हणजे स्वतःच्या गुरूचे गुरू म्हणजे दत्तात्रय भगवान नाथांचे - परम गुरू. त्यांनी नाथांच्या घरी चोपदारकी केली असे मानले जाते म्हणून वाड्याच्या बाहेर एका बाजूला हनुमंतराय आहेत तर एक बाजूला दत्तात्रेय आहेत. यावरूनच नाथांचे श्रेष्ठत्व समजते. नाथ महाराजांचा जन्म शके १५३३ तर निर्वाण १५९९ला झाले त्याच्या सहासष्ट वर्षाच्या आयुष्यातील ४०वर्षे वास्तव्य या वाड्यातले आहे. नाथवाड्यात देवघरासमोर दोन खांब आहेत त्यातला एक पुराण खांब ज्याला टेकून नाथ प्रवचन सांगायचे तर दुसरा आहे उद्धव खांब ज्याची आख्यायिका अशी आहे. :-

भगवंताने नाथांकडे केशव,विठ्ठल व श्रीखंड्या, रूपात १२,१२,१२ वर्षे असे तीन तप चाकरी केली. केशवाचे रूपात कीर्तनात टाळ धरून सेवा केली अर्थात नाथमहाराजांचे टाळकरी म्हणून सेवा, विठ्ठलाच्या रूपात देवपूजेत मदत करून सेवा केली आणि श्रीखंड्याच्या रूपात रांजणात पाणी भरण्याची सेवा केली.

श्रीखंड्या चंदन उगाळून करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ।।

आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी । एकचि काय वदावे भरल्या कार्यार्थ वाहिले पाणी ॥

तो काळ पूर्ण झाला तेव्हा द्वारकेत एक भक्त हट्टाला पेटला. भगवंताचे दर्शन हवे आहे म्हणून. तेव्हा रुक्मिणीने त्याला सांगितले की भगवंत गेल्या छत्तीस वर्षांपासून द्वारकेत नाही आहेत. तू इथे बसू नकोस ते भेटणार नाहीत ते, तेव्हा तिने सांगितल्या प्रमाणे पैठण स्थित भगवंतास शोधत ती व्यक्ती आली. नाथांची चाकरी करणारा श्रीखंड्या तो द्वारकेतला कृष्ण आहे त्याला मला भेटायचेच आहे. हे जेव्हा भगवंतांना समजले तेव्हा ते उद्धव रूपाने या खांबात अंतर्धान पावले. केशव हे नाथांचे चरित्र लिहिणारे लेखक होते; ते त्यांच्या शिष्य परंपरेतील होते.त्यांनी नाथचरित्रातील अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.किमान सहा ते सात लाख वारकरी या निमित्ताने येथे एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी वारीला येत असतात. पैठणची ही वारी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी आहे.