आल्फ्रिड
आल्फ्रिड (जन्म ८४९ मृत्यू ८९९) हा इंग्लंडचा पहिला राजा होता. त्याची कारकीर्द ८७१ ते ८९९ होती.
आल्फ्रिडच्या राजवटीपुर्वी आज ब्रिटन म्हटल्या जाणाऱ्या बेटांवर विविध युरोपियन वंशांच्या अनेक आदिवासी टोळ्यांचे सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेले राज्य होते. या टोळ्या जमीन व अन्नाकरता एकमेकांत सतत भांडत असत. नवव्या शतकात मात्र नॉर्वेहून समुद्रामार्गे आलेल्या व्हायकिंग वंशाच्या हिंस्र हल्लेखोरांमुळे ब्रिटनमधल्या या आदिवासी टोळ्यांचे अस्तित्वच धोक्यात आले. या संकटातून या टोळ्यांना व्हायकिंग लोकांच्या विरुद्ध एकत्र येण्याचे महत्त्व कळले व इंग्लडचे एक एकिकृत राज्य आल्फ्रिडच्या नेतृत्वाखाली उदयास आले. आल्फ्रिडने व्हायकिंग सैन्याचा पराभव केला व इंग्लड बेटावर व्हायकिंग राजवटीचे येणे टाळले. त्यानंतर आल्फ्रिडने इंग्लंडचे आरमार घडवले, अनेक किल्ले बांधून देशाची सुरक्षा बळकट केली, इंग्लंडमध्ये न्यायव्यवस्थेची स्थापना केली, व पुस्तकालये बांधून शिक्षणास प्रतिष्ठा दिली. अशा कामांमुळे इंग्रजी जनमानसात आजपर्यंत आल्फ्रिडची एक आदर्श व लोकप्रिय राजा म्हणून ओळख आहे. पुढे सातशे वर्षांनंतर पंधराव्या शतकात इंग्लंडच्या ट्युडर राजांनी आल्फ्रिडला “आल्फ्रिड दी ग्रेट” म्हणजेच “महान आल्फ्रिड” म्हणणे सुरू केले. आल्फ्रिड ॲंग्लो-सॅक्सन वंशाचा होता व तत्कालीन इंग्लंडच्या मर्यादित विस्तारामुळे त्याला वेसिक्सचा राजा असेदेखील संबोधले जाते. आल्फ्रिडने स्थापलेले वेसिक्सच्या ॲंग्लो-सॅक्सन राजवंशाचे इंग्लंडवरील राज्य मधले काही व्यत्यय वगळता १०६६ पर्यंत म्हणजे जवळजवळ दोनशे वर्षे टिकले. आल्फ्रिडच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा थोरला एडवर्ड राज्यावर आला.