आबाजी नारायण पेडणेकर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आबाजी नारायण पेडणेकर (२० फेब्रुवारी १९२८ – ११ ऑगस्ट २००४). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, कवी, समीक्षक आणि भाषांतरकार. त्यांचा जन्म मालवण तालुक्यातील (जिल्हा,सिंधुदुर्ग.) येथील कोळंब या गावी झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. मालवणच्या टोपीवाला हायस्कूल मध्ये १९४० ते ४६ या काळात आ.ना. पेडणेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर बेळगाव येथून शिक्षणशास्त्रातील पदवी त्यांनी मिळविली. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून इंटर, रुईया महाविद्यालयातून बी.ए.(१९५०), इंग्रजी विषयात एम. ए.पदवी (१९५२) त्यांनी प्राप्त केली. १९६४ पासून अलिबाग येथील महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले आहे. १९८८ साली ते निवृत्त झाले. इंग्रजी साहित्याचे व्यासंगी प्राध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून पेडणेकर परिचित होते. दुर्बल घटकाविषयी प्रेम, समाजातल्या अंधश्रद्धाळू वृत्तीबद्दल निषेधाची भावना त्यांच्या दृष्टीत होती. मालवणी मुलूख आणि मालवणी बोलीवर त्यांचे नितांत प्रेम होते.
‘आम्ही मासे मारतो त्याची गोष्ट’ ही त्यांची पहिली कथा. तर शेलूक (१९७२) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे वास्तवपूर्ण चित्रण, विशेषतः कोकणातील माणसे, सांस्कृतिक लोकजीवन, समुद्र, कोकणातील निसर्ग, मालवणी बोली आणि तेथील मानवी जीवनाचा अनुबंध त्यांनी शेलूकमध्ये गुंफला आहे. रेडग्रीन (१९७७ ), मैत्र (१९८२), वेडा आंबा (१९८६) हे त्यांचे पुढील कथासंग्रह होत. या कथासंग्रहातील कथनात त्यांनी फॅन्टसीचा (कल्पनारम्यता) वापर केला आहे. ‘वेडा आंबा’ ही त्यांची परीकथा अनेक भारतीय भाषांत भाषांतरित झाली. एकाच वेळी आधुनिकतावादी आणि परंपरागर्भ अशी कथा त्यांनी लिहिली आहे. शहरी वास्तव, कोकणातील समुद्राकाठचे जीवन आणि सांस्कृतिक जीवन आपल्या कथेच्या केंद्रस्थानी ठेवले. तसेच पूर्णतः काल्पनिक विश्व कथेत उभे करूनही कथन केले आहे. कल्पनाशक्तीची लवचिकता, स्वातंत्र्य आणि मुक्त वृत्ती हे त्यांच्या कथालेखनशैलीचे विशेष होत.
ऐलपैल (१९७६) ही त्यांची कोकणच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी प्रसिद्ध आहे. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे आणि निसर्गाचे विविध विभ्रम कादंबरीत त्यांनी रेखाटले आहेत. संतांच्या क्रांतिकारी जीवनाविषयीची आस्था त्यांनी रेखाटलेल्या संतचरित्रातून प्रकट झाली आहे. संत कबीर (१९६२), संत मीराबाई (१९६२), संत एकनाथ (१९६८) ही त्यांची संतचरित्रे प्रसिद्ध आहेत. लहान मुलांच्या वात्सल्य-प्रेमातून गीतांची शाळा (१९६६), गाणीबिणी (१९८४), निबंधांची शाळा (१९८०) हे बालवाङ्मय त्यांनी लिहिले आहे. गीतांची शाळा यात कुमारगीते रेखाटली असून कुमारवयीन मुलांचे भावविश्व, आशा आकांक्षा, विनोदी वृत्ती नेमकेपणाने चित्रित केली आहे. तर निबंधांची शाळा मध्ये शाळकरी मुलांसाठी विविध निबंधांचे लेखन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकरिता लिओ टॉलस्टॉय यांच्या वॉर अॅन्ड पीस या बृहत्कादंबरीचा युद्ध आणि शांती (१९७६) हा अनुवाद त्यांनी केला. त्याशिवाय मृगजळ (१९७८), मोहिनी (१९७८) हे अनुवादित ग्रंथ तसेच शेक्सपिअरच्या अनेक सुनितांचे अनुवाद प्रसिद्ध आहेत.
गो. वि. करंदीकरांच्या विविध इंग्रजी भाषणांचा साहित्यमूल्यांची समीक्षा या ग्रंथरूपाने अनुवाद त्यांनी केला आहे. करंदीकरांनी वाङ्मयनिर्मिती, भाषांतर, समीक्षा, अध्यापन यातील अनुभवातून आत्मनिष्ठा, विशुद्धता, उत्स्फूर्तता, सौंदर्य इत्यादी मूल्यसंकल्पनांचे विश्लेषण आपल्या इंग्रजी भाषणातून केले. त्यांचे तितक्याच सक्षमतेने पेडणेकरांनी भाषांतर केले आहे. करंदीकरांची विद्वत्ता आणि लेखनातील मौलिकता या अनुवादात यथोचित शब्दांत प्रकट झाली आहे.
पेडणेकरांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत. एम. ए. वर्गात असताना खळेरास ही पहिली कविता सत्यकथा मासिकातून प्रसिद्ध झाली. प्रेम, निसर्ग, जिव्हाळा या भावनासह सामाजिक जीवनातील भ्रष्टाचार, विकृती यांचा निषेध त्यांनी कवितेतून केला आहे. मालवणी बोलीचे उपयोजन करून काही त्यांनी कविता लिहिल्या आहेत. आ. ना. पेडणेकरांच्या कविता या संग्रहात त्यांच्या संपादित आहेत (संपा. अनंत देशमुख).
शेलूक या त्यांच्या या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त असून आणीबाणी काळात रेडग्रीन कादंबरीला मिळालेल्या राज्य शासनाच्या पुरस्कार त्यांनी स्वीकारला नव्हता.