Jump to content

आनंद आश्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंदाश्रम ही पुणे शहरातील संस्कृतचा अभ्यास आणि संशोधन करणारी संस्था आहे.

शहराच्या अप्पा बळवंत चौक या मध्यवर्ती भागातील या संस्थेची उच्च न्यायालयाचे वकील महादेवराव चिमणाजी आपटे यांनी ४ नोव्हेंबर, १८८७ रोजी केली. या संस्थेच्या उभारणीसाठी त्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी खर्च केली.[ संदर्भ हवा ] १८८८ मध्ये त्यांनी बापूजी कानिटकर, शिवराम हरी साठे आणि गंगाराम बलसोबा रेले यांना संस्थेचे विश्वस्त म्हणून नियुक्त केले. पहिले व्यवस्थापकीय विश्वस्त हे आपटे यांचे पुतणे, कादंबरीकार, सुधारक, विचारवंत, संस्कृतवादी आणि पत्रकार हरी नारायण आपटे होते.

हिंदू धर्माच्या तसेच भारतीय संस्कृतीच्या सर्व विषयांवर संस्कृत पुस्तके प्रकाशित करणे हे संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे. विद्वान आणि संशोधकांना उपलब्ध व्हावीत म्हणून ही संस्था संस्कृत मधील हस्तलिखितांचे संकलन,जतन आणि संग्रह करत आहे. धर्मशास्त्र, योगशास्त्र, उपनिषद, मीमांसा, वेद, वेदांग इत्यादी विविध विषयांवर त्यांनी आत्तापर्यंत १९०  हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.

महात्मा फुले मंडई आणि फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य इमारतीची रचना करणाऱ्या राव बहादूर व्ही.बी. तथा दादासाहेब कानिटकर यांनी आनंद आश्रमाच्या परिसराची संरचना केली. यात प्रशासकीय कार्यालय, ग्रंथालय, मुलांसाठी वसतिगृह आणि श्री सच्चिदानंद यांचे मंदिर आहे. कानिटकर हे देखील संस्थेचे विश्वस्त होते.

वाड्यासारखी रचना असलेल्या या इमारतीच्या मध्यभागी अंगण आहे.  इमारतीच्या बांधकामासाठी रंगीत काचा, आयात केलेल्या  मिंटन फरशा आणि स्थानिक दगड वापरले आहेत . संस्थेतील फर्निचर हे बर्माच्या लाकडापासून बनविलेले आहे, ज्याचा उपयोग इमारतीच्या बांधकामातही केला गेला आहे.

मंदिराच्या आणि इमारतीच्या दर्शनी भागात पानाफुलांची नक्षी असलेले उत्कृष्ट लाकूडकाम केलेले आहे. मंडईतल्या गोल लाकडी जिन्याप्रमाणे इथेही मंदिराकडे जाणारा एक संगमरवरी फरशीचा गोल जिना आहे.

आयताकृती मंदिरात मध्यवर्ती गाभारा आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी दालने आहेत. आतील भाग विविध देवी-देवतांच्या चित्रांनी सुशोभित केला आहे. शिवमंदिर पहिल्या मजल्यावर  बांधावे आणि शिवलिंगातील दररोजच्या ‘अभिषेकाचे’ पाणी त्याच्या खाली असलेल्या स्वतःच्या समाधीकडे वाहून जावे अशी महादेवरावांची इच्छा होती.

आनंदश्रमाच्या ग्रंथालयात २६ वेगवेगळ्या विषयांवर १५००० संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह आहे. १४४९ साली लिहिलेला 'ज्योतिषरत्नमाला' हा त्यांच्या संग्रहातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. २०१२ मध्ये, राष्ट्रीय हस्तलिखित मिशनच्या साहाय्याने संस्थेतील हस्तलिखितांच्या जवळजवळ ८० टक्के हस्तलिखिते डिजिटल केली गेली होती. संस्था विविध साहित्यिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करते. गेल्या दशकापासून ते विद्यार्थ्यांसाठी संस्कृत स्पर्धा घेत आहेत. दरवर्षी हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण महिन्यात (जुलै / ऑगस्ट) श्रीसच्चिदानंद  मंदिरात श्रावण लघुरुद्र पूजा केली जाते. २०१९  मध्ये त्यांनी संस्कृत संभाषण स्पर्धा आणि हस्तलिखित विज्ञान चर्चासत्र आयोजित केले होते.