असुर जमात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


असुर जमात ही भारतातील बिहार राज्यात राहत असलेली एक वन्य जमात आहे. मध्य प्रदेशात असुरांना आगरिया म्हणतात. त्यांचे मुख्य वसतिस्थान छोटा नागपूर पठारावरील नेतरहाट येथे आहे.

भेद[संपादन]

येथे राहणाऱ्या असुरांचे तीन पोटभेद आहेत; बिर असुर, बिरजिया व आगरिया. बिरजिया ही बिहारमध्ये स्वतंत्र अनुसूचित जमात म्हणून नोंदविलेली आहे. आगरिया मध्य प्रदेशात आढळतात. बिर असुर बिहार राज्यातील रांची आणि पालामाऊ जिल्ह्यांत आढळतात. सन १९६१ च्या जनगणनेप्रमाणे, या वन्य जमातीची एकूण संख्या ४,३८८ आहे. त्यांचा परंपरागत धंदा खाणीतून लोखंड काढून ते गाळण्याचा आहे.

असुर हे मुंडावंशीय लोक आहेत असा समज प्रचलित आहे. परंतु काही मानवशास्त्रज्ञांच्या मते हे आर्यपूर्व लोक असून वेदांत त्यांचा उल्लेख असुर असाच आहे. वेदकाळात व वेदोत्तरकाळात धातू गाळण्याच्या कलेस 'असुरविद्या' म्हणून संबोधलेले आहे. ग्रीअर्सनच्या मते असुर भाषेच्या व्याकरणात व मुंडा भाषांच्या व्याकरणात फरक नाही. व्हेरिअर एल्विनच्या मते असुर व आगरिया वेदकालीन असुरांचे वंशज आहेत. मुंडांनी त्यांच्यावर चढाई केल्याने ते बिहारात स्थायिक झाले व तेथून पश्चिमेकडे गेले.

असुरांची खेडी पठारावर असतात. गावात मध्यभागी आखाडा किंवा नृत्यांगण असते. आखाड्यातच गावातल्या पंचायतीच्या बैठकी घेतात. आखाड्याला लागून ‘गिटिओरा’ ही तरुणांची राहण्या-झोपण्याची जागा असते. असुरांच्या झोपडीत तीन दालने असतात. पहिल्या खोलीत स्वयंपाकघर, दुसऱ्या खोलीत झोपावयाची जागा व तिसऱ्या खोलीचा गोठा म्हणून उपयोग करतात. छोटा नागपूरातल्या असुर-आगरिया व्यतिरिक्त इतरांच्या झोपड्या गवताने शाकारलेल्या असून त्यांना ‘खार’ म्हणतात. पण असुरांच्या झोपड्या कौलारू असतात. कारण लोखंड गाळण्याच्या धंद्यामुळे त्यांचा नेहमी विस्तवाशी संबंध येतो. असुर हे संथाळ, हो व ओराओं यांच्यापेक्षा दिसायला वेगळे असतात. त्यांचा रंग उदी असतो. ते बांधेसूद व नीटस असतात. गालाची हाडे वर आलेली व नाक रुंद असते. असुर पुरुष लंगोटी (बोटोई) नेसतात व अंगावर एक कपडा (पिछोरी) पांघरतात. स्त्रिया एकच वस्त्र नेसतात. यांच्यात स्त्रिया व पुरुषांना नटायची आवड असते. पुरुष कमरेला कोशाच्या रेशमाचे करदोडे (करधनी) बांधतात. त्यांचे केस फार लांब नसतात. ते गळ्यात तांबड्या मण्यांच्या माळा घालतात व कधी कधी केसांत फुले खोवतात. बायका केस विंचरून अंबाडा घालतात. त्याला ‘सुपिद’ म्हणतात. बायका कानात, गळ्यात व हातात चांदी, पितळ यांचे दागिने व काचेचे मणी घालतात. त्यांच्यात गोंदण्याला बंदी आहे. रानातली कंदमुळे, झाडपाला व मोहाची फुले गोळा करण्यात स्त्रियांचा सारा दिवस जातो. असुर मांस व मासे खातात. साप तर त्यांना फार आवडतात. त्यांना तांदळाची व मोहाची दारू फार आवडते. असुर कुराओ ऊर्फ डाहा अगर स्थलांतरित शेती करतात. कारण आता लोखंड गाळण्याचा धंदा बसलेला आहे. मका, ज्वारी, तीळ वगैरे पिके ते काढतात.

कुळे व विवाह[संपादन]

असुर आपल्या कुळांना ‘किल्ली’ म्हणतात. त्यांच्यात सोळा कुळे असून, त्या बहिर्विवाह-पद्धतीवर आधारलेल्या आहेत. गणचिन्हांची नावे पशुपक्षी, वनस्पती व पदार्थांवरून ठेवलेली आहेत : उदा., लिला (हरिण), टोप्पो (सुतार पक्षी), मुंजानी (अंजनवृक्ष), नोन (मीठ). वधूमूल्य तीन रुपयांपासून पाच रुपयांपर्यंत द्यावे लागते. स्त्रीपुरुष नवराबायको म्हणून धार्मिक विधीशिवाय एकत्र राहिले आणि पुरुषाने कित्येक वर्ष वधूमूल्य दिले नाही, तरी त्यांचा संबंध अनीतिकारक समजला जात नाही. वधूमूल्य दिल्यावर लग्न केव्हाही होते. या संबंधाला ‘इदि-मे’ म्हणतात.

असुर समाजात घटस्फोट व बहुभार्याविवाह मान्य नाही. पाट देवता ही असुरांची मुख्य देवता होय. महादजिया नावाच्या देवतेची ते पूजा करतात. महादजिया म्हणजे महादेव असावा, असे काही मानवशास्त्रज्ञांना वाटते. ते पूर्वजपूजक आहेत. मार्च-एप्रिल महिन्यांत ते ‘सरहूल’ नावाचा सण साजरा करतात. त्या दिवशी धरणीचे सूर्य-देवाशी लग्न लावतात. धरणीमाता स्वतः गर्भधारणा करू शकली म्हणजे ती जास्त पीक देऊ शकते, असा त्यांचा समज आहे.

ासुर लोक मृताला पुरतात. दोन दिवसांनी मृताची प्रतिमा तयार करून ती नव्याने तयार केलेल्या झोपडीत ठेवून ती झोपडी जाळून टाकतात. या विधीला छाड भितर म्हणतात.

मध्य प्रदेशात राहणारे व लोखंड गाळण्याचा धंदा करणारे आगरिया मूळचे असुरच. हिंदू लोहार ही जात आहे, पण असुर-आगरिया ही आदिवासी जमात आहे. आगरिया गोंडांच्या व बैगांच्या शेजारी राहत असल्याकारणाने त्यांच्या काही चालीरीती आगरियांनी आत्मसात केल्या आहेत. ‘आगरिया’ हे नाव ‘आग’ म्हणजे ‘अग्नी’पासून प्राप्त झाले असावे. विंध्य प्रदेशात लोखंडाच्या खाणीस ‘आगर’ म्हणतात. त्यावरूनही आगरिया नाव रूढ झाले असावे. आगरिया मजबूत बांध्याचे, बुटके, चौकोनी आकाराचे डोके, रुंद नाकपुड्या, जाड ओठ, सरळ केस असलेले व काळे असतात.

आगरियांचे आचार, विचार, रूढी व श्रद्धा धंद्याला अनुसरून आहेत. अग्निदेवतेस ‘आग्यासूर’ किंवा ‘अग्निदेव’ म्हणतात. दिवाळीच्या सुमारास आग्यासुरास लाल कोंबडा बळी देतात. अग्नीबाबत बरेच निषेधनियम आहेत. तसेच कोळशाची देवता कोयलासुर व भट्टीत राहणारी देवता लोहासुर मानण्यात येते. विवाहसमयी नवऱ्या मुलाने लोखंडाचा आडकित्ता ठेवावा, असा रिवाज आहे. त्यामुळे वधूवरांचे भूतपिशाच्चापासून संरक्षण होते. लोखंडाच्या विशिष्ट प्रकारांचा जादूटोण्यातही बराच उपयोग केला जातो. एकंदरीत लोखंडाचा अवमान करणे, धोक्याचे मानले जाते. आगरियांच्या व्यवसायास हल्ली उतरती कळा लागली आहे.

हे सुद्धा पहा :

संदर्भ[संपादन]

  • Elwin, Verrier, TheAgaria, Calcutta, 1942.
  • Leuva, K. K. The Asurs, New Delhi, 1963.
  • मराठी विश्वकोश