अरविंद इनामदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरविंद इनामदार
जन्म ११ नोव्हेंबर, १९४०
तडसर
मृत्यू ८ नोव्हेंबर, २०१९
मुंबई
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम.ए.
पेशा पोलिस सेवा
कारकिर्दीचा काळ १९६४-२०००
पदवी हुद्दा महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक
वडील सिद्धेश्वर इनामदार


अरविंद सिद्धेश्वर इनामदार ( ११ नोव्हेंबर १९४०, मृत्यू: ८ नोव्हेंबर २०१९) हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते.[१] ते प्रामाणिक, शिस्तप्रिय, स्पष्टवक्ते आणि पोलीस दलात सुधारणांचा आग्रह धरणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणूनसुद्धा प्रसिद्ध होते.

शिक्षण आणि पार्श्वभूमी[संपादन]

इनामदार यांचा जन्म सांगली जिल्हातील कडेगाव तालुक्यातील तडसर या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल, पुणे येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे झाले. त्यांनी अर्थशास्त्रात बी. ए. ची पदवी घेतली. पुढे एम.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून १९६४ साली ते भारतीय पोलीस सेवेत निवडले गेले.त्यांचे वडील बंधू भैय्यासाहेब इनामदार हेसुद्धा पोलीस खात्यात अधिकारी होते.  

कारकीर्द[संपादन]

अरविंद इनामदार १९६४ साली भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. पोलीस दलात असताना त्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे सेवा केली. १९८२ साली अरविंद इनामदार यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या १९८३ च्या तुकडीला त्यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले होते. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यातील काही अधिकारी पुढे गाजले. यामध्ये प्रदीप वर्मा[२], विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी मुंबईतील टोळीयुद्ध संपवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अकादमीमध्ये पोलिसांच्या प्रशिक्षणाबरोबर त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी इनामदार यांनी साहित्यिकांना पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांची व्याख्याने पोलिसांसाठी ठेवली.  

इनामदारांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे पहिले सहआयुक्त होण्याचा मान मिळवला होता. काही काळ ते नागपूरचे पोलीस आयुक्त होते. इनामदारांची १९८७ साली मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी निवड झाली.

ते गव्हर्नमेंट स्टाफ कमिशनचे चेरमन होते. ऑक्टोबर १९९७ ते जानेवारी २००० या कालावधीत ते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते. त्यांनी निवृत्ती होण्याआधीच पोलीस दलातून स्वेच्छा निवृत्ती घेतली.

बॉम्बे डाईंगचे अध्यक्ष नस्ली वाडीया यांच्या हत्येचा कट तसेच जळगाव सेक्स स्कॅंडल[३] आणि मानवी तस्करी (१९९४) सारख्या संवेदनशील प्रकरणांचा तपास त्यांनी केला होता. त्यांच्या काळात महाराष्ट्रात टाडा आणि मोका हे कायदे आणण्यात आले.

पोलिसांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, वेतन अशा गोष्टीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला.

२००२ मध्ये त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.

३६ वर्षांच्या पोलीस दलातील कारकीर्दीत त्यांच्या एकोणीसवेळा बदल्या झाल्या होत्या.[४]

समाजसेवा[संपादन]

२०१५ मध्ये त्यांनी अरविंद इनामदार फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेतर्फे ते दरवर्षी पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव करत.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन". Maharashtra Times. 2019-11-20 रोजी पाहिले.
  2. ^ "माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना कशी जाईल निवडणूक?" (इंग्रजी भाषेत). 2019-10-18. 2019-11-20 रोजी पाहिले.
  3. ^ "माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन". Loksatta. 2019-11-20 रोजी पाहिले.
  4. ^ "I'm scared to visit a police station, says Mumbai's former top cop". NDTV.com. 2019-11-20 रोजी पाहिले.
  5. ^ "Retired policemen honoured for past achievement". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-11-20 रोजी पाहिले.