श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी (जन्म : १९५६) हेे एक मराठी खगोल भौतिकशास्त्रज्ञ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत काम करतात. कुलकर्णी यांचा जन्म दक्षिण महाराष्ट्रातल्या कुरुंदवाड या संस्थानी गावात झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकात हुबळी येथे झाले. त्यानंतर दिल्लीच्या आयआयटीतून ते १९७८ मध्ये भौतिकशास्त्र विषयात एमएस झाले. १९९० मध्ये एका उन्हाळी वर्गात बंगलोर येथे खगोलशास्त्र या विषयावरील व्याख्याने ऐकून त्यांना खगोलशास्त्रात रस निर्माण झाला.. पुढे १९८३मध्ये डॉक्टरेट मिळविल्यानंतर ते बर्कले येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक झाले. इंटरस्टेलर मेडियम पल्सार, ब्राऊन ड्वार्फ (बटू तारे), सॉफ्ट गॅमा रे रिपीटर्स, गॅमा किरणांचे स्फोट, ऑप्टिकल ट्रान्झियंट्स हे त्यांचे संशोधनाचे विषय होत.

श्रीनिवास कुलकर्णी यानंतर, २००१ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो झाले. या संस्थेचे भारतीय फेलो केवळ दहा ते अकरा आहेत, त्यांपैकी कुलकर्णी एक आहेत. २००३ मध्ये ते नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. सध्या कुलकर्णी हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत 'स्पेस इन्फरनोमेट्री मिशन'चे सदस्य असून पालोमार व केक येथील प्रकाशीय वेधशाळांचे संचालक आहेत. रेडिओ लहरींवर काम करणारे खगोल भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सुरुवातीला ग्लोब्युलर क्लस्टर पल्सरच्या (स्पंदक तारा) शोधात काम केले होते.

कालटेकच्या स्पेस इंटरफेरोमेट्री मिशनचे ते सदस्य असून त्याचा उपयोग पृथ्वी निकटचे ग्रह व ताऱ्यांमधील अंतरे मोजण्यासाठी होतो. ‘फ्युचर’ प्रवर्गात त्यांची आश्वासक वैज्ञानिक म्हणून डॅन डेव्हिड या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. (२०१७)

याशिवाय, रॉयल सोसायटी ऑफ लंडन, युनायटेड स्टेट्स अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल नेदरलँड्‌स अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस या चार नामांकित संस्थांचेही ते सदस्य आहेत.

श्रीनिवास कुलकर्णी हे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या पत्‍नी सुधा मूर्ती यांचे भाऊ आहेत. त्यांचे आईवडील व्यवसायाने डॉक्टर आहेत.

श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांचे संशोधन कार्य[संपादन]

  • विस्तृत तरंगलांबी निरीक्षणांच्या मदतीने आकाशगंगेचा अभ्यास
  • डोनाल्ड बॅकर यांच्यासमवेत त्यांनी पहिला मिली सेकंड पल्सर (स्पंदक तारा) शोधला. त्यावेळी ते पदवीचे विद्यार्थी होते.
  • कालटेकमध्ये मिलिकन फेलो असताना त्यांनी पहिल्या ग्लोब्युलर क्लस्टर पल्सारचा शोध लावला.
  • डेल फ्रेल व तोशियो मुराकामी यांच्यासमवेत केलेल्या संशोधनात त्यांनी असे दाखवून दिले की, सौम्य गॅमा किरण ‘रिपीटर्स’ हे सुपरनोव्हाच्या अवशेषांशी निगडित न्यूट्रॉन तारे असतात व त्यांचे चुंबकीय क्षेत्र खूप उच्च असते.
  • १९९४मध्ये ग्लीस २२९ (Gliese 229) या ताऱ्याभोवती असलेल्या तपकिरी बटू ताऱ्याचा (ब्राऊन ड्वार्फचा) शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांच्या पथकात ते होते.
  • चार भुजांच्या दीर्घिकेचा शोध
  • द्वैती स्पंदक ताऱ्याचे प्रकाशीय समघटकांचा शोध.
  • पॅलोमार ट्रान्झियंट फॅक्टरी या नवीन अवकाशीय पदार्थ शोधणाऱ्या प्रकल्पात सहभाग.
  • पॅलोमार ट्रान्झिएंट फॅक्टरी म्हणजे रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करणाऱ्या यंत्रणेतून अतिप्रकाशमान नवतारा, कॅल्शियम संपृक्त नवतारा व प्रकाशमान लाल नवतारा यांचे संशोधन ते करीत असून त्यात त्यांनी ऑप्टिकल ट्रान्झिएंटचे नवे गट शोधले आहेत.
  • बाह्य तारकीय स्रोतांमधील गॅमा किरणांचे स्फोट शोधले (१९९७).
  • मिलिसेकंड पल्सार' या स्पंदक ताऱ्याचा शोध लावणाऱ्या गटातले एक सहभागीे.
  • रेणवीय ढगांचा अभ्यास
  • सौम्य गॅमा रे रिपीटर्स हे नवताऱ्याचे अवशेष असतात, हे त्यांनी दाखवून दिले.

सन्मान[संपादन]

भारताच्या पंतप्रधानांनी श्रीनिवास कुलकर्णी यांना 'ब्रेन-गेन'सदृश योजनेनुसार भारतामध्ये येऊन बारा महिने कुठलेही संशोधन करण्यासाठी 'जवाहरलाल नेहरू फेलोशिप' दिली आहे.

श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा हेलेन वॉर्नर पुरस्कार (१९९१)
  • एनएसएफचा ॲलन टी वॉटरमन पुरस्कार (१९९२)
  • इन्फोसिसचा पुरस्कार (२०१३)
  • तेल अविव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाऊंडेशनचा पुरस्कार (एक कोटी डॉलर व मानपत्र, २०१७)