पूर्वरंग
पूर्वरंग | |
लेखक | पु. ल. देशपांडे |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | प्रवासवर्णन |
प्रकाशन संस्था | श्रीविद्या प्रकाशन |
प्रथमावृत्ती | इ.स. १९६३ |
मुखपृष्ठकार | दीनानाथ दलाल |
पुस्तकातील चित्रांचे चित्रकार | शि. द. फडणीस |
पृष्ठसंख्या | २८७ |
पूर्वरंग हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले मराठी भाषेतील प्रवासवर्णनात्मक पुस्तक आहे. देशपांड्यांनी केलेल्या आग्नेय आशिया व पूर्व आशियातील देशांतील भ्रमंतीवर हे प्रवासवर्णन लिहिले आहे. इ.स. १९६२ सालच्या जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान हा प्रवास पु.ल.देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांनी केला. आग्नेय आशियातील सिंगापुरापासून प्रवासाची सुरुवात होऊन पूर्व आशियातील जपानभेटीने त्याची सांगता होते. या प्रवासात सिंगापूर व जपानाव्यतिरिक्त त्यांनी मलेशिया (तत्कालीन मलाया), थायलंड, इंडोनेशियातील जावा व बाली बेटे, पूर्व आशियातील हॉंगकॉंग या ठिकाणांस भेट दिली. तसेच, जहाजप्रवासाचा पहिला थांबा असलेल्या श्रीलंकेतील कोलंबो शहरातल्या भटकंतीचे वर्णन या पुस्तकात अंतर्भूत आहे.
या चार महिन्यांतील प्रवासात भेट दिलेल्या विविध देशांतील अनुभव, तिथे भेटलेले लोक, स्थानिक भाषा, तिथले सांस्कृतिक वातावरण, कलाप्रकार, खाद्यसंस्कृती अशांसारख्या अनेक गोष्टी पुस्तकात मांडल्या आहेत.
पुस्तकाचे मुखपृष्ठ दीनानाथ दलाल यांनी चितारले असून आतील मजकुरास समर्पक बोधचित्रे हास्यचित्रकार शि.द. फडणीस यांनी काढली आहेत.