रघुवीर नेवरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रंगकर्मी रघुवीर नेवरेकर (जन्म : १६ नोव्हेंबर १९२८; मृत्‍यू : मुंबई, २३ नोव्हेंबर २०१४) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते, नाट्यलेखक आणि नाट्यदिग्दर्शक होते. त्यांच्या स्त्री-भूमिका जशा गाजल्या तशा खलनायकाच्याही गाजल्या. त्यांनी ’पोपेबाबाली मुंबय’ या कोंकणी श्रुतिकेचे लेखन केले होते. गोवामुक्तीनंतर पणजी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेले ते पहिले नभोनाट्य होते. त्यांनी लिहिलेले ’जल्मगांठ’ नावाचे नाटक दूरदर्शनवर झाले होते. त्यात नेवरेकरांबरोबरच आशालता वाबगावकर, मोहन सुखठणकर आणि भक्ती बर्वे यांनी कामे केली होती.

धी गोवा हिंदू असोसिएशनच्या संशयकल्लोळ, शारदा, मृच्छकटिकम् नाटकांत नेवरेकरांनी काम केले होते. संशयकल्लोळमधील फाल्गुनराव, शारदामध्ये भुजंगराव या नेवरकेर यांच्या भूमिका गाजल्या. गोवा असोसिएशनच्या 'मरणात खरोखर जग जगते' या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाल्यानंतर सलग तीन वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नेवरेकरांना पटकावला होता. 'करीन ती पूर्व' या नाटकातील अभिनय पाहून विख्यात दिग्दर्शक विमल रॉयही भारावून गेले होते.

रघुवीर नेवरेकर हे एक यशस्वी उद्योजकही होते. अभिनेते अशोक सराफ व सुभाष सराफ यांचे नेवरेकर मामा लागत.

गेल्या काही वर्षांत गायक अभिनेते रामदास कामत, अभिनेते मोहनदास सुखटणकर, अभिनेत्री आशालता वाबगावकर आदी कलावंतांबरोबर नेवरेकरांनी रंगमंचावरील मराठी नाटकांत भूमिका साकारल्या होत्या.

एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवरील श्वेतांबरा या गाजलेल्या मालिकेत गायकवाड नावाच्या कोल्ड ब्लडेड व्हिलनच्या भूमिकेत रघुवीर नेवरेकर यांनी रंग भरला होता.

नेवरेकरांच्या भूमिका असलेली नाटके आणि (कंसात त्यांतील पात्रांची नावे)[संपादन]

  • एकच प्याला (गीता)
  • करीन ती पूर्व (हिरोजी/शिवाजी)
  • कुलवधू (बापाजी)
  • भावबंधन (इंदू)
  • मृच्छकटिकम्‌
  • शारदा (श्रीमंत)
  • सत्तेचे गुलाम (केरोपंत)
  • संशयकल्लोळ (फाल्गुनराव)