Jump to content

चर्चा:विवेकसिंधु

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विवेकसिंधु, मुकुंदराज, अंबेजोगाई, आंभोरा, फलटण, जैतपाळ आणि इतर

[संपादन]

विवेकसिंधु ग्रंथनिर्मितीविषयी मुकुंदराजांनी याच ग्रंथात लिहिले आहे की,

नृसिंहाचा बल्लाळु | तेयाचा कुमरु जैतपाळु |

तेणें करविला हा रोळु | ग्रंथरचनेचा ||

जैतपाळ ही व्यक्ती मुकुंदराजांकडून ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत असल्याचे स्वत: ग्रंथकर्त्याने म्हटले असल्याने जैतपाळाविषयी थोडेसे --

योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ

[संपादन]

"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--

जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करुन जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करुन जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करुनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करुन आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करुन चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करुन उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.

अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.

उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ

[संपादन]

उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--

उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उ:शापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उ:शाप दिला की तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.

यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --

जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.

अंबानगरी/आंभोरा/अंबेजोगाई आणि इतर

[संपादन]

विवेकसिंधूत मुकुंदराजांनी वैन्यागंगेचिये तीरीं | मनोहर अंबानगरीं | एवढाच उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ही अंबानगरी कोणती आणि ती तीच कशी याविषयी वेगवेगळी मते मांडली गेली आहेत. या मतमतांतरांच्या गलबल्यातून कोणते मत ग्राह्य मानावे याचा निर्णय करता येत नाही. वैनगंगा नदीच्या काठावर आंभोरे नावाचे एक गाव आहे. त्या गावात मुकुंदराजांचे आजेगुरू श्रीहर‍रिनाथ यांची समाधी आहे. (इ.स. १७५६ मध्ये कर्नाटकातील सावनूर-बंकापूर येथे लिहिलेल्या एका हस्तलिखित पोथीचा आधार सांगून कृ.पां. कुलकर्णी यांनी आदिनाथ → हरिनाथ → रघुनाथ → मुकुंदराज → नृसिंहभारती → जगन्नाथ → सहजबोध → श्रीरंग → केशवस्वामी → संतसखापूर्णबोध → पूर्णानंद अशी गुरूपरंपरा सांगितलेली आहे.) हरिनाथांचे शिष्य आणि मुकुंदराजांचे गुरू रघुनाथ यांचीही समाधी आंभोर्यात हरिनाथांच्या समाधीला जोडूनच आहे. (रघुनाथ यांची छिंदवाडा येथेही एक समाधी असल्याचे सांगितले जाते.) हरिनाथांप्रमाणेच रघुनाथांचाही संबंध आंभोरे या स्थळाशी निगडित होऊ शकतो. त्याचप्रमाणे मुकुंदराजांचाही संबंध आंभोर्याशी जोडता आला तर आंभोरे म्हणजेच अंबानगरी आणि मुकुंदराज हे त्या स्थळाशी पूर्णतया संबंधित होते या गोष्टी सिद्ध होतील. याचाच आधार घेऊन अनेक विद्वान संशोधकांनी आंभोर्याला मान्यता दिलेली आहे.

असे असले तरीही मुकुंदराजांविषयी या गोष्टी गृहीत धरताना त्यांचा या आंभोर्याशी संबंध प्रस्थापित होण्यात अडचणी असल्याचे अन्य काही संशोधकांचे मत आहे. यासाठी ग्रंथात मुकुंदराजांनीच जैतपाळाने हा ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतला असे सांगितल्याने हे संशोधक त्याचा आधार घेतात.

कृष्णदयार्णव या कवींनी मुकुंदराजांची आरती लिहिलेली आहे. त्या आरतीत त्यांनी अनेक महत्त्वाचे उल्लेख केलेले आहेत ते वरच्या जैतपाळाच्या हकीगतीशी सुसंगत आहेत. शिवाय अंबेजोगाईलाच कृष्णदयार्णवांचे वास्तव्य होते ही बाबही लक्षणीय आहे. मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी, आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. अंबेजोगाई गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. जेम्स बर्जेस याने अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती असे म्हटलेले आहे. हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे. शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही मनोहर नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या मनोहर अंबानगरीसाठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात.

प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी खेडले येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषत: जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.

डॉ. रा.चिं ढेरे यांनी बाणगंगेच्या काठचे पुरातन फलटण म्हणजेच अंबानगरी असे मत मांडले होते.

-- संतोष दहिवळ (चर्चा) २२:५५, १३ जानेवारी २०१४ (IST)[reply]

ता.क.

@V.narsikar आणि Kmohankar:

या विषयावर माझी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्याशी अनेकदा सांगोपांग चर्चा झालेली आहे. सर्वप्रथम दि. १६ ऑगस्ट २००९ यादिवशी मुक्ताईनगर (जळगाव)ला मराठी बोली साहित्य संघ (नागपूर)च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला आम्ही दोघेही प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित असताना झाल्याचे स्मरते व त्यानंतरही अनेकदा या विषयावर आमच्यात चर्चा झालेली आहे. व्यासंगी संशोधक असलेले डॉ. बोरकर यांनी विवेकसिंधुचे संपादनही केलेले आहे. झाडीपट्टीतच त्यांचे वास्तव्य असल्याने तुम्हाला अपेक्षित असलेले आणखीही अनेक संदर्भ त्यांच्याकडे उपलब्ध होऊ शकतात.

-- संतोष दहिवळ (चर्चा) २३:१९, १३ जानेवारी २०१४ (IST)[reply]

बघितले.सविस्तर नंतर लिहितो. --वि. नरसीकर १४:३९, १४ जानेवारी २०१४ (IST)

@संतोष दहिवळ: आपण अभ्यासपुर्ण माहिती दिली आहेत या बद्दल अभिनंदन. जैतपाळा बद्दल स्वतंत्र ज्ञानकोशीय लेख होऊ शकेल असे दिसल्याने आपण येथे दिलेल्या माहितीवर आधारीत जैतपाळ हा लेख बनवला.जैतपाळ लेखातील मजकुरास ओळीत संदर्भ देण्यास आपले सहकार्य लाभल्यास बरे पडेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३६, १६ जानेवारी २०१४ (IST)[reply]

@Mahitgar:
जैतपाळाचे मराठी लेखनभेद जैत्रपाळ, जयत्पाळ, जैतुगी असेही आढळतात. हा जैतपाळ म्हणजे देवगिरी शहर स्थापन करणार्या यादववंशातील पाचव्या भिल्लमाचा मुलगा होय असे काहिंचे मत आहे. यादववंशात याच्यानंतर काही जैतुगी होऊन गेलेले असल्याने आपण याला पहिला जैतुगी म्हणू शकतो. यादववंशाच्या इतिहासात याला पहिला जैतुगी असेच संबोधले जाते. प्रसिद्ध मराठी आद्यकवि मुकुंदराज हा याच्या पदरीं होता असे केतकरांच्या ज्ञानकोशात म्हटलेले आहे. (कोणी म्हणतात कीं, मुकुंदराजाचा उल्लेखित जैत्रपाळ हा चांद्याच्या बाजूचा दुसरा कोणी असावा) हे मात्र केतकरांनी कंसात नोंदवलेय याचाच अर्थ विवेकसिंधु ग्रंथ मुकुंदराजांकडून लिहून घेणारा जैतपाळ हाच पहिला जैतुगी याला केतकरांनी प्राधान्य दिलेले दिसते.
-- संतोष दहिवळ (चर्चा) १२:५६, १६ जानेवारी २०१४ (IST)[reply]

@संतोष दहिवळ:

मी हि चर्चा चालू झाल्यानंतर वाचण्यात येत असलेल्या वरवरच्या माहितीवर विसंबून आहे. आपल्या एवढ सखोल लक्ष घातलेल नाही.तरीपण एक शंका जी वाटली आपण उधृत केलेल्या ओवीत कवी मुकुंदराज स्वच्छ म्हणताहेत नृसिंहाचा बल्लाळु। तेयाचा कुमरु जैतपाळु ।; म्हणजे नरसिंह बल्लाळाचा कुमार तो जैतपाळ असेच नव्हे का ? आणि हा होयसाळ राजा दुसरा नरसिंह बल्लाळ असण्याची शक्यता अधिक वाटते कारण तो जैन धर्मानुयायी होता (या संदर्भाने मराठी विश्वकोशात काही माहिती दिसते आहे.) पण होयसाळ / होयसळ घराणे कोणत्या ठिकाणचे होते ?

"होयसाळ राजा दुसरा नरसिंह बल्लाळ याचा मुलगा जैतपाळ" आणि "होळसरांचा शत्रू यादव राजा भिल्लम पाचवा याचा सेनापती जैत्रपाळ अथवा जैतुगी " हे दोन उल्लेख परस्पर विरोधी आणि सध्यातरी माझ्याकरता कनफ्युजींग आहेत.

जैतपाळ लेखात आपण जशी जशी माहिती संदर्भा सहीत संकलीत करू तसे उलगडा होण्यास सोपे जाईल असे वाटते.महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आमचे ज्ञान तुमच्या कामगिरी मुळे वाढते आहे त्या करता मन:पुर्वक धन्यवाद.

@J: 'जे' अद्याप चर्चेत अद्याप आलेला नाहीत तुमच्या कडची माहिती सुद्धा ऐकण्यास आवडेल. [[सदस्य:|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] (चर्चा) १३:४९, १६ जानेवारी २०१४ (IST)[reply]

@Mahitgar:
नृसिंहाचा बल्लाळु | तेयाचा कुमरु जैतपाळु | यातील नृसिंहाचा बल्लाळु म्हणजे >>नरसिंह बल्लाळाचा कुमार तो जैतपाळ<< असे नसून नृसिंह आणि बल्लाळ हे वेगवेगळे आहेत नृसिंहाचा मुलगा बल्लाळ आणि बल्लाळाचा मुलगा जैतपाळ असे ते आहे. नरसिंह बल्लाळाचा मुलगा जैतपाळ असे नव्हे.
होयसळ घराणे मूळचे दक्षिणेतील द्वारसमुद्रचे. विजयनगरचे राज्य स्थापन होईपर्यंत होयसळांची सत्ता दक्षिणेत आस्तित्वात होती. शाल हा होयसळ घराण्याचा संस्थापक. विनयादित्य हा या घराण्यातला पहिला प्रसिद्ध राजा. या घराण्यातला नीप्रकम हा कल्याणीच्या चालुक्यांचा मांडलिक होता. त्यानंतर पहिल्या बल्लाळाने मूळची राजधानी बदलून म्हैसूर प्रांतात बेलूर येथे नेली. त्यानंतर त्याचा भाऊ भीतिदेव याने इ.स. १११७ साली चोलांचे गंगावदी हे ठिकाण जिंकले. इ.स. ११३७च्या सुमारास सर्व म्हैसूर प्रांतावर त्याची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्याने वैष्णव धर्माचा स्विकार केला असला तरी जैन धर्माबद्दल त्याला आस्था होती. त्यानंतरच्या नरसिंहाच्या कारकिर्दीत होयसळांची सत्ता कमी झाली. दुसर्या बल्लाळाने देवगिरीचा राजा भिल्लम याचा पराभव केला होता. याच बल्लाळाने चालुक्यांचे मांडलिकत्व झुगारुन आपले स्वातंत्र्य घोषित केले होते. परंतु या बल्लाळाला जैतपाळ नावाचा कुणी मुलगा होता याचा उल्लेख आढळत नाही. फ्लीटने दिलेल्या होयसळ वंशावळीतही जैतपाळाचा उल्लेख नाही (फ्लीटने दिलेली वंशावळ अशी - पहिला विनयादित्य - याला त्रिभुबनमल्ल देखील म्हणत. हा पश्चिमेकडील चालुक्य विक्रमादित्य सहावा, याचा मांडलिक. → ऐरयेंग किंवा एरेगंग. → पहिला बल्लाळ → विष्णुवर्धन; ह्याला उदयादित्य, बिट्टदेव, बिट्टिग, दुसरा त्रिभुवनमल्ल, भुजबलगंग, वीरगंग आणि विक्रमगंग देखील म्हणत. → एरेयंगचा तिसरा एक मुलगा उदयादित्य → विष्णुवर्धनाचा मुलगा पहिला नरसिंह ; याला वीरनरसिंह किंवा विजयनरसिंह असे देखील म्हणतात. → दुसरा बल्लाळ किंवा वीरबल्लाळ. → दुसरा नरसिंह किंवा वीरनरसिंह, याला देवगिरीच्या यादवांनी जिंकले. → सोमेश्वर; हा विक्रमपूर येथें राज्य स्थापन करून राहिला. → तिसरा नरसिंह ; यानें द्वारसमुद्र येथे राज्य केले, → तिसरा बल्लाळ किंवा वीरबल्लाळदेव; याने इ. स. १३१० च्या मुस्लिम राजवटीपर्यंत राज्य केले.)
-- संतोष दहिवळ (चर्चा) २०:०७, १६ जानेवारी २०१४ (IST)[reply]


कृपया मेल बघाल

[संपादन]

@संतोष दहिवळ आणि Mahitgar:

--वि. नरसीकर १६:३५, १६ जानेवारी २०१४ (IST)

पु.ग. सहस्रबुद्धे

[संपादन]

डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे यांनी ’महाराष्ट्र संस्कृती’ नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यातील काही उल्लेख :-

पहिला यादव सम्राट भिल्लम याने ११८७साली देवगिरी(-हा माझा शब्द!) साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या पुढच्याच वर्षी मुकुन्दराजाचा ’विवेकसिंधू’ हा मराठीतला आणि अभिमान धरणारा पहिला ग्रंथ अवतरला. यादवांनी मराठीला आश्रय तर दिलाच होता. पण मराठीचे व महाराष्ट्राचे निःसीम अभिमानी जे महानुभावपंथाचे संस्थापक चक्रधर यांचे शिष्यत्वही त्यांनी पत्करले होते. मुकुन्दराज, चक्रधर व ज्ञानेश्वर हे मराठी साहित्याचे आद्यपुरुष त्यांच्याच कारकीर्दीत उदयास आले आणि यादवांनी राजसत्तेने व त्यांनी आपल्या वाणीने महाराष्ट्राच्या सीमा व त्यांची अस्मिता यांना चिरस्थायी रूप देऊन टाकले. यादवांचे लेख मराठीप्रमाणे कानडीतही आहेत. पण त्यांची राजभाषा मराठी होती. त्यांची कर्मभूमी चालुक्य-राष्ट्रकूटांप्रमाणे महाराष्ट्र हीच होती. .............

म्हैसूर प्रांतातील द्वारसमुद्र-हळेबीड येथील होयसळ यादव हे राजघराणे म्हणजे यादवांची एक शाखा होती. पण त्यांनी आपली कर्मभूमी कर्नाटक ही मानली आणि भिल्लम यादवांच्या वंशजांनी महाराष्ट्राला स्व-राज्य मानले. यामुळे एकवंशीय असूनही ते कर्नाटकी झाले आणि हे मराठी. होयसळ यादव वीर बल्लाळ आणि देवगिरी यादव भिल्लम यांचा उदय साधारणपणे एकाच वेळी झाला. दोघेही एकवंशीय, पण दोघांमध्ये अखंड संग्राम चालू होते. त्यांत महाराष्ट्रात भिल्लमाची सत्ता दृढ झाली आणि कर्नाटकात द्वारसमुद्र येथे वीर बल्लाळाची झाली.................

भिल्लम पाचवा हा देवगिरी यादवांचा पहिला सम्राट (११४७-९१). या राजघराण्यात सर्वात श्रेष्ठ सम्राट सिंधण हा होय. (इ.स. १२१०-१२४७). त्याच्या आधी भिल्लम व त्याचा पुत्र जैत्रपाल यांनी गुजराथ, माळवा आणि कोकण हे प्रांत जिंकले होते. होयसळ यादव आणि वरंगळचे काकतीय राजे यांच्याशीही त्यांच्या अनेक झटापटी झाल्या, पण त्यांतून काही फलनिष्पत्ती झाली नाही. जैत्रपालाच्या कारकीर्दीतच ’विवेकसिंधू’ हा ग्रंथ जैत्रपालासाठीच लिहिला असे म्हणतात. या जैत्रपाल तथा ’जेतुगी’ याचा मुलगा सिंधण त्याच्यामागून देवगिरीच्या सिंहासनावर इ.स. १२१०साली बसला.यानेच यादवांच्या साम्राज्याचा विस्तार चारी दिशांनी केला. प्रारंभीच त्याने होयसळ यादवांवर मोहीम सुरू केली व ती पाच वर्षे चालवून कर्नाटकावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. नंतरच्या दोन वर्षात त्याने कोल्हापूरच्या शिलाहारांना जिंकून त्यांचे राज्य साम्राज्यात सामील करून टाकले. त्या वेळचा शिलाहार राजा भोज याचीही होयसळ, काकतीय व यादव यांच्याप्रमाणेच स्वतंत्र राज्याची स्थापना करण्याची इच्छा होती, पण सिंधणाच्या परक्रमाने ती सिद्धीस गेली नाही......सर्वत्र सिंधणाला यशच येत गेले आणि नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत आपले साम्राज्य पसरविले. काकतीय होयसळ, चालुक्य(गुजराथ) व परमार(माळवा) हे सर्व त्याच्यापुढे हतप्रभ झाले व त्याला त्यांनी सम्राट म्हणून मान्यता दिली............,...J (चर्चा) १८:४६, १६ जानेवारी २०१४ (IST)[reply]