Jump to content

जैत्रपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जैतपाळ या पानावरून पुनर्निर्देशित)

जैत्रपाल (जैतपाळ) हा कवि मुकुंदराजांकडून विवेकसिंधु हा ग्रंथ लिहवून घेण्यास कारणीभूत ठरलेला यादवकालीन राजा अथवा सेनापती होता.

विवेकसिंधु मधील ओवी

[संपादन]
नृसिंहाचा बल्लाळु । तेयाचा कुमरु जैतपाळु ।

तेणें करविला हा रोळु । ग्रंथरचनेचा ॥

उल्लेख

[संपादन]

योगेश्वरी माहात्म्यातील जैतपाळ

[संपादन]

"योगेश्वरी माहात्म्या"च्या बाविसाव्या अध्यायात जैतपाळाची कथा आलेली आहे ती अशी--

जैतपाळ हा जयंतीनगरीचा जैन राजा असून तो जैन धर्माचा प्रसारक होता. तो अभ्यासू असून जैन धर्मातील तत्त्वज्ञानाविषयीच्या वादविवादात त्याने अनेक राजांना पराभूत करून जैन धर्मात आणले होते. ज्या राजांनी अशा रितीने जैन धर्म अंगिकारला नाही त्यांना द्रव्याने, धाकाने जिंकून आपापल्या धर्मापासून भ्रष्ट करून जैतपाळाने त्यांना जैन धर्मात आणले. एवढे करूनही त्याचे समाधान न झाल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या वैदिक ब्राह्मणांना आमंत्रित करून आपल्याला सिद्धि प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर उपस्थित ब्राह्मणांनी सिद्धिप्राप्तीसाठी हवन आणि साधुसेवा हे उपाय जैतपाळाला सुचविले. त्यानुसार जैतपाळाने पापनाशिनी व जयंती या दोन नद्यांच्या संगमाच्या जागी मोठा यज्ञ चालू केला. सातव्या दिवशी यज्ञाचा पूर्णाहुतीचा विधी पार पडला आणि एकाएकी अग्निकुंडातून एक छोटे तेजस्वी बालक प्रकट झाले आणि सिद्धिप्राप्तीसाठी तू साधूंची सेवा कर असे राजाला सांगून ते बालक अंतर्धान पावले. त्यानुसार जैतपाळाने साधू व ब्राह्मणांसाठी अन्नछत्र चालू केले. अन्नछत्रात आलेल्या ब्राह्मणांना जैतपाळाने यज्ञातील बालकाची हकिगत सांगितल्यावर ब्राह्मणांनी आम्ही येथे फक्त अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी आलो आहोत आम्हाला सिद्धि वगैरे काही येत नाहीत असे सांगितल्याने जैतपाळ ब्राह्मणांवर चिडला आणि त्याने सर्व ब्राह्मणांना बंदिवान करून चणे भरडण्याची शिक्षा दिली. ब्राह्मणांनी मग योगेश्वरीदेवीचा धावा केला. योगेश्वरीदेवीने मुकुंदराजाला तिथे आणले. मुकुंदराजाने आल्यावर ब्राह्मणांकडून आणि जैतपाळाकडूनही सर्व हकीगत समजावून घेतल्यावर सर्व बंदिवान ब्राह्मणांना मुक्त करण्यास सांगितले. ब्राह्मण मुक्त झाल्यावर मुकुंदराजांनी आपल्या हातातील दंड तिथल्या जात्यावर मारल्याबरोबर जाती आपोआप फिरु लागली. या प्रकाराने जैतपाळ चकित होऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि तो मुकुंदराजांना शरण गेला. जैतपाळाने मुकुंदराजांना क्षमेची याचना करून उपदेश करण्याविषयी विनंती केली. त्याप्रसंगी मुकुंदराजांनी जो उपदेश केला त्याचीच परिणती विवेकसिंधु ग्रंथात झाली.

अशी योगेश्वरी माहात्म्यात कथा आलेली आहे. त्यातील दैवी किंवा योगसामर्थ्यावर आधारीत चमत्कारांवर भाष्य करण्याचे प्रयोजन नाही. पण या प्रसंगाशी संबंधित असल्याने मुकुंदराजांची जागा विचारात घेण्यासारखी आहे.

उद्धवसुताच्या रामदास चरित्रातील जैतपाळ

[संपादन]

उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे ती अशी--

उद्दाम आणि व्यसनी असलेला मलयगंधर्व एकदा जलक्रिडा करीत असताना नारद तिथे आला पण मलयगंधर्वाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नारदाने चिडून तू मृत्यूलोकी जन्म घेशील असा मलयगंधर्वाला शाप दिला. शापामुळे भयभीत होऊन गंधर्वाने नारदाला शरण जाऊन त्याच्याकडे उःशापाची मागणी केली. त्यावर नारदाने त्याला उःशाप दिला की तू अश्व म्हणून जन्म घेशील व तुला जोगाईचे अंबे येथील जैतपाळ राजाच्या घरी आश्रय मिळेल. तिथे तुला मुकुंदाचा हात लागेल आणि तू मुक्त होशील.

यानंतर आलेली जैतपाळाची कथा अशी --

जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे. अनेक साधु या प्रकाराने त्रासले आणि त्यांनी श्रीगुरूंचा धावा केला. त्याचवेळी मुकुंदराजांनी अवतार घेऊन ते तिथे आले. मुकुंदराजांनी सर्व साधुसंतांची तिथून मुक्तता केली. तरीही तिथले तळे खोदण्याचे काम आपोआप चालू राहिले. कुदळी, खोरे, पाट्या आपोआप कामे करीत होत्या. हा प्रकार पाहून जैतपाळ राजा चकीत झाला व मुकुंदराजांना शरण जाऊन त्याने आपली ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यांना सांगितली. मुकुंदराजांनीही त्याला बोध देण्याचे ठरवून जैतपाळाला एक घोडा आणण्यास सांगितले. जैतपाळ राजाने लगेच एक उत्तम घोडा अश्वशाळेतून आणला (तो घोडा म्हणजेच मलयगंधर्व होय) मुकुंदराजांनी राजाला घोड्यावर बसण्याची आज्ञा केली. राजा घोड्यावर बसल्यावर मुकुंदराजांनी घोड्याच्या पाठीवर थापा मारल्या त्यामुळे जैतपाळालाही विशेष अवस्था प्राप्त झाली आणि अश्वजन्मातून मलयगंधर्वाचीही मुक्तता झाली. जैतपाळाला विशेष अवस्थेतून बाहेर आणल्यावर मुकुंदराजांनी जैतपाळाला उपदेशही केला. तो उपदेश म्हणजेच विवेकसिंधु.

वास्तव्य

[संपादन]

मुकुंदराजांचे वास्तव्य असलेला मुकुंदपर्वत, जैतपाळाची कथा जिच्याशी संबंधित आहे ती अश्वदरी (घोडदरी), चणे भरडण्याची शिक्षा अमलात आणली ते ठिकाण (चणेभरड), प्रचंड जाते, जैतपाळाची गढी, आणि विशेष म्हणजे मुकुंदराजांची समाधी ही सर्व ठिकाणे आजतागायत अंबेजोगाईत आहेत. अंबेजोगाई गावाजवळून वाहणारी नदी बाण किंवा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. जेम्स बर्जेस याने अंबेजोगाई ही कलचुरी घराण्याचा एक मांडलिक राजा जैत्रपाळ याची राजधानी होती असे म्हटलेले आहे. हा राजा जैन असल्याविषयी इतिहासतज्ञांचा हवालाही त्याने दिला आहे. शं.गो. तुळपुळे यांनी अंबेजोगाई ही मनोहर नगरी होती हे दाखवून देण्यासाठी सिंघण यादवाच्या काळातील एका शिलालेखाचा हवाला दिलेला आहे. या शिलालेखातील वर्णनात अंबेजोगाई नगरीच्या ऐश्वर्याच्या खुणा दिसतात. मुकुंदराजांनी केलेल्या मनोहर अंबानगरीसाठी तुळपुळे या माहितीचा उपयोग करतात. नगरी हे संबोधन सार्थ ठरावे एवढी ही नगरी मोठी होती आणि संपन्नतेने मनोहर होती असे ते म्हणतात.

प्रा. डोळके यांनी जैतपाळाची राजधानी खेडले येथे तळे, चणे भरडण्याची जागा, अश्वदरी, जैतपाळाची गढी, विशेषतः जैतपाळाची समाधी आणि त्याच्या घोड्याचीही समाधी आहे असे म्हटलेले आहे. यापैकी शेवटच्या दोन समाध्या अंबेजोगाईत नाहीत किंवा आजवर आढळलेल्या नाहीत.


हे सुद्धा पहा

[संपादन]