सानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सानिया या मराठीतील एक कथालेखिका आहेत. कथा, दीर्घकथा, कादंबरी असे साहित्यप्रकार हाताळत आशयघन आणि प्रयोगशील असे लेखन त्यांनी केले आहे.

पूर्वायुष्य[संपादन]

सानिया (जन्म : सांगली, १० नोव्हेंबर १९५२) यांचे पूर्ण नाव सुनंदा कुलकर्णी. वडलांच्या सतत बदल्या होत असल्याने त्यांचे शिक्षण अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आणि मुंबई येथील सहा शाळा आणि तीन काॅलेजांतून झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.काॅम.ची पदवी १९७२ साली, तर एम.काॅम.ची पदवी मुंबई विद्यापीठातून १९७४ साली घेतली.

शिक्षण संपल्यावर सुनंदा कुलकर्णी यांनी मुंबईतील व्होल्टास कंपनीत (?) काहीकाळ नोकरी केली, त्यावेळी त्यांची ओळख बलरामन यांच्याशी झाली. लगनानंतर सुंनंदा कुलकर्णी सुनंदा बलरामन झाल्या. नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने सानिया ह्यांचे मद्रास, बेंगलोर, भुवनेश्वर आदी शहरांत वास्तव्य झाले.

सानिया यांनी अमेरिका, इटली, चीन, जपान, जर्मनी, पाकिस्तान, फ्रान्स आदी देशांचाही प्रवास केला आहे. या सर्व अनुभवांचा प्रत्यक्ष प्रत्यय त्यांच्या लेखनात दिसून येतो.

लेखन[संपादन]

१९६८ साली ’हरवलेली पाऊलवाट’ ही त्यांची पहिली कथा ’श्री’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी सातत्याने कथालेखन केले. १९६८ ते१९७५ या काळात सानियांच्या कथा ’स्त्री’, ’मनोहर’, ’किर्लोस्कर’, ’युगवाणी’ आदी नियतकालिकांत प्रकाशित झाल्या. सन १९७५नंतर ’सत्यकथा’, ’मौज’ या मासिकांतून केलेले त्यांचे कथालिखाण लक्षणीय ठरले. पुढे ’हंस’, ’दीपावली’, ’साप्ताहिक सकाळ’, ’मिळून साऱ्याजणी’, ’माहेर’, ’कालनिर्णय’, ’अक्षर, ’अनुभव’ आदी नियतकालिकांमधून सानियांच्या कथांना विशेष प्रसिद्धी मिळाली. इ.स. २०१४पर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

सानिया यांची प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • अवकाश (कादंबरी)
  • अशी वेळ (कथासंग्रह-२०१४)
  • आवर्तन (कादंबरी)
  • ओमियागे (कथासंग्रह)
  • ओळख (कथासंग्रह)
  • खिडक्या (कथासंग्रह)
  • दिशा घरांच्या (कथासंग्रह)
  • परिणाम (कथासंग्रह)
  • पुन्हा एकदा (कथासंग्रह-२०१५)
  • प्रतीती (कथासंग्रह)
  • प्रवास (ललित लेखन)
  • प्रयाण (कथासंग्रह)
  • भूमिका (कथासंग्रह)
  • वलय (कथासंग्रह)
  • वाटा आणि मुक्काम (ललित लेखन-सहलेखक आशा बगे, भारत सासणे, मिलिंद बोकील)
  • शोध (कथासंग्रह-१९८०)
  • स्थलांतर (कादंबरी). डाॅ. अलका कुलकर्णी यांचे याच नावाचे एक पुस्तक आहे.

संदर्भ[संपादन]

  • सानिया, प्रवास (राजहंस प्रकाशन, २००९)
  • सानिया वाटा आणि मुक्काम (मौज प्रकाशन, २००९)