Jump to content

सालीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग] लागवडीत असलेली ही एक उपयुक्त ओषधीय ओषधि] वनस्पती आहे. इंग्रजीतील ‘सॅलड’ या संज्ञेवरून सालीट व सालड ही मराठी नावे आली आहेत. अनेक भाज्या कच्च्या स्वरूपात मिसळून केलेल्या खाद्यपदार्थास सॅलड म्हणण्याचा सामान्य प्रघात आहे तथापि फक्तलेट्यूस या ओषधीलाही सॅलड म्हणतात. ही मुख्यतः त्या पद्घतीने (फक्त पाने) खाण्यास पिकविली जाते. ही मूळची द.यूरोप व प. आशियाच्या समशीतोष्ण प्रदेशामधील उबदार भागातील असून हिमालयात आणि समशीतोष्ण उ. आशियात व उ. आफ्रिकेत आढळणाऱ्या लॅक्ट्यूका सेरिओला (काटेरी लेट्यूस) या रानटी पूर्वजापासून अवतरली असावी असे मानतात म्हणून तिला लॅ.सेरिओला (स्कॅरिओला) प्रकार सटायव्हा असेही म्हणतात. तिची लागवड जगभर करतात. ह्यादोन्ही जातींचे परस्परांशी संकरण होते. हिच्या एकूण शंभरावर जाती असून लॅक्ट्यूका प्रजातीतील २०–२५ जाती भारतात आढळतात.

सालीट ही ०·५–१·२ मी. उंच सरळ वाढणारी वर्षायू (एक वर्षभर जगणारी ) वनस्पती असून मूलज (गड्ड्यावरच्या) पानांचा झुबका भूमिस्थित लहान खोडापासून येतो. पाने चुरचुरीत, साधारण जाड, गोलसर १२·५–२५ सेंमी. व कुरळी असून फुलांच्या आधी येतात. पिवळ्या किरण पुष्पकांनी भरलेली स्तबके [⟶ पुष्पबंध] परिमंजरीप्रमाणे पुढे लांब दांड्यावर येतात. कृत्स्नफळ (एकबीजी शुष्क फळ) लांबट, लहान, गर्द भुरे किंवा करडे असून त्याला पांढऱ्या केसांचा झुबका असतो. पाश्चात्त्य देशांत खाण्यास ही अधिक लोकप्रिय आहे. ती कधीकधी उकळून घेतात किंवा तिचे लोणचे करतात. अवेळी केलेल्या लागवडीमुळे ती कधी कडवट लागते परंतु प्रमुख ऋतूंतील फुलोरे चुरचुरीत, रसाळ व चवदार लागतात. पाने चिरून त्यांत भरपूर दूधसाखर घालून ठेवून नंतर खाण्यास चांगली लागतात. ही वनस्पती पौष्टिक जीवनसत्त्वे व खनिजे यांनी समृद्घ असून त्यांतील लॅक्ट्यूकॅरियम हे औषधी द्रव्य दमा आणि श्वासनलिकादाह यांवर उपयुक्त असते. पानांचे पोटीस वेदनायुक्त व्रणावर व पोळल्यावर बांधतात.

पोषणाच्या बाबतीत ⇨ फुलकोबी, ⇨ शतावरी व सेलरी यांच्याशी सालीट तुल्य आहे. याच्या ताज्या पानांत प्रतिशत प्रमाणात ९२·९ पाणी, २·१ प्रथिने, ०·३ ईथर अर्क, ०·५ तंतू, ३·० कार्बोहायड्रेटे आणि १·२ खनिजे असतात. यांशिवाय प्रति १०० ग्रॅममध्ये कॅरोटीन (जीवनसत्त्व अ) २,२०० आंतरराष्ट्रीय एकक, जीवनसत्त्व ब१ २७० मायक्रोग्रॅम, निकोटिनिक अम्ल ०·४ मिग्रॅ., रिबोफ्लाविन १२० मायक्रोग्रॅम व जीवनसत्त्व क १५ मिग्रॅ. असते. तसेच यात फॉलिक अम्ल असते. ह्या वनस्पतीत पांढरा ⇨ चीक असतो तो सुकवून त्यातून लॅक्ट्यूकॅरियम हे औषधी द्रव्य मिळते (त्यावरून लॅक्ट्यूका हे शास्त्रीय नाव आले ). खराब फुलोरे व बाहेरील पाने गुरांना चारतात टाकाऊ पानांपासून कॅरोटीन, क्लोरोफिल (हरितद्रव्य) व झँथोफिल असलेले तेल कार्बनी विद्रावक वापरून वेगळे काढतात शेषभागात सु. २४% प्रथिन राहते ते गुरांना खाद्य म्हणून देतात.

इतिहास

[संपादन]

लेट्यूस ही वनस्पती बरीच प्राचीन आहे. ⇨ऑगस्टीन पीराम दे कांदॉल यांच्या मते ती सु. २,००० वर्षांपेक्षा अधिक वर्षे लागवडीत असावी. ग्रीक लोकांनी हिचे तीन प्रकार लागवडीत आणले होते. इराणी राजांनी इ. स. पू. ५५० वर्षे या काळात तिचा उपयोग केला होता. ग्रीक व रोमन लोकांना तिचे औषधी महत्त्व माहीत होते. हल्ली ‘रोमेन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सालिटाचा प्रकार व आणखी काही प्रकार मूर लोकांनी बनविले होते. इतकेच नव्हे तर हल्लीचे अनेक प्रकार यूरोपमध्ये मध्ययुगापूर्वीपासून माहीत होते. सध्या सालिटाचे अनेक प्रकार व वाण लागवडीत असून हेड, कॉस, रोमेन आणि काही खंडित पानांचे प्रकार (उदा., क्लस्टर अथवा झुबकेदार) हे त्यांपैकी प्रमुख होत. पाचव्या शतकाच्या सुमारास चिनी लोक काही संवर्धित प्रकार वापरीत होते. कोलंबस यांनी ही वनस्पती अमेरिकेत नेली असावी, असे म्हणतात. सोळाव्या शतकाच्या आसपास हिचा ‘हेड’ हा प्रकार सामान्यपणे उपयोगात होता.

लागवड

[संपादन]

सालिटाची लागवड यूरोप, भारत आणि इतर अनेक देशांत करतात. याचे तीन प्रकार आहेत:

  1. लांब हिरव्या सरळ पानांचा
  2. कुरळ्या तोकड्या पानांचा आणि
  3. फुलकोबीच्या गड्ड्यासारखा गड्डा असणारा

जमीन, मशागत, खत, आखणी, रोपे तयार करणे, पाणी देणे व वरखते घालणे ही कामे फुलकोबीच्या पिकाप्रमाणे करतात. रोपे सरीमधून २२–३० सेंमी. अंतरावर आणि पाटाच्या कडेने लावतात. लागणीपासून ५-६ आठवड्यांनी खाण्यासाठी पाने खुडतात. पाने तशीच कच्ची अगर कोशिंबीर करून खातात. एक हेक्टर क्षेत्रामधून ७,०००–८,००० किग्रॅ. वजनाची पाने मिळतात.