शतावरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शतावरी (संस्कृतमध्ये नारायणी; शास्त्रीय नाव ॲस्पॅरेगस रेसिमोसस) ही एक पर्णहीन, काटेरी, बहुवार्षिक आरोहिणी वेल आहे. खोडावर वाढणाऱ्या लांब व मोठय़ा फांद्यांना अनेक पेर असतात. या प्रत्येक पेरावर लहान, हिरव्या, एकाआड एक उपफांद्या असतात. या फांद्यांना ‘पर्णकांडे’ म्हणतात. या पर्णकांड्या पानांप्रमाणे भासतात. ही ‘पाने’ बारीक असून सुरूच्या पानासारखी दिसतात. फांद्यांवर साधारणपणे १ सें.मी. लाबीचे बाकदार काटे असून ते खालच्या बाजूस वाकलेले असताता. ही ‘पाने’ २ ते ६ च्या संख्येच्या गुच्छात उगवणारी २ ते ३ सें.मी. पर्यंत लांब असतात. लांब फांद्यांवर पेरावर टोकदार, वाकडे काटे असतात. शतावरी आधारास गुंडाळून घेते व वर चढते आणि अनेक फांद्या तयार होऊन लहान काटेरी झुडूप तयार होते.

शतावरी

फुले, फळे, मूळ आणि बिया[संपादन]

फुले पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची असून गुच्छात येतात. फळ वाटाण्याच्या आकारमाना असून त्यामध्ये एक किंवा दोन मिरीएवढ्या बिया असतात. झाडाची मुळे जाड, लांबट गोल असून दोन्ही टोकाकडे निमुळती असतात. यांनाच कंद असे म्हणतात. कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे. शतावरीची मुळे जमिनीखाली बुंध्याजवळ झुपक्याने वाढतात. एका वेलीस अनेक मुळ्या फुटतात साधारणतः १०० मुळ्या एकावेळी फुटल्यामुळे तिला शतावरी असे नाव पडले आहे. मुळांच्या वर पातळ करडय़ा रंगाचा पापुद्रा असतो, तसेच मुळाचा मधला भाग पिवळसर रंगाचा आणि टणक असतो. मुळांचा औषधात वापर करताना हा भाग काढून टाकावा लागतो.

आढळ आणि घरगुती वापर[संपादन]

शतावरीला शास्त्रीय परिभाषेत Asparagus racemosus असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुटुंबातील आहे. शतावरी ही मूळची भारतीय असून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात समुद्रसपाटीपासून ४००० फूट उंचीपर्यत सर्व देशभर वाढताना दिसते. भारतात सह्याद्री डोंगररांगांत, सातपुडा पर्वत रांगांत व कोकणात शतावरीच्या वेली खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर तसेच जंगलातही आढळतात. शोभेचे झाड म्हणून शतावरी घरोघरी लावलेली दिसते.[१]

आपल्याकडे शतावरीचा आणखी एक प्रकार आहे. त्याला भाजीची शतावरी असे म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव Asparagus officinalis असे आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्रान्समधील मिलिल फोर्ट, चीनमधील तैवान, जपान वगैरे देशात ही वनस्पती ॲस्परेगसची भाजी म्हणून खाल्ली जाते. ॲस्परेगसची लागवड पूर्वीपासून काश्मीर, भूतान या थंड प्रदेशात होत आली आहे. या भाजीचे कोवळे कोंब चवदार, आरोग्यवर्धक तर आहेतच याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए व सी, पोटॅशियम, रिबोफ्लेव्हिन व थायमिन ही औषधी तत्त्वे आहेत. या कोंबांपासून चविष्ट असे सूप तयार केले जाते. आपल्याकडे मेरी वॉशिंग्टन ह्या जातीच्या ॲस्परेगसची शिफारस केली जाते.

औषधी उपयोग[संपादन]

शतावरीच्या मुळ्या आणि अंकुर या भागांपासून औषधी रसायने मिळवतात. शतावरीपासून शतावरी घृत, विष्णू तेल, शतावरी कल्प तसेच प्रमेह मिशतेल तयार केले जातात. शतावरीचे नारायण तेल हे अर्धाग व संधिवातासाठी उपयुक्त आहे. शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्‌स, फॉस्फरस, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन, पोटॅशियम, कॅल्शियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृद्धी, मुतखडा, अपस्मार व रक्तशुद्धीसाठी केला जातो. स्त्रियांसाठी शतावरी इतके दुसरे उत्तम औषध नाही. कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशींमध्ये जास्त दूध मिळण्यासाठी केला जातो. शतावरी कल्प हा शतावरीच्या कंदापासून बनविला जातो. हा कल्प दुधातून नियमित घेतल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसचे शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू व संधिवातावर गुणकारी आहे. शतावरी ही वाढलेला रक्तदाब कमी करीत असल्याने ती हृदय रोगात वापरतात. तसेच ही स्मृतिवर्धक कार्य करते. मासिक पाळीत अंगावरून खूप स्राव जाणे ही, नव्याने पाळी येणाऱ्या तरुण मुली व पाळी जाण्याच्या मेनोपॉझच्या काळात या तीनही तक्रारींमध्ये स्त्रियांना शतावरी वनस्पतीची मदत होते. स्त्रियांमध्ये सुलभ प्रसूतीसाठी हिचा वापर केला जातो.[२]

शतावरीची शेती[संपादन]

शतावरीची लागवड केल्यानंतर ती सतत १४-१५ वर्षे जमिनीत टिकून राहते व बागायती असल्याने उत्पन्न येणे चालू राहते. लागवडीनंतर एका वर्षांने कोंब तयार होतात. भारतातील सर्व फार्मसी शतावरीच्या मुळ्या विकत घेतात. भारताबाहेरही त्यांना मागणी असते. अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी या तिन्ही औषधशास्त्रांत शतावरीच्या मुळ्या वापरतात.

आधार[संपादन]

शेती फायद्याची : औषधी सुगंधी वनस्पती-(फेब्रुवारी-२००५), डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

अधिक माहितीसाठी बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. http://www.loksatta.com/healthit-news/plants-medicinal-tree-in-your-home-gallery-during-rainy-season-141212/
  2. http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/health-wealth/-/articleshow/2504622.cms