Jump to content

दत्ताराम कृष्ण सुकथनकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्ताराम कृष्ण सुकथनकर हे सुप्रसिद्घ गोमंतकीय कोकणी साहित्यिक होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२४ रोजी माशेल, गोवा येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी आणि माध्यमिक शिक्षण फोंडा येथील आल्मेदा हायस्कूल येथे झाले. १९४५ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये घेतले आणि त्यानंतर ‘ एसकोला मेडिका ’ ( Escolo Medica ) या गोव्यातील तत्कालीन नामांकित वैद्यक महाविद्यालयातून त्यांनी वैद्यक शास्त्राची पदवी प्राप्त केली (१९५३). त्यानंतर गोवामुक्ती लढ्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला. सुटका झाल्यानंतर ते मुंबईला गेले.

सुकथनकरांचा मूळ पिंड सेवाभावी असल्याने त्यांनी सुरुवातीला वर्धा येथील गांधी कुष्ठरोग निवारण केंद्रात आणि नंतर मुंबईतील ‘एकवर्थ लेप्रसी होम’ येथे काम करून रुग्णसेवा केली आणि नंतरच स्वतःचा खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

वैद्यक व्यवसायाबरोबरच द. कृ. सुकथनकरांची साहित्यसेवाही चालू होती. नर्मविनोदी, सहजसुंदर शैलीत लिहिलेले त्यांचे कोकणी भाषेतील ललित निबंध त्याकाळी अनेक नियतकालिकांत प्रसिद्घ होत. अशाच काही वेचक नि बं धां चा संग्रह मान्नी पुनव (१९७७, म. शी.‘मालिनी पौर्णिमा ’)प्रकाशित झाला. गोवामुक्तीच्या (१९६१) आधीच्या व नंतरच्या काळातील गोव्यातील जनजीवन व व्यक्तिरेखा यांचे खुमासदार विनोदी चित्रण द. कृ. यांनी या पुस्तकात केले आहे. हे पुस्तक कोकणी विनोदी वाङ्‌मयात मोलाची भर घालणारे ठरले आणि त्याला गोवा कला अकादेमी तसेच साहित्य अकादेमी या दोन्हींचे पुरस्कार लाभले (१९७८). गोव्यात राहून तत्कालीन कोकणी-मराठी भाषावादात अडकण्यापेक्षा मुंबईत राहूनच मातृभाषेची शक्य तितकी सेवा करणे त्यांनी पसंत केले. त्यांनी मोजकेच लेखन केले पण ते दर्जेदार व लक्षणीय ठरले. पुढे, महाराष्ट्रात वास्तव्य करून असलेल्या, साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त लेखकांसाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर केले. त्यांतील १९९० सालच्या मानकऱ्यांत द. कृ. यांचाही समावेश होता. ते साहित्य अकादेमी, नवी दिल्लीच्या कोकणी सल्लागार मंडळाचे सदस्य होते (१९७९–८२). सुकथनकर आपल्या ललित निबंधांतून मानवी अहंकार व दुर्गुण यांवर खेळकर, औपरोधिक शैलीत भाष्य करतात पण त्यात कटुता मुळीच नसते. विनोदनिर्मितीसाठी त्यांनी कधीच सभ्यतेच्या व सदाभिरुचीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. गोवामुक्तिपूर्व काळातील गोव्यातील सामाजिक रुढी व रीतिरिवाजांचे तसेच गोवेकरांच्या वैशिष्टय्पूर्ण बोली भाषेच्या धाटणीचे मनोज्ञ दर्शन त्यांच्या काही निबंधांतून घडते. साध्या दैनंदिन बोली भाषेत लिहिलेले हे निबंध त्या शैलीमुळेच आकर्षक व वाचनीय ठरले आहेत.

सुकथनकर यांना प्रवासाची फार आवड होती. त्यांनी जवळजवळ सर्व भारतभर प्रवास केला. ते अजातशत्रू होते. वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य त्यांनी केवळ लेखन-वाचनालाच वाहून घेतले.

वृद्घापकाळाने त्यांचे २९ ऑगस्ट २००५ रोजी मुंबई येथे निधन झाले.