Jump to content

समुद्री प्रवाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महत्त्वाचे समुद्री प्रवाह. एन.ओ.ए.ए.चा नकाशा.
१९४३मध्ये काढलेला समुद्री प्रवाहांचा नकाशा
All the world's currents on a continuos ocean map

पृथ्वीवरील समुद्र व महासागरातून सतत एकाच दिशेने वाहत असणाऱ्या पाण्याला समुद्री प्रवाह असे नाव आहे. हे प्रवाह गरम किंवा गार पाण्याचे असतात. पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व चंद्राचे गुरुत्वाकर्षण ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनाऱ्याचा आकार, इ. सुद्धा या प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करतात. हे पाण्याचे प्रवाह हजारो किमी लांबीचे असू शकतात. समुद्री प्रवाहांचा पृथ्वीवरील बहुतांश भागातील हवामान व ऋतूंवर प्रभाव आहे. गल्फ स्ट्रीम याचे उत्तम उदाहरण आहे. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे वायव्य युरोपचे हवामान त्याच अक्षांशावरील इतर भूभागांपेक्षा बरेच गरम असते. याचप्रकारे कॅलिफोर्निया प्रवाहामुळे विषुववृत्तीय पट्ट्यात असलेल्या हवाई बेटांवरील हवामान समशीतोष्ण आहे.

प्रवाहांमागची कारणे

[संपादन]

पृष्ठभागावरील प्रवाह सहसा वाऱ्यामुळे तयार होतात. यानुसार हे प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात उलट्या दिशेने वाहतात. एकमन स्पायरल परिणामामुळे[मराठी शब्द सुचवा] पाण्यातील प्रवाह वाऱ्याच्या दिशेला एक विशिष्ट अंश करून वाहतात. पृथ्वीच्या काही भागातील वाऱ्यांची दिशा ऋतूंप्रमाणे बदलते. त्याचबरोबर तेथील समुद्री प्रवाहही आपली दिशा बदलतात.

खोलवर वाहणारे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतांमुळे तयार होतात. थर्मोहेलाइन सर्क्युलेशन [मराठी शब्द सुचवा] हे घनतेच्या तफावतामुळे महासागराच्या तळाशी वाहणारे प्रवाह आहेत. हे पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात.

वेगवेगळ्या भागांतील पाण्याचे तापमान हेही समुद्री प्रवाहांमागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही. असे पाणी पृष्ठभागावर येते तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते. या हालचालींमुळे प्रवाह निर्माण होतात. विषुववृत्तीय प्रदेशात गरम झालेले पाणी वर येता ध्रुवीय प्रदेशांकडचे गार पाणी खोल प्रवाहातून येथे खेचले जाते तर गरम पाणी ध्रुवीय प्रदेशांकडे पृष्ठभागावरून वाहत राहते.

पृष्ठभागांवरील प्रवाहातून महासागरांतील १०% पाणी वाहते. वरच्या ४०० मीटरपर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील प्रवाह समजले जातात. या प्रवाहांना स्वेर्डप (sv) या एककानिशी मोजले जाते. एक स्वेर्डप म्हणजे १० घनमीटर प्रतिसेकंद प्रवाह आहे.

प्रवाहांबद्दलची माहिती व परिणाम

[संपादन]

समुद्री प्रवाह हे अनंत काळापासून वाहत आलेले आहेत. या प्रवाहांतून त्याच दिशेने प्रवास करणाऱ्या जहाजांना इंधन व वेळ कमी लागतात तर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या जहाजांना जास्त. म्हणून खलाशांनी समुद्री प्रवाहांचे ज्ञान पूर्वीपासून आत्मसात केलेले आहे. उलट दिशेने प्रवास करायचा झाल्यास खलाशी थोडेशी वाट बदलून एखादा प्रवाह पकडतात व वेळ वाचवतात. शिडाची गलबते असताना हे जास्त महत्त्वाचे होते. उदा. पोर्तुगीझ शोधकांना आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत सोसाट्याने दक्षिणेकडे वाहणाऱ्या अगुल्हास प्रवाहामुळे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत उत्तरेस येणे अवघड झाले व त्यामुळे त्यांचे भारतात आगमन होण्यास अनेक वर्षे जास्त लागली. हाच प्रवास आफ्रिकेचा किनारा सोडून किंचित पूर्वेकडून केला असता, किंवा अरबी समुद्राला काट मारून थेट पूर्वेकडे आले असता अनेक आठवड्यांचे वेळ वाचतो. डीझेल किंवा अणुऊर्जावर चालणारी जहाजे व पाणबुड्याही अशा प्रवाहांचा आजही उपयोग करतात.

समुद्री प्रवाहांमुळे पृथ्वीच्या विविध भागातील प्रजातींचे आवागमन होत राहते. समुद्री ईलसामन माश्यांचे जीवन याचे उदाहरण आहेत.

समु्द्रातील अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी प्रवाहांची माहिती आवश्यक आहे. तसेच या अवशेषांवरून प्रवाहांचाही अभ्यास होतो.

महासागरांतील मुख्य प्रवाह

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "Surface Currents in the Atlantic Ocean". 2008-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-06 रोजी पाहिले.