Jump to content

आरास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजा, धर्मगुरू, देवदेवता इत्यादिकांच्या आसनाची व आसनाभोवतीची विविध सुंदर वस्तूंनी व आकर्षक रीतीने केलेली मांडणी. अशा प्रकारची आरास राजे, धर्मगुरू, साधुसंत यांचे समारंभ, निरनिराळे आनंदाचे सोहळे, देवदेवतांचे उत्सव इ. प्रसंगी करतात. देवालयातील किंवा देवघरातील मूर्तीसमोरील समया, निरांजने, धुपाटणे इ. वस्तूंची मांडणी शंख व घंटा, देवादिकांची चित्रे, फुलांमंजिऱ्यांच्या माळा, बेलपत्रींची रास, मूर्तीचे पितांबर, डोक्यावरील मुकुट, गळ्यातील मूल्यवान अलंकार व अन्य आभूषणे या सर्वांमुळे वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता व मांगल्य निर्माण होते.

गणपती, चैत्रगौर किंवा ज्येष्ठा गौर यांना मखर घालतात. त्यांसमोर आरास मांडण्यापूर्वी त्यांस विविध अलंकार, वस्त्रेभूषणे वा फुलांचे हारतुरे यांनी सजविण्यात येते. गौरीसमोर कलापूर्ण रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात येतात. समोरील भागात उतरत्या पायऱ्यांसारखी मांडणी करून त्यांवर आकर्षक कापडांच्या पायघड्या घालण्यात येतात आणि त्यांवर शाडू, लाकूड, हस्तिदंत, प्‍लॅस्टिक, कापड व धातू यांच्या रंगीबेरंगी बाहुल्या, विविध प्राण्यांची चित्रे वा मूर्ती व इतर मनोरम वस्तू यांची चित्तवेधक मांडणी करण्यात येते. आरास अधिक शोभिवंत करण्यासाठी रंगीत कापडाचे छत, पडदे, झालर वगैरे लावून कधी कधी तिच्याभोवती फुलझाडांच्या कुंड्याही ठेवण्यात येतात तसेच मागील बाजूस आरसे लावून अवतीभवती दिव्यांची रोषणाई करण्यात येते. त्यामुळे रात्रीदेखील आरास मनोवेधक वाटते. गौरी-गणपती समोर ठेवण्यात येणारी फळे तसेच लाडू, करंज्या, चिरोटे, शेव, चकल्या इ. खाद्यपदार्थांची ताटे शोभेत भरच घालतात.

महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, आंध्र व तमिळनाडू इ. प्रांतांतूनही विविध प्रसंगी आरास मांडण्यात येते. तमिळनाडूमध्ये कोलुवू या समारंभासाठी स्त्रिया व मुली वर्षभर मातीच्या व धातूच्या बाहुल्या जमवितात आणि नवरात्रप्रसंगी त्यांची आरास मांडतात. या आराशीच्या मध्यभागी एक मंगल कलश ठेवून त्यावर सरस्वतीची स्थापना करतात. तिचे पूजन करून तिला फुलमाळांनी सजवितात. तिच्यासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात. कधी कधी चित्ताकर्षक निसर्गदृश्येही उभारतात.

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीसमोर केलेली आरास म्हणजे एक कलात्मकतेचे दर्शन घडविणारी बाब झाली आहे. या आराशीतील मध्यवर्ती आकर्षण गणेशमूर्ती असून तिच्याभोवती अन्य प्रकारची सजावट उभारण्यात येते. या सजावटीमध्ये विविध निसर्गदृश्ये, ऐतिहासिक किंवा पौराणिक घटना-प्रसंग, दर्शनीय चित्राकृती, रंगीत दिव्यांची वैचित्र्यपूर्ण रोषणाई अशा विविध मनोहर देखाव्यांचा समावेश होतो. संपूर्ण सजावटीत एक प्रकारचा समतोल व रंगसंगती साधून उभे केलेले हे एक कलात्मक प्रदर्शनच असते.