हरिहरालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिहरालय राजधानीतील प्राचीन बकाँग मंदिर

हरिहरालय हे प्राचीन ख्मेर साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते.[१] सध्याच्या सध्याचे कंबोडिया हे प्राचीन कंबोज या नावाने ओळखले जात असे. कंबोडियातील सिएम रीप शहराच्या जवळ[२], अंगकोर थोम परिसराच्या जवळच हे ठिकाण असून रोलुओस या नावाने आता हे ठिकाण ओळखले जाते.अंगकोर थोम ही प्राचीन ख्मेर साम्राज्याची शेवटची राजधानी होती असे मानले जाते.[३] येथे प्राचीन ख्मेर राजवटीचे अवशेष आहेत.[४] इसवी सनाच्या नवव्या शतकातील कंबोडियातील अंगकोर साम्राज्य आणि ख्मेर राजवटीचा सुवर्णकाळ व हिंदू संस्कृतीचा प्रभाव या ठिकाणी अवशेषांच्या रूपांत पहायला मिळतो.[५] या राजधानीची उपराजधानी म्हणून अमरेंद्रपूर नावाची उपराजधानी जयवर्मन राजाने वसविली होती.[६]



नावाची व्युत्पत्ती[संपादन]

पूर्व अंगकोर काळातील ठिकाण म्हणून इतिहासाच्या दृष्टीने हे स्थान महत्त्वाचे आहे. हिंदू देवता हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव यांच्या नावाने या ठिकाणाचे जोडनाव तयार करण्यात आलेले आहे. कंबोडियामध्ये आढळणारी हरिहर ही स्थानिक देवता असून यांच्या मूर्तींची एक बाजू शिवाची आणि दुसरी बाजू विष्णूची असते.

हरिहर मूर्ती

शिव आणि विष्णू या हिंदू देवतांप्रती राजांनी आपला आदर व्यक्त करून आपल्या राजधानी शहरात मंदिरे बांधली. हरिहरालय राजधानीत ही अशी मंदिरे निर्माण केली आहेत.[६]

ऐतिहासिक महत्त्व[संपादन]

इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या शेवटी कंबोडियाचा सम्राट दुसरा जयबर्मन याने टॉनल तळ्याच्या परिसरातील मोठा प्रदेश काबीज केला. या प्रदेशाची राजधानी म्हणून त्याने हरिहरालयाची स्थापना केली. त्यानंतर मात्र त्याने स्वतःला एकछत्री सम्राट म्हणून घोषित केल्यानंतर महेंद्र पर्वत येथे आपली राजधानी नेली. त्यानंतर तो हरिहरालय येथे परतला आणि इ.स. ८३५ मधे तेथेच त्याचा मृत्यू झाला.[७] जयवर्धन याचा मुलगा इंद्रबर्मन व त्याचा मुलगा जयबर्मन याने अंगकोर साम्राज्याची स्थापना केली. या साम्राज्यात त्याने हिंदू देवतांची मंदिरे बांधली. पूल, राजवाडे अशा उपयुक्त वास्तूही बांधल्या. इ.स.१८६० साली फ्रेंच अभियंता हेन्री याने या प्राचीन वास्तूंचा शोध लावून त्या जगासमोर आणल्या.[८] कंबोडिया म्हणजे प्राचीन कंबुज देशातील हिंदू राजे. हे सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या प्रगल्भ शासक म्हणून मान्यता पावले. हिंदू संस्कृतीची जोपासना करीत त्यांनी आपला राज्यविस्तार केलाच पण त्या जोडीने हिंदू सभ्यता, शासनपद्धती यांचा अवलंब करून आपले साम्राज्य सुस्थिर आणि समृद्ध केले.[६] ख्मेर राजवटीच्या प्रत्येक राजाने एक नवे नगर विकसित केले. राजधानीचे शहरही नावारूपाला आणले आणि प्रत्येक नवे शहर सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या समृद्ध असेल याचीही काळजी घेतली.[९]

सांस्कृतिक महत्त्व[संपादन]

व्यापाराच्या, प्रवासाच्या निमित्ताने भारतातील संस्कृती भारताबाहेरील देशांत जाऊन प्रसार पावली आणि तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक संदर्भांवर तिचा प्रभाव पडला, याचे उदाहरण म्हणून हरिहरालय या कंबोडियातील ठिकाणाकडे पाहता येईल.[१०] गणित, ज्योतिष, योग अशा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाच्या विषयांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था कंबोज देशात केली गेलेली होती. भारतातून तिथे गेलेल्या महर्षींनी आपली गुरुकुले स्थापन करून तिथे ज्ञानदान सुरू केले.[९]

हे ही पहा[संपादन]

अंगकोर वाट

कंबोडिया

संदर्भ[संपादन]

  1. ^ Congress, Library of (2010). Library of Congress Subject Headings (इंग्रजी भाषेत). Library of Congress.
  2. ^ Freeman, Michael (2004-01-04). [https://books.google.co.in/books?id=-pZvBS75- E8C&pg=PT37&dq=hariharalaya+cambodia&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjGiIay5sTeAhVYWysKHabSCh44ChDoAQg5MAQ#v=onepage&q=hariharalaya%20cambodia&f=false Cambodia] Check |url= value (सहाय्य) (इंग्रजी भाषेत). Reaktion Books. ISBN 9781861894465. line feed character in |url= at position 46 (सहाय्य)
  3. ^ Higham, C., 2014, Early Mainland Southeast Asia, Bangkok: River Books Co., Ltd., ISBN 9786167339443
  4. ^ Chakrabartty, H. R. (1988). Vietnam, Kampuchea, Laos, Bound in Comradeship: A Panoramic Study of Indochina from Ancient to Modern Times (इंग्रजी भाषेत). Patriot Publishers. ISBN 9788170500483.
  5. ^ Kumar, Ravi. Indonesia Mein Hindu Punarutthan (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352669394.
  6. ^ a b c Hebalkar, Dr Sharad (2013-08-01). Bharatey Sanskrti Ka Vishv-Sanchaar (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 9789381500170.
  7. ^ inc, Encyclopaedia Britannica (1998). The New Encyclopaedia Britannica (इंग्रजी भाषेत). Encyclopaedia Britannica. pp. ५१८.
  8. ^ User, Super. "अंकोर". marathivishwakosh.maharashtra.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-11-08 रोजी पाहिले.
  9. ^ a b Hebalkar, Dr Sharad (2013-08-01). Bharatey Sanskrti Ka Vishv-Sanchaar (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 9789381500170.
  10. ^ Chatterjee, Bijan Raj (1928). Indian Cultural Influence in Cambodia (इंग्रजी भाषेत). University of Calcutta.