रुपेरी पाँफ्रेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ओळख[संपादन]

रुपेरी पॉंफ्रेट याचे मराठी नाव चांदवा आहे. भारतापासून मलाया द्वीपकल्पापर्यंतच्या आणि त्याच्याही पलीकडच्या समुद्रात हे मासे सापडतात. यांची लांबी सु. ३० सेंमी. पर्यंत असते. प्रौढ माशाचे वजन सु. १ किग्रॅ. असते. डोक्याची व शेपटीची लांबी शरीराच्या लांबीच्या सु. १/४ असते. डोके व पाठ (पार्श्र्व रेखेपर्यंत) करड्या रंगाची असून त्यात जांभळ्या रंगाची झाक असते. डोक्याच्या आणि शरीराच्या दोन्ही बाजू रुपेरी करड्या असून पोटाकडची बाजू पांढरी असते. सगळ्या शरीरावर बारीक काळे ठिपके असतात. प्रच्छदाच्या (कल्लयावरील झाकणाच्या) वरच्या भागावर काळा ठिपका असतो. शेपटीचा भाग पिवळसर पांढरा असतो. कनीनिका (मध्यभागी छिद्र असलेले डोळ्यातील रंगयुक्त पटल) रुपेरी असते

वर्णन[संपादन]

शरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असते. पृष्ठपक्ष आणि गुदपक्ष (पाठीवरील व गुदाजवळील पर) करड्या रंगाचे असून त्यांवर दाट काळे ठिपके असतात. या दोन्ही पक्षांतील कंटक (काटे) छाटल्यासारखे दिसतात. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) खोल भेगेने द्विशाखित झालेला असून त्याची खालची पाली जास्त लांब असते. सगळे शरीर लहान, पातळ शल्कांनी (खवल्यांनी) आच्छादिलेले असून ते झडणारे असतात.

या माशांचे मांस लुसलुशीत आणि स्वादिष्ट असल्यामुळे त्यांचा खाण्याकरिता बराच उपयोग करतात. यामुळे यांची मासेमारी फार मोठ्या प्रमाणावर चालते.मुंबई किनाऱ्यावर यांच्या मासेमारीचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो व नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात तो तेजीत असतो. या अवधीत हे मासे फार मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. फेब्रुवारीनंतर यांचे थवे स्थलांतर करून दक्षिणेकडे जातात. मार्च आणि एप्रिल महिन्यांत दक्षिण कारवारच्या किनाऱ्यावर ते मुबलक असतात. यानंतर ते मलबार किनाऱ्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत विपुल असतात. अशाच प्रकारचे या माशांचे स्थलांतर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर होत असल्याचे दिसून येते.