Jump to content

सोलापूर मार्शल कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात आंदोलन दडपण्यासाठी मार्शल लॉ लागू करून ब्रिटिश सरकारने सोलापूर लष्कराच्या ताब्यात दिले होते. या ऐतिहासिक घटनाक्रमात देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या १७ वर्षांपूर्वीच सोलापूरला चार दिवसांचे स्वातंत्र्य मिळाले होते.[]

ब्रिटिशकालीन भारतात अनेक शहरांत आंदोलने झाली असली तरी केवळ सोलापूर शहरातच 'मार्शल लॉ' ब्रिटिशांनी लावला होता. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते, अशी ऐतिहासिक दस्ताऐवजांत नोंद आहे.[]

या लढ्यात १२ जानेवारी १९३१ रोजी मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चार क्रांतिकारकांना फाशी दिली गेली.[]

इतिहास

[संपादन]

त्याकाळी सोलापुरातील घटनांनी साऱ्या जगाला दिपवून टाकले होते. त्यापैकी मार्शल कायद्याचा काळ एक धगधगते अग्निकुंडच म्हणावे लागेल. सोलापूर शहराच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग नाव शोलापूर असे केले जाई. शोलापूर म्हणजे शोलोंका हुतात्माओंका शहर, असे काहीजण म्हणत .१२ जानेवारी १९३१ साली सोलापूर शहरातील श्री.मल्लप्पा धनशेट्टी, श्री.किसन सारडा, श्री.जगन्नाथ शिंदे,श्री. कुर्बान हुसेन या चार तरुण देशभक्ताना ब्रिटिशांनी, त्यांनी न केलेल्या गुन्ह्याबद्दल, केवल दहशत बसवण्यासाठी, पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर चढवले. आपल्या प्राणांची आहुती देऊन या चार हुतात्म्यांनी सोलापूर शहराचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर केले.

मार्शल कायद्याची पार्श्वभूमी

[संपादन]

महात्मा गांधीनी सन १९३० च्या एप्रिलमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. काही काळातच या चळवळीचे लोण भारतभर पसरले. सोलापूर शहर त्याला अपवाद नव्हते. ५ मे १९३० रोजी रात्री १०.३० वाजता गांधीजींच्या अटकेची बातमी सोलापुरात येऊन धडकली. या धक्कादायक बातमीने सारा समाज अस्वस्थ झाला. ६ मे १९३० रोजी सर्वत्र तणाव जाणवत होता. दुकाने, गिरण्या बंद होत्या. मिरवणुका, घोषणा, दारू दुकानाची नासधूस असे प्रकार सुरू झाले. महिलांनी वेगळी मिरवणूक काढली. जमावाच्या एका गटाने मद्रास मेल अडवून नंतर ती सोडून दिली. श्रद्धानंद समाजाने दिवसभर शिंदीची झाडे तोडून सत्याग्रह केला. सरकारने काही प्रमाणात लाठीहल्ला, गोळीबार केला.

दि.०७ मे १९३० हा दिवस प्रक्षोभक वातावरणातच उजाडला लक्ष्मी-विष्णू गिरणीजवळ पोलिसांना गोळीबार करावा लागला. दिवसभर मिरवणूक, पोलिसांची हुर्यो उडविणे, त्यांना गांधी टोपी घालावयास लावणे चालूच होते. सतत लाठीमार, गोळीबार करणाऱ्या सरकारबद्दल जनतेच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली. दिनांक ०८ मे उजाडला तो काळा दिवस म्हणूनच. सरकारने वीर नरीमन या युवक संघाच्या प्रमुखास अटक केली. युवक संघाने जंगी मिरवणूक काढली. शहरभर हिंडून ती टिळक चौकात आली. मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. सरकारचा निषेध करण्यात आला. शांततेचे आव्हान करून सभा संपली. मिरवणूक बाळीवेशीत असताना तरुणांचा एक गट रूपाभवानी जवळची शिंदीची झाडे तोडण्याचा सत्याग्रह करण्यासाठी गेला. त्यासाठी पुढाऱ्यांची संमती घेतली नव्हती. त्यांना हे माहीतही नव्हते. मिरवणुकीसोबत असणाऱ्या काही पोलिसांनी ही बातमी वरिष्ठांना कळवली. इन्स्पेक्टर नापेट दोन लाॅऱ्या पोलीस घेऊन तेथे हजर झाला. त्याने नऊ जणांना पकडले. पण जमावावर ताबा मिळविणे अशक्य असल्याचे कळताच कलेक्टर नाईक आणि डीसपी प्लेफेअर पोलीस घेऊन तेथे आले. कलेक्टरच्या हातातील पिस्तुल पाहून जमाव अधिकच भडकला. पकडलेल्या लोकांना सोडण्याची त्यांनी मागणी केली. झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस व डीसपी जखमीं झाले. तणाव वाढतच होता. कलेक्टरने गोळीबार सुरू केला. ही बातमी समजताच समाजावर ज्यांचा खूप प्रभाव होता असे श्री.धनशेट्टी जबाबदारीच्या जाणिवेने धावतच तेथे आले. सूत्रे हाती घेऊन तणाव कमी केला. पकडलेल्यांची फक्त नावे घेऊन त्यांना सोडावे अशी विनंती केली. तेवढ्यात २०-२२ वर्षाचा एक धाडसी तरुण पुढे आला त्याने कलेक्टरपुढे पकडलेल्यांना सोडा अशी जणू आज्ञाच केली. त्याक्षणी एका सार्जटने त्याच्यावर गोळी झाडली. ती छातीत लागली व तो धाडकन पडला. सोलापूर शहरातील तो पहिला हुतात्मा ठरला. त्याचे नाव होते शंकर शिवदारे. त्यामुळे जमावात प्रचंड खळबळ माजली. कलेक्टर चांगलाच कोंडीत पकडला गेला. भीतीने तो गलितगात्र झाला. जमावाला हा विजय वाटला तर कलेक्टर अपमानाच्या सूडाच्या भावनेने पेटून उठला. श्री. धनशेट्टी यांनी कालेक्टरला कसेबसे जमावाच्या कोंडीतून सुखरूपपंणे बाहेर पडण्याची वाट करून दिली. कलेक्टरने खुनशीपणाने जाता जाता गोळीबाराची आज्ञा दिली. अनेक जखमी झाले. जनक्षोभ वाढला. श्री. धनशेट्टी यांनी समजूत घालून जमावाला पांगविले व नंरच ते तेथून गेले.

या सर्व घटनांमुळे लोकांचा पोलिसांवरील राग प्रचंड वाढला. पांगवलेल्या जमावातील काही लोक मंगळवार पेठ पोलीस चौकीपाशी आले. त्यांना राग व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्यांनी चौकीतील कागदपत्रे जाळली. दादा जाफर ( हवालदार ) वय ५५ वर्षे याला पेटवून दिले व चांद अल्लाउद्दीन (कॉन्स्टेबल ) वय २२ वर्षे यास जीवे मारले. सुडाने पेटलेल्या जमावाला आपण काय करतो आहोत याचे भानच राहिले नाही. पुढे त्यांनी कोर्टाची कागदपत्रे जाळली आणि कोर्टालाच आग लावली. हे सर्व प्रकरण ३-४ तास चालू होते. धास्तावलेल्या कलेक्टर आणि डीसपी यांनी आपल्या कुटुंबीयांना परगावी पाठवण्याची तयारी केली. या सुडातून पोलिसांनी ज्या भागात शांतता होती तेथे दुपारी दीड वाजेपासून सायंकाळी साडेसातपर्यंत सुमारे ६ तास रस्तोरस्ती अंधाधुंद गोळीबार केला. यात सुमारे १०३ गोळ्या झाडल्या, असंख्य मारले गेले. ही बातमी मुंबईला कळली आणि यातूनच मार्शल कायदा पुकारण्याची पार्श्वभूमी तयार झाली.

स्वतंत्र सोलापूर

[संपादन]

कलेक्टर नाईट रजेवर गेले. दि .९,१०,११ व १२ मे १९३० या दिवसांत शहरात ब्रिटिश शासनच नव्हते. काँग्रेस कमिटीने पुढाकार घेऊन शांतता प्रस्थापित केली. व्यवहार सुरळीत चालू केले. येथील वाहतुकीच नियंत्रण हे काँग्रेसचे स्वयंसेवक करत होते. अश्या रीतीने सलग चार दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे सोलापूर हे हिंदुस्थानातील पहिले शहर ठरले.

मार्शल कायद्याची घोषणा

[संपादन]

सोलापुरातील हा सर्व वृत्तान्त मुंबई सरकारला कळविण्यात आला. परंतु नाईट आणि हॉटसन यांनी शिजवलेल्या कटानुसार दि.१२ मे १९३० रोजी रात्री ०८:३० वाजता सोलापूर शहरात मार्शल कायदा पुकारण्यात आला. त्यामुळे सोलापूरचे नाव लंडनपर्यंत दुमदुमले.

मार्शल कायद्याचे स्वरूप/कलमे

[संपादन]

व्हाईसरॅय लॉर्ड आयर्विन यांनी सोलापुरातील लष्करी कायद्यासाठी १५ मे १९३० रोजी अध्यादेश प्रसिद्ध केला. त्यातील कलमे पुढीलप्रमाणे होती-

  1. या कायद्याला सोलापूर मार्शल कायदा असे म्हणावे.
  2. सोलापूर शहराच्या म्युनिसिपल हद्दीत हा कायदा लागू केला जाईल.
  3. मुख्य सेनापतीने योग्य लष्करी अधिकाऱ्याकडे या कायद्याच्या अंमलबजावणीचे काम द्यावे.
  4. या लष्करी अधिकाऱ्यास शांतता रक्षणासाठी जरूर ते कायदे-कानून करण्याचा अधिकार राहील.
  5. लष्करी अधिकाऱ्याने केलेले कायदे-कानून नागरिकांना कळावेत अशा रीतीने प्रसिद्ध करावेत.[ संदर्भ हवा ]

कर्नल पेजने लष्करी कायद्याखाली धरपकडीचे सत्र सुरू केले. त्याने मंगळवार पोलीस चौकी जाळणे, तेथील पोलिसाना ठार मारणे व जमावाला भडकावणे असे खोटे आरोप ठेवून दि. १३ मे रोजी देशभक्त जगन्नाथ शिंदे व श्री. किसन सारडा याना सायंकाळी ०६ वाजता अटक केली. दि. १४ मे रोजी सकाळी श्री. मलप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक केली. मार्शल कायद्याअंतर्गत पकडलेल्या सर्वांवर खटले भरण्यात आले, शिक्षा दिल्या. धनशेट्टी, हुसेन, सारडा, शिंदे यांना खोट्या आरोपाखाली आणि खोट्या साक्षीवर आधारित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.  

संदर्भ

[संपादन]

सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यातील दीपस्तंभ (पुस्तक, लेखक - डॉ.श्रीकांत येळेगावकर)

  1. ^ a b c "4 दिवसांचं स्वातंत्र्य, 4 हुतात्म्यांना फाशी, सोलापूरच्या 'मार्शल लॉ'चा हा इतिहास माहिती आहे का?". BBC News मराठी. 2022-01-12. 2022-01-16 रोजी पाहिले.