Jump to content

सोलापूर स्वातंत्र्य लढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोलापूरचे चार हुतात्मे: (डावीकडून) मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन

सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता. हे आंदोलन दडपण्यासाठी मार्शल लॉ लागू करून ब्रिटिश सरकारने सोलापूर लष्कराच्या ताब्यात दिले होते. या ऐतिहासिक घटनाक्रमात देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या १७ वर्षांपूर्वीच सोलापूरला चार दिवसांचे स्वातंत्र्य मिळाले होते.

ब्रिटिशकालीन भारतात अनेक शहरांत आंदोलने झाली असली तरी केवळ सोलापूर शहरातच 'मार्शल लॉ' ब्रिटिशांनी लावला होता. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते, अशी ऐतिहासिक दस्ताऐवजांत नोंद आहे.[]

या लढ्यात १२ जानेवारी १९३१ रोजी मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चार क्रांतिकारकांना फाशी दिली गेली.[][]

इतिहास

[संपादन]

भारतातील एकमेव ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये स्वातंत्र्य उपभोगणारा जिल्हा आहे. ती घटना सोलापुरात १९३० साली घडली. सोलापूर मध्ये लोकांचा उठाव एवढा जोरदार होता, की सोलापुरातील ब्रिटिश अधिका-यांना पळून जावे लागले. एकही ब्रिटिश अधिकारी शहरात चार दिवस नव्हता. सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी त्या चार दिवसांत पर्यायी सरकार स्थापन केले. ते सरकार कायमसाठी अभिप्रेत होते, पण ब्रिटिशांनी गावात लष्करी कायदा पुकारून ते सरकार आणि जनतेचा उठाव मोडून काढला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लष्करी कायदा पुकारला जाण्याचा तो एकमेव प्रसंग. पंडित नेहरू त्यामुळे सोलापूरला ‘शोला’पूर म्हणत असत.ब्रिटिशांनी महात्मा गांधींना गुजरातेत ४ मे १९३० रोजी अटक केली. ती बातमी सोलापुरात येऊन थडकली. लोकांच्या मनात गांधीजींच्या अटकेबद्दल चीड निर्माण केली. काँग्रेसचे नेते रामकृष्ण जाजू यांनी टिळक चौकात ६ मे रोजी जाहीर सभा घेतली आणि ती बातमी जाहीर केली. त्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले होते, पण तरीही चिडलेल्या जनतेच्या मनाचा उद्रेक झाला. तो आधी संपाच्या रूपाने प्रकट झाला. गिरणी कामगारांनी संप पुकारून छोट्या छोट्या मिरवणुका काढल्या. त्यात महिलांचीही मिरवणूक होती. मिरवणुका पोलिसांनी अडवल्या. लोकांच्या पोलिसांशी चकमकी झडल्या. शहरात अन्य ठिकाणीही मिरवणुका निघाल्या.जमावाने दारूच्या दुकानांचीही नासधूस केली. ती दुकाने बंद करण्यात आली. मिरवणुका आणि सरकारविरोधी घोषणाबाजी यांचे सत्र जारी राहिले. काँग्रेसच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन केले असूनही हुल्लडबाजीचे प्रकार सुरूच राहिले. तो प्रकार ७ मे रोजीही सुरू होता.८ मी रोजी आंदोलन सुरू असताना त्यामधील आंदोलक रूपा भवानीकडे धावले. तेथे ताडीची झाडे होती. महात्मा गांधी हे कट्टर दारूबंदीवादी होते. त्यामुळे त्यांच्या सत्याग्रहाच्या कार्यक्रमात ताडीची झाडे तोडण्याचा आदेश होता. म्हणून ते तरुण तिकडे धावले होते. ती गोष्ट कळताच पोलीस निरीक्षक नॅपेट दोन लॉ-या भरून पोलीस घेऊन तिकडे गेला. काही वेळांत कलेक्टर हेन्री नाईट आणि पोलीस अधीक्षक प्लेफेअर हेही तेथे आले. कारण जमाव मोठा होता आणि त्याला झाडे तोडण्यास प्रतिबंध करणे गरजेचे होते. पोलीस तसा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या वाटा दगड आणि झाडाच्या फांद्या आडव्या टाकून अडवण्यात आल्या होत्या. त्यावर पोलिसांनी नऊजणांना पकडले. जमावाने त्यांना सोडण्याची मागणी केली. ती मागणी मान्य होत नसल्याने जमाव प्रक्षुब्ध झाला. ती बातमी कळताच मल्लप्पा धनशेट्टी तेथे आले. त्यांनीही पकडलेल्या नऊजणांना सोडण्याचा आग्रह धरला.

वरील अनेक गोष्टींमुळे चवताळलेल्या ब्रिटिशांनी १२ मे रोजी तेथे मार्शल लॉ लागू केला. सोलापुरातील अनेकांवर त्यावेळी मार्शल लॉ या कायद्याने अनेक लोकांवर कारवाई करण्यात आली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "4 दिवसांचं स्वातंत्र्य, 4 हुतात्म्यांना फाशी, सोलापूरच्या 'मार्शल लॉ'चा हा इतिहास माहिती आहे का?". BBC News मराठी. 2022-01-12. 2022-01-16 रोजी पाहिले.
  2. ^ "सोलापूरमधील 1930 चे मार्शल लॉ आंदोलन". https://kartavyasadhana.in/ (इंग्रजी भाषेत). 2022-01-16 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)