Jump to content

कादर जमात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कादर ही भारताच्या तामिळनाडूकेरळ राज्यांतील एक वन्य जमात आहे. `काद' म्हणजे जंगल. कादर म्हणजे वनात राहणारे लोक. केरळात त्यांची वस्ती पालघाटत्रिचुर जिल्ह्यांत आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या १,२०० होती.

वर्णन

[संपादन]

कादर मध्यम उंचीचे, मजबूत बांध्याचे, रंगाने काळे, लांब दात असलेले, चपट्या नाकाचे, रूंद नाकपुड्या व कुरळे केस असलेले लोक आहेत. यांचे जीवनमान निकृष्ट असूनही ते आनंदीपणाचे मूर्तिमंत प्रतीक वाटतात. सौम्य स्वभावाचे लोक इतर जातींशी मिळून-मिसळून वागतात. ते शिकार करतात; कुरूंब जमातीप्रमाणेच हे हत्तींची निर्भयपणे शिकार करतात. जंगलात हे कंदमुळे व मध गोळा करतात. कादरांना स्वतःची भूमी नाही. ते शिकार करीत हिंडत असतात. अजगर, हरिणे, वानरे, उंदीर व डुकरे यांना मारून त्यांचे मांस ते खातात. नीलगिरीतील कोटांप्रमाणे रानातल्या मृत जनावरांचे मांसही ते खातात. बाबूंचे बी, भात, नाचणी वगैरे धान्य ते खातात. हल्ली काही कादर मजुरीही करतात.

जीवनमान, परंपरा व श्रद्धा

[संपादन]

कादरांना दागिन्यांची फार हौस आहे. पुरूष बांबूच्या फण्या करून त्या केसात घालतात. तासलेले दात त्यांच्यात सौंदर्याचे लक्षण समजतात. म्हणून ते पुढले दात मुद्दाम तासून घेतात. नाच, गाणे व मद्य यांची त्यांना आवड आहे. त्यांच्या झोपड्या अथवा `पाठी' उंच ओट्यावर बांधलेल्या असतात. आयप्पन, काली व मालावाझी या त्यांच्या आवडत्या देवता. त्यांच्या मुख्याला `मुप्पन' म्हणतात. तोच सर्व धर्मविधी करतो. अलीकडे मुप्पनची जागा पंचायतीने घेतली आहे. लग्नात मुलीचे देज देतात. लग्नात वधूवर मांडवाभोवती हातात हात घालून फेऱ्‍या घालतात. वर वधूच्या गळ्यात ताली बांधतो. कादर तऱ्हेतऱ्हेच्या फण्या करतात. लग्नातील अखेरचा विधी म्हणजे वर वधूला आपण केलेल्या फण्या देतो. लग्नाच्या प्रसंगी स्त्री पुरूष वेगवेगळे नाचतात. देवर-विवाह व मेहुणी-विवाह संमत आहेत. बायकांचे विटाळ मानतात. ते मृतांना दूर नेऊन पुरतात. सोळा दिवसांच्या सुतकात भुतांच्या भीतीने ते दफनभूमीत फिरकत नाहीत. सुतक संपल्यानंतर जेवण देतात.

संदर्भ

[संपादन]