रवींद्र चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रविंद्र चव्हाण

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ डोंबिवली

जन्म २० सप्टेंबर, इ.स. १९७०
कल्याण, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म
या दिवशी २१ नोव्हेंबर, २०१७

रविंद्र चव्हाण (२० सप्टेंबर, १९७०, पेंडुर, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकार मधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (सार्वजनिक उपक्रम वगळून) कॅबिनेट मंत्री आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग आणि पालघर अशा महाराष्ट्रातील २ जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे ते माजी मंत्री आहेत. याशिवाय भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून पक्ष संघटनात ते मोलाची भूमिका बजावतात. तसेच कोकणचे सुपुत्र म्हणून कोकणातील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव आहे. रविंद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या विचारांवर आणि कार्यशैलीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव असल्याचे जाणवते.

राजकारणात प्रवेश आणि प्रारंभिक वाटचाल

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यावर २००२ साली रविंद्र चव्हाण यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक झाली.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना २००५ साली झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांना भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत पहिल्यांदा त्यांचा राजकीय विजय झाला.

२००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदावर त्यांची वर्णी लागली. नगरसेवक असूनही थेट केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा करत कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात गरिबांना घरे देण्यासाठी बीएसयुपी योजना मंजूर करून घेतली.

२००८ साली महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाली, त्यानंतर २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा-शिवसेना महायुतीने त्यांना उमेदवारी दिली.

आमदार म्हणून वाटचाल

२००९ साली प्रचंड मताधिक्य मिळवून रविंद्र चव्हाण यांनी मनसे उमेदवार राजेश कदम यांचा पराभव करत डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान मिळवला.

१००% वीज बिल वसुली होत असूनही डोंबिवलीतील नागरिकांना लोडशेडिंगला सामोरे जावे लागत होते. याविरोधात रविंद्र चव्हाण यांनी २०१० साली महाराष्ट्र वीज नियामक आयोगात दावा दाखल केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे डोंबिवली हे महाराष्ट्रातील पहिले लोडशेडिंगमुक्त शहर बनले.

डोंबिवली स्टेशनवरून रेल्वेने प्रवास करताना डोंबिवलीकरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता, कारण रेल्वे प्लॅटफॉर्म आणि लोकलचा डबा यांच्यात जीवघेणी गॅप होती. या गॅपविरुद्ध संघर्ष करत रविंद्र चव्हाण यांनी २०१० साली रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच डीआरएम ऑफिसला टाळे ठोकले.

डोंबिवली आणि आसपासच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून २०१३ साली डोंबिवली येथे झालेल्या डोंबिवली रेल परिषदेमध्ये १५ प्रवासी संघटनांनी सहभाग घेतला होता.

२८ मे, २०१४ रोजी रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची अखंड ज्योत डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत गेल्या १० वर्षांपासून अखंड तेवत आहे.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांचा पुन्हा एकदा विजय झाला. २०१६ साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेत त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या ४ खात्यांची जबाबदारी सांभाळली. बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या ४ खात्यांचा राज्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत होते.

२०१९ साली रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून डोंबिवलीकरांचा स्वाभिमान असणाऱ्या शूरवीर आन ठाकूर आणि मान ठाकूर यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात आले.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत डोंबिवलीकरांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवला.

२०२० साली भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यापूर्वीही वेळोवेळी भाजपा पक्ष संघटनेत त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. 

कॅबिनेट मंत्री म्हणून वाटचाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागांची जबाबदारी देण्यात आली.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांनी ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाल्यावर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची धुरा छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री म्हणून रविंद्र चव्हाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रस्ते आणि इतर पायाभूत सोयीसुविधांचे जाळे उभारत आहेत. तसेच रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) स्थापन करण्यात आले आहे. १२ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम देखील रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात जवळपास पूर्ण झाले आहे.

आनंदाचा शिधा दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महत्त्वाच्या सणांच्या वेळचा गोडवा वाढावा, यासाठी २०२२ साली तत्कालीन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘आनंदाचा शिधा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना केवळ १०० रुपयात साखर १ किलोग्राम, खाद्यतेल १ लिटर, चणाडाळ अर्धा किलोग्राम, रवा अर्धा किलोग्राम असे ४ जिन्नस मिळतात.

मुंबई-गोवा महामार्ग

१२ वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग ही कोकणातील प्रमुख समस्या होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा संकल्प केला. परंतु यामध्ये बऱ्याच अडचणी होत्या. सर्वसमावेशक भूमिका घेत रविंद्र चव्हाण यांनी भूसंपादनाचा विषय मार्गी लावला. तसेच या महामार्गासाठी आपल्या मालकीची जागा देणाऱ्या कोकणवासीयांना भूसंपादनाचा चोख मोबदला मिळायलाच हवा, अशी आग्रही भूमिका मांडत तो विषय देखील मार्गी लावला. OBT (Operate-Build-Transfer) पद्धतीतून या महामार्गाचे काम केले. सध्या या महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कशेडी बोगदा सारख्या पर्यायी मार्गांमुळे मुंबई-गोवा प्रवासातील अंतर कमी झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत रस्त्यांसह विविध २२ क्षेत्रात पायाभूत विकासकामे, सुविधा, देखभाल दुरुस्ती व्हावी या उद्देशाने रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ(MSIDC) स्थापन करण्यात आले. या महामंडळाच्या माध्यमातून हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेल द्वारे रस्ते, ब्रिज, शासकीय इमारती याच बरोबर बंदरे विमानतळ अशा पायाभूत क्षेत्रात सुविधा गतिमान पद्धतीने उभ्या राहतील आणि राज्याच्या प्रगतीचे ग्रोथ इंजिन जोरदार धावेल असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

डोंबिवलीकर ब्रँड

रविंद्र चव्हाण ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तो डोंबिवली विधानसभा मतदारसंघ ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी’ म्हणून ओळखला जातो. गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा आणि यासारखे इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम डोंबिवली शहरात होत असतात. अशा डोंबिवली शहराचा आमदार म्हणून रविंद्र चव्हाण धार्मिक, सांस्कृतिक, कलात्मक, साहित्यिक, सामाजिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांतील उपक्रमांमध्ये नेहमीच हिरीरीने पुढाकार घेताना दिसून येतात. तसेच डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवलीकर मासिक यासारख्या माध्यमांमधून ‘डोंबिवलीकर’ हा एक ब्रँड बनवण्यावर त्यांचा भर राहीला आहे.

संदर्भ[संपादन]