पायमोज्याच झाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Myroxylon balsamum - Köhler–s Medizinal-Pflanzen-141
Myroxylon balsamum - Köhler–s Medizinal-Pflanzen-140

मुंबईत ‘पेरू बालसम’ किंवा सॅन्टाॅस महाॅगनी हा वृक्ष बऱ्याच वर्षापासून स्थायिक झाला आहे. डॉ. शरदिनी डहाणूकरांनी या वृक्षाचे नाव ‘पायमोज्याचे झाड’ असे ठेवले आहे.. त्याची पायमोज्याच्या आकाराची शेंग या नामकरणाला कारणीभूत आहे. मायरोक्झायलॉन बालसासम असे शास्त्रीय नाव लाभलेला हा मध्यम उंचीचा वृक्ष करंज, पळस, पांगारा यांच्या गटातला आहे. लॅटिन अमेरिकेतील पेरू या देशाचा मूळ रहिवासी असलेला हा वृक्ष भारतात काही ठिकाणी स्थिरावला आहे. हा वृक्ष भारतात बंगलोर येथील लालबाग उद्यान, निलगिरी हिल्समधील कलगार उद्यान व दक्षिण भारतातील काही उंचीवरील ठिकाणे येथे शोभेसाठी लावण्यात आला आहे.

साधारण १२०० ते २८०० फुटापर्यंत पायमोज्याच्या झाडाची चांगली वाढ झाल्याचे आढळले आहे. पेरू आणि आजूबाजूचे देश व्हेनिझुएला, ब्राझील, साल्व्हाडोर या देशांच्या पर्जन्यमय जंगलांत या वृक्षाची वाढ १२० फुटापर्यंत होऊ शकते. इतर ठिकाणी मात्र तो ६०-७५ फुटांपेक्षा जास्त उंच होत नाही. सदाहरित वर्गात मोडणारा हा वृक्ष असून पाने संयुक्त असतात. झाडाचे खोड हे रेझीनयुक्त असून खोडाला छेद दिल्यानंतर तुळशीच्या पानांसारखा सुगंध येतो. एप्रिल-मे महिन्यात पिवळी पांढरी फुले येतात. फुले आकाराने करंजाच्या फुलांएवढी असतात. साधारण मे महिन्याच्या शेवटी झाडाला पायमोज्याच्या आकारासारख्या चपट्या शेंगा येतात.शेंगेच्या टोकाला एकच चपटी बी असते. शेंगेला दोन्ही कडेला चपटे पंख असल्यासारखा वाढीव भाग असतो. शेंग जमिनीवर पडून कुजल्यानंतरच बी बाहेर पडते. झाडाची लागवड ही मुख्यत्वे बीपासूनच होते. साधारण वीस-पंचवीस वर्षे जुन्या झाडाच्या खोडाला छेद करून त्यातून बाहेर येणारा सुगंधी, तपकिरी, पिवळा, चिकट द्रव कालांतराने कठीण आणि नंतर ठिसूळ बनतो. भारतीय फार्माकोपियामधेही या बालसमचा औषधी उपयोग दिला आहे. हा सुगंधी बालसम ॲन्टीसेप्टिक असून उत्तेजक आहे. कफ सिरपमधेही त्याचा वापर होतो. जखमेवर आणि त्वचारोगांवर लावण्यासाठी बालसम वापरला जातो. खोडापासून सुगंधी तेल तयार केले जाते. हे तेल परफ्युम बनवण्यासाठी मोठया प्रमाणात वापरले जाते. वेगवेगळ्या सौंदर्य-प्रसाधनांमध्ये आणि साबणामध्ये या तेलाचा वापर केला जातो. दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये या वृक्षास सॅंन्टोस महोगनी असेही संबोधतात. याचे लाकूड हे खऱ्या महोगनीपेक्षाही गडद रंगाचे असून साल्वाडोर, व्हेनिझुएला इ. देशात सॅंन्टोस महोगनीला खऱ्या महोगनीपेक्षाही जास्त किंमत मिळते. लाकडाचा उपयोग घरातील जमिनीसाठी, फर्निचरसाठी व पॅनेलिंगसाठी होतो. लाकूड सहसा कुजत नाही.

संदर्भ[संपादन]

वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक