मंदिरपथगामिनी
मंदिरपथगामिनी हे शिल्पकार गणपत काशिनाथ म्हात्रे यांनी साकारलेले एक शिल्प आहे. ते दिल्लीतील भारतीय लोकसभेच्या विस्तारित कक्षात आहे.[१]
इतिहास
[संपादन]गणपतराव म्हात्रे यांनी हे शिल्प सर जे. जे. कला महाविद्यालयात शिकत असताना वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे साधारणपणे इ.स. १८९७ साली घडविले होते. प्रथम हे शिल्प त्यांनी शाडूची माती वापरून घडविले पुढे इ.स. १९०० साली याच शाडूच्या शिल्पावरून त्यांनी संगमरवरी शिल्प घडविले. हे शिल्प बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात आणि पुढे परदेशातही प्रदर्शित करण्यात आले होते.[२] या कलाकृतीचे शिल्पकार म्हणून गणपतराव म्हात्रे यांना बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी रु. २०० चे बक्षीस देऊन गौरविले होते. पुढे सर जे.जे. कला महाविद्यालयाने हे शिल्प १,२०० रुपयांस आपल्या चित्रशाळेसाठी विकत घेतले होते. [२]
शिल्पाविषयीचे तत्कालीन अभिप्राय
[संपादन]सर जॉर्ज बर्डवूड यांनी 'बॉम्बे गॅझेट'या पत्रात या शिल्पाविषयी लेख लिहून त्याचे गुणग्राहण केले होते. सन १८९८ साली ठाकूर परिवाराच्या 'भारती' या मासिकाच्या आषाढ १३०५ बंगाब्दच्या अंकात 'मंदिरपथवर्तिनी' ह्या शिर्षकासह या शिल्पावर लेख प्रसिद्द झाला होता. सन १८९८ सालीच 'मॉर्डन रिव्हू'कार रामानंद चटोपाध्याय यांच्या 'प्रदिप' या बाङ्ला भाषेतील मासिकाच्या पौष १३०५ बंगाब्दच्या अंकात या शिल्पाविषयी 'मंदिराभिमुखे' या शिर्षकासह एक लेख प्रसिद्ध झाला होता.[२] हे दोन्ही लेख रविंद्रनाथ ठाकूर यांनी लिहिले होते ('आनंदबाजार पत्रिका' या बाङ्ला दैनिकाच्या ८ मे १९८८ च्या अंकात श्री. अनाथनाथ दास यांनी हे दोन्ही लेख, खात्री करून घेऊन, सटीप सादर केले होते).[२]
संदर्भ
[संपादन]- ^ http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5162224828200381721&SectionId[permanent dead link]
- ^ a b c d श्री.बा.जोशी, उत्तम मध्यम, समाविष्ट- प्रतिभेचे इंद्रजालच, पद्मगंधा प्रकाशन, पुणे-३८, १ली, २०१०, २५-२८.