Jump to content

जे. कृष्णमूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवयुवक जिद्दू कृष्णमूर्ती

जिद्दू कृष्णमूर्ती (११ मे, इ. स. १८९५ - १७ फेब्रुवारी, इ. स. १९८६) हे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. विश्वगुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरूद त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या विषयक्षेत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता : मानसिक क्रांती, मनाचे स्वरूप, ध्यान, अभिप्सा, मानवी संबंध व समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये क्रांती घडवून आणण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी सतत भर दिला आणि अशी क्रांती कोणत्याही बाह्य सत्तेद्वारा - मग ती धार्मिक, राजकीय वा सामाजिक असो - घडवून आणली जाऊ शकत नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले.

पौगंडावस्थेत असतानाच तत्कालीन मद्रासमधील अड्यार इथे असलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुख्यालयात विख्यात गूढवादी व उच्च कोटीचे ईश्वरविद (थिऑसफिस्ट) चार्ल्स वेब्स्टर लेडबीटर यांच्याशी कृष्णमूर्तींची भेट झाली. त्यानंतर अ‍ॅनी बेझंट व लेडबीटर या सोसायटीच्या तत्कालीन नेत्यांच्या देखरेखीखाली कृष्णमूर्ती वाढले. विश्वगुरू पदासाठी कृष्णमूर्ती लायक उमेदवार आहेत, अशी या नेत्यांची खात्री होती. नवयुवक कृष्णमूर्तींनी मात्र ही संकल्पना नाकारली आणि या संकल्पनेच्या समर्थनासाठी उभारलेल्या जागतिक संस्थेचे (दी ऑर्डर ऑफ द स्टार) त्यांनी विसर्जन केले. कोणतेही राष्ट्रीयत्व, जात, धर्म वा तत्त्वज्ञान कृष्णमूर्तींनी आपले मानले नाही आणि उरलेले आयुष्य जगभर प्रवास करीत व्यक्तींशी, छोट्या-मोठ्या गटांशी चर्चा करण्यात व्यतीत केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये द फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम, दी ओन्ली रेवल्युशन आणि कृष्णमूर्तीज्‌ नोटबुक यांचा समावेश होतो. त्यांची अनेक भाषणे आणि चर्चा प्रकाशित झाल्या आहेत. जानेवारी १९८६ मध्ये मद्रासमध्ये त्यांनी शेवटचे सार्वजनिक भाषण केले. त्यानंतर महिनाभरात ओहाय (कॅलिफोर्निया) येथे त्यांचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]

कृष्णमूर्तींचे अनुयायी ना-नफा तत्त्वावर भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवीत आहेत. विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार, भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्‍नही त्यांचे समर्थक करीत आहेत.[ संदर्भ हवा ]

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण

[संपादन]

कृष्णमूर्तींचा जन्म ११ मे १८९५ रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील (आताच्या आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्हा) मदनपल्ले या छोट्या नगरात तेलुगूभाषिक कुटुंबात झाला. आठवा मुलगा झाला तर कृष्णाचे नाव त्याला द्यायचे या हिंदू प्रथेनुसार कृष्णमूर्ती हे नाव ठेवण्यात आले. जिद्दू हे कुलनाम.[] कृष्णमूर्तींचे वडील जिद्दू नारायणैय्या हे वासाहतिक ब्रिटिश प्रशासनाच्या सेवेत होते. संजीवम्मा या आपल्या आईचा कृष्णमूर्तींना लळा होता पण ते दहा वर्षांचे असताना संजीवम्मांचा मृत्यू झाला. नारायणैया-संजीवम्मा या दांपत्याला एकूण अकरा अपत्ये झाली, त्यांपैकी पाच जणांचा बालपणातच मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९०३ मध्ये जिद्दू कुटुंब कडप्पा इथे स्थिर झाले. त्याआधीच कृष्णमूर्तींना हिवताप जडलेला होता. अनेक वर्षांपर्यंत त्यांना हिवतापाच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. संवेदनशील, आजारी, स्वप्नांच्या दुनियेत असणारे हे बालक मतिमंद आहे असे सर्वांना वाटे आणि त्यामुळे शाळेत शिक्षकांचा तर घरी वडिलांचा मार कृष्णमूर्तींना नियमितपणे खावा लागे.[] अठरा वर्षांचे असताना लिहिलेल्या आपल्या आठवणींमध्ये त्यांनी १९०४ मध्ये मृत्यू पावलेली आपली बहीण व १९०५ मध्ये मृत्यू पावलेली आपली आई "दिसली" अशा परामानसी अनुभवांचे वर्णन केलेले आहे.[] बालपणातच निसर्गाशी त्यांचे भक्कम बंध जुळले आणि हे बंध आयुष्यभर टिकले.

१९०७ मध्ये ब्रिटिशांच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जिद्दू नारायणैय्या यांनी अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीत नोकरी धरली. रूढीप्रिय ब्राह्मण असण्याबरोबरच नारायणैया १८८२ पासून थिऑसॉफिस्टही होते. जानेवारी १९०९ मध्ये जिद्दू कुटुंब अड्यारला आले. थिऑसॉफिकल कुंपणाच्या बाहेर असलेल्या अस्वच्छ झोपडीत नारायणैय्या व त्यांचे पुत्र राहू लागले. सभोवतालच्या खराब परिस्थितीमुळे हे पुत्र कुपोषित बनले, त्यांना उवांचाही त्रास होऊ लागला.[ संदर्भ हवा ]

एप्रिल १९०९ मध्ये लेडबीटर व कृष्णमूर्तींची पहिली भेट झाली. लेडबीटर हे आपल्याला अतींद्रिय दृष्टी असल्याचा दावा करणारे गृहस्थ होते. अड्यार नदीच्या किनारी हे दोघेही नेहमी जात. लेडबीटरच्या म्हणण्यानुसार कृष्णमूर्तींचे प्रभामंडल (ऑरा) त्यांनी पाहिलेल्या सर्वोत्तम प्रभामंडलांपैकी एक होते आणि त्यात स्वार्थाचा लेशही नव्हता. लेडबीटरच्या मते कृष्णमूर्तींमध्ये आध्यात्मिक गुरू व उत्कृष्ट वक्ता बनण्याची पात्रता होती. थिऑसॉफीतील एका सिद्धान्तानुसार मानवजातीच्या उत्क्रांतीला दिशा देण्यासाठी एक प्रगत आध्यात्मिक शक्ती नियतकालाने पृथ्वीवर येते आणि विश्वगुरू म्हणून कार्य करते.[] हे सामर्थ्यही कृष्णमूर्तींमध्ये लेडबीटरला दिसले.

या "शोधा"नंतर अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या सदस्यांनी कृष्णमूर्तींना विशेष वागणूक देण्यास आरंभ केला. अपेक्षित विश्वगुरुपदासाठी "माध्यम" म्हणून कृष्णमूर्तींच्या शिक्षणाची, संरक्षणाची आणि तयारीची जबाबदारी लेडबीटर व त्याच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनी घेतली. कृष्णमूर्ती (यांना नंतर कृष्णाजी असेही म्हणले जाई) आणि त्यांचा धाकटा भाऊ नित्यानंद (नित्या) यांना खाजगी शिकवणी देण्यात आली व नंतर परदेशातील शिक्षणादरम्यान युरोपीय उच्चभ्रू समाजाशी त्यांचा परिचय करवून देण्यात आला. शाळेतील गृहपाठ पूर्ण न करू शकणारे आणि क्षमतांबद्दल व आरोग्याबद्दल अनेक अडचणी असणारे कृष्णाजी सहा महिन्यातच इंग्रजी बोलू आणि लिहू लागले. कृष्णाजींच्या मते लेडबीटरला लागलेला त्यांचा "शोध" ही त्यांच्या आयुष्यातील क्रांतिकारक घटना होती; अन्यथा लवकरच त्यांचा मृत्यू ओढवला असता.

या काळात कृष्णाजी अ‍ॅनी बेझंट यांच्याकडे आई म्हणून पाहू लागले होते. कृष्णाजींच्या वडिलांनी कृष्णाजींचे कायदेशीर पालकत्व बेझंटबाईंना दिले होते. कृष्णाजींना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे त्यांचे वडील झाकोळले गेले. इ.स. १९१२ मध्ये कायदेशीर पालकत्व रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अ‍ॅनी बेझंटला कृष्णाजी व नित्याचा कायदेशीर "ताबा" मिळाला. कुटुंब व घरापासून दूर गेलेल्या कृष्णाजी व नित्यामधील संबंध यामुळे अधिक मजबूत झाले आणि नंतरच्या काळात या दोघांनी सोबतच प्रवास केला.[ संदर्भ हवा ]

१९११ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीने आगामी विश्वगुरूच्या स्वागतास जगाला तयार करण्यासाठी ऑर्डर ऑफ द स्टार इन दी इस्ट (ओएसई) या संस्थेची स्थापना केली. कृष्णमूर्तींना मुख्याधिकारी बनविण्यात आले. विश्वगुरूच्या आगमनाच्या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही सदस्यत्व उपलब्ध होते. लवकरच सोसायटीच्या आत आणि बाहेर हिंदू वर्तुळात, भारतीय प्रसारमाध्यमांत वादविवाद सुरू झाले.[ संदर्भ हवा ]

मेरी ल्युटेन्स या कृष्णाजींच्या मैत्रिणीच्या व चरित्रकर्तीच्या म्हणण्यानुसार आपल्याला विश्वगुरू बनायचे आहे यावर एके काळी कृष्णमूर्तींचा विश्वास होता. एप्रिल १९११ मध्ये कृष्णाजी व नित्या इंग्लंडला गेले. तिकडे कृष्णमूर्तींनी आपले पहिले सार्वजनिक भाषण दिले आणि लिखाणास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धाच्या आरंभापूर्वी या बंधूंनी अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या. युद्धसमाप्तीनंतरही कृष्णमूर्तींची भाषणे आणि लेखन सुरू राहिले. इ.स. १९२१ मध्ये ते हेलेन नॉद या सतरावर्षीय अमेरिकन युवतीच्या प्रेमात पडले; पण हे संबंध फार काळ टिकले नाहीत.[ संदर्भ हवा ]

आयुष्य बदलविणारे अनुभव

[संपादन]

१९२२ मध्ये कृष्णा व नित्या कॅलिफोर्नियाहून सिडनीला गेले. कॅलिफोर्नियात असताना क्षयरोगी नित्यानंदाच्या प्रकृतीला उतार पडावा म्हणून ओहायो खोऱ्यातील एका कुटिरात ते राहत होते. ओहायोमध्ये या बंधूंना रोझलिंड विल्यम्स या अमेरिकन युवतीची मदत मिळाली. ओहायोमधील काळात प्रथमच जिद्दू बंधू थिऑसॉफिकल सोसायटीच्या सभासदांच्या निरीक्षणाखाली नव्हते. हे ठिकाण जिद्दूंना आवडले. अखेर त्यांच्या अनुयायांनी एक विश्वस्त संस्था स्थापन करून हे कुटीर व सभोवतालची जागा विकत घेतली. मग हे स्थान कृष्णमूर्तींचे अधिकृत निवासस्थान झाले.[ संदर्भ हवा ]

ओहायोमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर १९२२ मध्ये कृष्णमूर्तींना काही आयुष्य बदलविणारे अनुभव आले. या अनुभवांना आध्यात्मिक जागृती, मानसिक परिवर्तन अशी विविध संबोधने दिलेली आहेत. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार १७ ऑगस्टला कृष्णाजींना मानेत तीव्र वेदना जाणवू लागल्या. पुढच्या दोन दिवसांमध्ये वेदना बळावल्या, त्यांना भूक लागेनाशी झाली आणि अधूनमधून असंबद्धपणे ते बरळू लागले. ते बेशुद्ध पडल्यासारखे दिसत असले तरी नंतर त्यांनीच सांगितल्यानुसार त्यांना भोवताल दिसत होता आणि त्या अवस्थेत गूढ ऐक्याचा अनुभवही त्यांना येत होता. पुढच्या दिवशी लक्षणांची व अनुभवांची तीव्रता वाढली आणि "असीम शांती"चा अनुभव त्यांना आला. यानंतर त्यांना जवळपास रोज रात्री 'प्रक्रिया' या नावाने ओळखले जाणारे अनुभव येऊ लागले. या अनुभवांमध्ये वेदना, शारीरिक कष्ट आणि संवेदनशीलता, बालकासारख्या अवस्थेत जाणे आणि काही वेळा त्यांचे शरीर वेदनांना शरण जाणे किंवा ते स्वतःच "निघून जाणे" अशा बाबींचा समावेश होता.[ संदर्भ हवा ]

प्रक्रियेपासून वेगळे व "आशीर्वाद", "अमर्यादता", "पावित्र्य", "अनंतता" आणि सर्वाधिक वेळा "अन्यता" किंवा "अन्य" या संबोधनाने उल्लेखिले जाणारे काही अनुभव या काळात व नंतर कृष्णाजींना आले. ल्युटेन्सच्‍या म्हणण्यानुसार हा "अन्यते"चा अनुभव जवळपास आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिला आणि त्यांना संरक्षित असल्याची भावना देत राहिला.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९२२ पासून या गूढ अनुभवांची अनेक स्पष्टीकरणे मांडण्याचा प्रयत्‍न केला गेलेला आहे. लेडबीटर व इतर थिऑसॉफिस्टांनी आपल्या 'माध्यमा'ला काही परामानसिक अनुभव येतील हे गृहीत धरले होते पण या अनुभवांनी तेही अचंबित झाले. नंतर कृष्णाजींनी केलेल्या चर्चांमधून या अनुभवांवर थोडासा प्रकाश पडला पण अंतिमतः शोधक दृष्टीने हाती काहीही लागले नाही. रोलंड व्हर्‌नॉन या चरित्रकाराच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया आणि लेडबीटरकडे नसलेल्या उत्तरांमुळे मोठा परिणाम घडून आला. कृष्णमूर्तींनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून काही पावले टाकली. भविष्यातील गुरू या भूमिकेसाठी ही प्रक्रिया हा आधारस्तंभ होता.

१९२५ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटी स्थापनेनंतरची पन्नास वर्षे पूर्ण करणार होती. या काळात कृष्णमूर्तींच्या मसिहासदृश व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या चर्चांना ऊत आला. थिऑसोफिकल सोसायटीत राजकारण सुरू झाले. अनेक सभासद आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याचे बोलू लागले आणि इतर अनेक त्यावर शंका घेऊ लागले. अशा घटनांमुळे खुद्द कृष्णमूर्ती मात्र मनाने सोसायटीपासून दूर गेले.

१३ नोव्हेंबर १९२५ रोजी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी नित्यानंदांचे शीतज्वर व क्षयाच्या प्रादुर्भावांमुळे निधन झाले. नित्यानंद आजारग्रस्त असले तरी त्यांचा मृत्यू अनपेक्षित होता. या घटनेमुळे कृष्णाजींचा थिऑसॉफीवरील व सोसायटीच्या नेत्यांवरील विश्वास उडाला. नित्यानंदांच्या तब्येतीबद्दल कृष्णाजींना वारंवार आश्वस्त केले जात होते. आपल्या जीवितकार्यासाठी नित्यानंदाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू होणार नाही असे अ‍ॅनीबाईंसह कृष्णाजींना वाटत होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या बातमीने कृष्णमूर्ती जवळपास कोसळले. नित्यानंदांच्या मृत्यूनंतर बारा दिवसांनी मात्र ते "अतिशय शांत, तेजस्वी आणि सर्व भावनांमधून मुक्त" झाल्यासारखे वाटले.

नित्यानंदांच्या मृत्यूमुळे "विश्वगुरूचे आगमन" वगैरे चर्चा बंद झाल्या.[ संदर्भ हवा ]

भूतकाळाशी फारकत

[संपादन]

३ ऑगस्ट १९२९ रोजी कृष्णमूर्तींनी ऑर्डर ऑफ दी स्टारचे विसर्जन केले. मागील दोन वर्षांदरम्यान केलेल्या गंभीर विचारमंथनानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच त्यांनी नमूद केले की,

सत्य ही मार्गरहित भूमी आहे आणि तुम्ही कोणत्याही मार्गाने, कोणत्याही धर्माने, कोणत्याही पंथाने त्याच्या जवळ जाऊ शकत नाही ह्या म्हणण्यावर मी ठाम आहे. हा माझा दृष्टिकोन आहे आणि त्याच्याशी मी विनाशर्त पूर्णपणे बांधिल आहे. सत्य अमर्याद, अशर्त व कोणत्याही मार्गाने मिळण्यासारखे नसल्याने संघटित केले जाऊ शकत नाही; लोकांना दिशा देण्यासाठी किंवा विशिष्ट मार्गावर चालविण्यास प्रवृत्त करण्यासाठी कोणतीही संस्था बनविली जाऊ नये. ... हे महान कृत्य नाही, कारण मला अनुयायी नको आहेत आणि खरेच नको आहेत. एखाद्याचा अनुनय सुरू झाला की सत्याचा अनुनय समाप्त होतो. मी म्हणतो त्याकडे तुम्ही लक्ष देता की नाही याचीही मला चिंता नाही. जगात मला एक गोष्ट करावयाची आहे आणि अढळ अवधानाने मी ती करणार आहे. मी एकाच आवश्यक गोष्टीचा विचार करतो : मानवास मुक्त करणे. मी मानवाला सर्व पिंजऱ्यापासून, सर्व भयांपासून मुक्त करण्याची अभिलाषा धरतो; धर्म किंवा पंथ स्थापण्याची, नवे सिद्धान्त किंवा नवे तत्त्वज्ञान मांडण्याची नाही.[ संदर्भ हवा ]

विसर्जनानंतर अनेक विख्यात थिऑसॉफिस्ट्स, अगदी लेडबीटरही कृष्णमूर्तींच्या विरोधात गेले. आपण विश्वगुरू आहोत याचा कृष्णमूर्तींनी साफ इन्कार केल्याचा पुरावा उपलब्ध नाही पण जेव्हा जेव्हा त्यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली तेव्हा तेव्हा त्यांनी एकतर ही बाब असंबद्ध आहे असे म्हणले किंवा त्यांच्याच शब्दांमध्ये "जाणूनबुजून संदिग्ध" उत्तरे दिली. विसर्जनानंतर लवकरच त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटी, तिचे उपदेश किंवा प्रथा-पद्धती यांच्यापासून फारकत घेतली.

आपल्या उपदेशाला कृष्णमूर्तींनी कधीही माझा उपदेश म्हणले नाही. ते नेहमी उपदेशाबद्दल दक्ष असत, उपदेशकाबद्दल नाही. शिक्षकाला महत्त्व नव्हते आणि सर्व प्रकारच्या सत्तांचा, विशेषतः मानसिक सत्तांचा त्याग त्यांना अभिप्रेत होता :

कोणत्याही प्रकारची सत्ता, विशेषतः चिंतन व आकलनाच्या क्षेत्रातील सत्ता ही सर्वाधिक विनाशकारी, वाईट गोष्ट आहे. नेते अनुयायांचा नाश करतात व अनुयायी नेत्यांचा नाश करतात. तुम्हाला स्वतःच स्वतःचा शिक्षक व विद्यार्थी बनावे लागते. माणसाने मूल्यवान, आवश्यक म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही सवाल करावयास हवेत.

सोसायटीशी फारकतीनंतर संबंधित सर्व पदांचा कृष्णमूर्तींनी त्याग केला, दान म्हणून मिळालेल्या वस्तू व मालमत्ता ज्याच्या त्याला परत केल्या. उरलेले आयुष्य त्यांनी जगभरातील लोकांशी विश्वास, सत्य, दुःख, स्वातंत्र्य, मृत्यू यांच्या स्वरूपाबाबत व अध्यात्मसंपन्न आयुष्याबाबत चर्चा करण्यात व्यतीत केले. अनुयायी किंवा पूजकांचा त्यांनी स्वीकार केला नाही. गुरू आणि शिष्य या नात्यात अवलंबित्व व शोषण येते असे त्यांचे मत होते. आपल्या कार्याने प्रभावित झालेल्या लोकांकडून भेटवस्तू व आर्थिक मदतीचा त्यांनी स्वीकार केला आणि व्याख्यानमाला, लेखन या गोष्टी पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू ठेवल्या. त्यांनी लोकांना सतत स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त केले आणि विवक्षित विषयांबाबत चर्चेसाठी लोकांना आमंत्रित केले.[ संदर्भ हवा ]

मध्यायुष्य (१९३०-१९४४)

[संपादन]

कृष्णाजींचे मध्यायुष्य व्याख्यानदौऱ्यांमध्ये आणि प्रकाशनामध्ये गेले. ऑर्डर ऑफ द स्टारमधील एक मित्र आणि सहकारी असलेल्या देसिकाचार्य राजगोपाल (डी. राजगोपाल) याच्यासोबत त्यांनी स्टार पब्लिशिंग ट्रस्ट (एसपीटी) ही प्रकाशनसंस्था स्थापन केली. ओहायमध्ये आर्य विहार नावाच्या भवनात या काळी कृष्णमूर्ती, राजगोपाल आणि १९२७ मध्ये राजगोपालशी विवाहबद्ध झालेली रोझलिंड विल्यम्स हे राहत होते. 'एसपीटी'ची व्यावसायिक व संस्थात्मक बाजू डी. राजगोपाल सांभाळीत. कृष्णाजींचा वेळ भाषणे व ध्यान यांमध्ये जाई. राजगोपालचे वैवाहिक आयुष्य सुखमय नव्हते. १९३१ मध्ये राधा नावाच्या मुलीच्या जन्मानंतर राजगोपाल व रोझलिंड भौतिकदृष्ट्या विभक्त झाले. आर्य विहाराच्या सापेक्ष एकांतात कृष्णमूर्ती व रोझलिंड यांच्या दरम्यान असलेल्या निकट मैत्रीचे रूपांतर प्रेमप्रकरणात झाले. इ.स. १९९१ पर्यंत या संबंधांची जाहीर वाच्यता झाली नाही.

१९३० च्या दशकात यूरोप, लॅटिन अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचे दौरे कृष्णमूर्तींनी केले. १९३८ मध्ये हक्स्ले घराण्यातील आल्डस हक्स्ले या प्रसिद्ध लेखकाशी त्यांचा परिचय झाला. या दोघांमधील मैत्री अनेक वर्षे टिकली. युरोपात तेव्हा येऊ घातलेल्या संकटाबाबत दोघांनाही चिंता होती. राष्ट्रवादाच्या अपायकारक परिणामामुळे हे संकट उभे राहिले, असे या दोघांचेही मत होते. इ.स. १९४०-१९४४ या काळात कृष्णमूर्तींनी सार्वजनिक वक्तव्ये केली नाहीत. आर्य विहारात या काळात त्यांनी काम केले. बव्हंशी स्वयंपूर्ण असलेल्या आर्य विहाराने या काळात शिल्लक माल युरोपातील संकटग्रस्तांसाठी दिला.

मे १९४४ मध्ये ओहायो येथे भाषणमाला सुरू करून कृष्णमूर्तींनी सार्वजनिक मौन सोडले. 'एसपीटी'ची जागा घेतलेल्या कृष्णमूर्ती राइटिंग्ज इंकॉर्पोरेशनने (केडब्ल्यूआयएनसी) ही भाषणे व इतर साहित्य प्रकाशित केले. 'केडब्ल्यूआयएनसी'चे एकमेव उद्दिष्ट कृष्णमूर्तींच्या उपदेशाचा प्रसार करणे हे होते. भारतातील काही सहकाऱ्याच्या संपर्कात कृष्णमूर्ती होतेच. १९४७ च्या शिशिरात ते भारतात आले. अनेक तरुण बुद्धिवाद्यांना त्यांनी आकर्षित केले. या दौऱ्यातच पुपुल (जयकर) आणि नंदिनी या मेहता भगिनींचा कृष्णाजींशी संपर्क आला आणि त्या कृष्णमूर्तींच्या विश्वासू सहकारी बनल्या. ऊटकमंड इथे असताना कृष्णमूर्तींना पुन्हा 'प्रक्रिये'चा अनुभव आला तेव्हा मेहता भगिनी तिथे हजर होत्या.

या दौऱ्यात कृष्णमूर्तींना भेटावयास आलेल्या लोकांमध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा समावेश होता. भेटींदरम्यान कृष्णमूर्तींनी विस्तारपूर्वक आपला उपदेश नेहरूंला दिला. एका भेटीत कृष्णमूर्ती म्हणाले होते : "स्वचे आकलन संबंधांमधूनच होते. ... स्व ज्याच्यात उघड होतो असा आरसा म्हणजे संबंध. आत्मज्ञानाशिवाय सम्यक विचार आणि कृतीसाठी अधिष्ठानच नाही." यावर नेहरूंनी "सुरुवात कशी करावी?" असा प्रश्न केला होता. यावर कृष्णमूर्तींनी "जिथे आहात तिथून सुरुवात करा. मनाचा प्रत्येक शब्द, प्रत्येक शब्दसमूह, प्रत्येक परिच्छेद वाचा, कारण मन विचारांच्या माध्यमातून कार्य करते."

उत्तरायुष्य

[संपादन]

जगभरात सार्वजनिक भाषणे, गटचर्चा हे कृष्णमूर्तींचे नेहमीचे कार्यक्रम उत्तरायुष्यातही सुरू राहिले. १९६० च्या दशकाच्या प्रारंभी डेव्हिड बॉम या भौतिकविद्वानाशी कृष्णमूर्तींचा परिचय झाला. भौतिक विश्वाचे सार, मनुष्यजातीची मानसिक व सामाजिक अवस्था याबाबत बॉमच्या तात्त्विक व शास्त्रीय मतांना जुळणारी स्थळे कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानामध्ये होती. हे दोघे लवकरच घनिष्ट मित्र बनले. वैयक्तिक संवाद, गटचर्चा या माध्यमांमधून विचारांचे आदानप्रदान या दोघांमध्ये सुमारे दोन दशके सुरू राहिले. ह्या चर्चा पुस्तकरूपांत प्रसिद्ध झाल्याने कृष्णमूर्तींच्या विचारांचा शास्त्रीय वर्तुळात शिरकाव झाला. कृष्णमूर्तींचे तत्त्वज्ञान धार्मिक अभ्यास, शिक्षण, मानसशास्त्र, भौतिकी, चेतनेचा अभ्यास अशा विविध विषयांवरील असले तरी विद्यापिठीय वर्तुळात त्यांची आजवर चर्चा झाली नव्हती. फ्रिजॉफ काप्रा, जॉर्ज सुदर्शन हे भौतिकविद्, जीवशास्त्रज्ञ रुपर्ट शेल्ड्रेक, मानसशास्त्रज्ञ डेव्हिड शेनबर्ट यांच्यासोबत अनेक मानसोपचारतज्ज्ञांशी कृष्णमूर्तींनी चर्चा केल्या. नंतरच्या काळात कृष्णमूर्ती-बॉम यांच्या मैत्रीत कटू प्रसंग आले आणि आधीसारखी घनिष्ट नसली तरी या दोघांमधील मैत्री कृष्णमूर्तींच्या निधनापर्यंत टिकून राहिली.

अनेक विषयांमध्ये कृष्णमूर्तींच्या प्रतिभेने विहार केला असला तरी त्यांची मूलभूत शिकवण टिकून राहिली. १९२९ मध्ये ज्या गोष्टींशी असलेली बांधिलकी त्यांनी बोलून दाखविली होती, त्याबद्दल १९८० च्या दशकात कोअर ऑफ द टीचिंग या लिखित वक्तव्यात ते पुन्हा 'बोलले' :

"'सत्य ही मार्गरहित भूमी आहे.' कोणत्याही संस्थेतून, विश्वासातून, तत्त्वातून, यागातून, तात्त्विक ज्ञानातून किंवा मानसशास्त्रीय पद्धतीने माणूस तिथे पोहचू शकत नाही. बौद्धिक विश्लेषण आणि अंतर्मुखीय विच्छेदनातून नव्हे तर संबंधांच्या आरशातून, स्वतःच्या मनाच्या विषयघटकांच्या आकलनातून, निरीक्षणातून त्याला ते शोधावे लागेल. सुरक्षिततेच्या भावनेपोटी मानवाने स्वतःमध्ये धार्मिक, राजकीय, वैयक्तिक प्रतिमा उभ्या केल्या आहेत. त्या प्रतिमा चिन्हे, आदर्श, श्रद्धा या माध्यमांतून आविष्कृत होतात. यांच्या ओझ्याचा माणसाच्या विचारांवर, संबंधांवर व दैनंदिन आयुष्यावर प्रभाव पडतो. प्रत्येक संबंधात माणसाला माणसापासून वेगळ्या करीत असल्याने त्या [प्रतिमा] आपल्या समस्यांचे मूळ आहेत."

१९७० च्या दशकात अनेक वेळा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कृष्णमूर्तींची भेट घेतली. या दोघांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ व काही वेळा गंभीर चर्चा झाल्या असल्या तरी कृष्णमूर्तींचा भारतीय राजकारणावरील प्रभाव अजून अज्ञातच आहे.

दरम्यानच्या काळात राजगोपाल व कृष्णमूर्तीं यांच्यामधील संबंध न्यायालयीन लढाईपर्यंत ताणले गेले होते. १९७१ मध्ये सुरू झालेले प्रताधिकारासंबंधीच्या आरोप-प्रत्यारोपांचे प्रकरण अनेक वर्षे चालले. कृष्णमूर्तींच्या आयुष्यकाळातच राजगोपालांकडे असलेली कृष्णमूर्तींची पत्रे, हस्तलिखिते, दानस्वरूपात मिळालेली मालमत्ता, देणग्यांचे पैसे वगैरे बरीचशी सामग्री परत करण्यात आली. १९८६ मध्ये कृष्णमूर्तींच्या मृत्यूनंतर प्रतिस्पर्धी पक्षांनी हा प्रश्न निकालात काढला.

१९८४ व १९८५ मध्ये न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणासाठी कृष्णमूर्तींना आमंत्रित करण्यात आले. नोव्हेंबर १९८५ मध्ये ते भारतात आले. जानेवारी १९८६ पर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी "निरोपाची" भाषणे दिली. कृष्णमूर्तींना नेहमी विचारण्यात आलेल्या प्रश्नांसोबतच यावेळी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचा मानववंशावर काय परिणाम होईल याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. मृत्यूला मी आमंत्रित करू इच्छित नाही असे त्यांनी मित्रांना सांगितले होते पण शरीर किती काळ टिकेल (त्यांचे वजन खूप कमी झाले होते) याबाबत ते साशंक होते. बोलणे बंद झाल्यावर जगण्यास उद्देश उरणार नाही असेही त्यांनी म्हणले होते. चार जानेवारी १९८६ रोजी मद्रासमध्ये त्यांनी दिलेले भाषण अखेरचे ठरले.

आपल्या वारशाबाबत कृष्णमूर्ती सजग होते. आपल्या शिकवणीचा अर्थबोधक कुणीही बनू नये अशी त्यांची इच्छा होती. मृत्यूपश्चात आपल्या सहकाऱ्यांनी कृष्णमूर्तींचे प्रवक्ते किंवा वारसदार असल्यासारखे वागू नये असे त्यांनी कित्येकदा बजावून ठेवले होते.

मृत्यूच्या काही दिवस आधी केलेल्या वक्तव्यात त्यांनी आपल्याला काय झाले होते ते कुणालाही समजलेले नाही आणि आपली शिकवणही कुणाला कळालेली नाही असे म्हणले होते. आपल्या आयुष्यकाळात कार्यरत असलेली अफाट ऊर्जा आपल्यासोबत जाईल असेही त्यांनी म्हणले होते. "...शिकवण जगल्यास" लोक त्या ऊर्जेकडे जाऊ शकतील आणि आकलन करवून घेऊ शकतील असा आशावादही त्यांनी मांडला होता. चर्चांदरम्यान कृष्णमूर्तींनी आपल्या भूमिकेची तुलना टॉमस एडिसनकोलंबस यांच्याशी केली होती. नव्या जगाच्या शोधासाठी कोलंबसाला कष्टमय प्रवास करावा लागला, त्याच जगात आज जेटने सहज जाता येते असे कृष्णमूर्ती म्हणाले होते. याचा अर्थ काही प्रमाणात कृष्णमूर्ती "खास" असले तरी त्यांच्या आकलनाच्या स्तरापर्यंत पोहचण्यासाठी इतरांना खास असण्याची गरज नाही असा लावता येतो.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या एक्क्याण्णवाव्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८६ रोजी जे.कृष्णमूर्तींचे निधन झाले.

वारंवार चर्चिलेले विषय[ संदर्भ हवा ]

[संपादन]

ज्ञान

[संपादन]

दैनंदिन आयुष्यात विचारांच्या समुचित स्थानास कृष्णमूर्तींनी महत्त्व दिले. भूतकाळातील ज्ञानाचे शिलीभूत प्रक्षेपण म्हणून विचारांचा असलेला धोकाही त्यांनी दाखवून दिला. कृष्णमूर्तींच्या मते, अशा क्रियेने आपण राहत असलेल्या जगाबाबतचे आपले बोधन, समग्र आकलन आणि विशेषतः जगाला व्याख्यित करणारे संबंधांचे आकलन विकृत होते. ज्ञानाकडे त्यांनी मनाचे आवश्यक पण यांत्रिक कार्य म्हणून पाहिले. नोंद घेण्याच्या मनाच्या क्षमतेमुळे अडथळेही उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, दुखावणारे शब्द क्रियेला प्रभावित करणाऱ्या स्मृती ठरू शकतात. म्हणून ज्ञान संबंधांमध्ये भेद आणून विनाशक ठरू शकते.

भय आणि आनंद

[संपादन]

सॅन दिएगो येथे १९७० मध्ये दिलेल्या वक्तव्यात कृष्णमूर्ती म्हणतात : "भय कशाशी तरी संबंधित असते; ते स्वतःहून असत नाही. ... काल मला वेदना झाल्या, मला त्या उद्या नको आहेत. कालच्या वेदनांच्या स्मृतीचा समावेश असणारा विचार उद्या वेदना असण्याचे भय प्रक्षेपित करतो. म्हणून विचार भय आणतात. विचार भयाला जन्म देतात; विचार आनंदाचीही लागवड करतात. भय समजण्यासाठी आनंद समजणे आवश्यक आहे. ... भय आणि आनंद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत."

ध्यान

[संपादन]

ध्यानाकडे कृष्णमूर्तींनी महान कला म्हणून पाहिले. तंत्राशिवाय सराव करून ही कला शिकावी असे त्यांचे मत होते. खरे ध्यान म्हणजे "विचारांचा अंत" जो "काळापलीकडे...वेगळ्या मितीत" घेऊन जातो असे कृष्णमूर्तींचे मत होते. "ज्ञात गोष्टी काढून टाकून मन रिकामे करणे" म्हणजे ध्यान असेही त्यांनी म्हणलेले आहे.

शिक्षण

[संपादन]

कृष्णमूर्तींनी जगभर अनेक शाळा काढल्या. शैक्षणिक लक्ष्ये म्हणून त्यांनी पुढील बाबी सांगितल्या होत्या :

  1. वैश्विक दृष्टी
  2. मानव व पर्यावरणाचा विचार
  3. शास्त्रीय दृष्टीचा समावेश असणारी धार्मिक चेतना

१९२८ मध्ये कृष्णमूर्ती व अ‍ॅनी बेझंट यांनी स्थापन केलेले कृष्णमूर्ती फाऊंडेशन अनेक शाळा चालविते. १९३४ साली वाराणसीत स्थापन झालेले राजघाट बेझंट स्कूल हे आरंभीच्या शाळांपैकी एक आहे.

विश्व संकट

[संपादन]

कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्ऱ्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत. स्वकेंद्रित क्रिया बाह्य दिशेने राष्ट्रवाद व धार्मिक असहिष्णुता म्हणून आविष्कृत होतात, विभाजित जग निर्माण करतात, अशा जगात विश्वासापोटी आपण एखाद्याला मारण्यास तयार होतो.

जे. कृष्णमूर्ती यांच्यावरील पुस्तके

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ ल्युटन्स (१९९५): Jiddu (alternately spelled Jeddu, Geddu or Giddu) was Krishnamurti's family name.
  2. ^ Lutyens (1975), pp. 3–4, 22, 25
  3. ^ Lutyens (1983a), pp. 5, 309
  4. ^ Lutyens (1975), p. 21.