Jump to content

मोनालिसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोनालिसा हे १६व्या शतकात लिओनार्दो दा विंची ह्या इटालियन चित्रकाराने काढलेले एक प्रसिद्ध तेलचित्र आहे. पॅरिसमधील लूव्र ह्या संग्रहालयामध्ये हे चित्र सध्या प्रदर्शनासाठी ठेवले आहे.


मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध चित्र. इटालियन प्रबोधनकालीन श्रेष्ठ चित्रकार लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) याने १५०३ ते १५०५ या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगविले. तेला जोकोन्दा या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री (जन्म १४७९) ही फ्रांचेस्को देल जोकोन्दो या फ्लॉरेन्समधील व्यापाऱ्याची पत्नी (विवाह १४९५) होती व तत्कालीन कलासमीक्षक व्हाझारीच्या मतानुसार, जोकोन्दोनेच आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगविण्याचे काम लिओनार्दोकडे सोपविले. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. त्याने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ, खोल, अथांग भाव दर्शविले आहेत, त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. त्यायोगे काळाच्या ओघात उत्तरोत्तर चित्राविषयीचे आकर्षण व लोकप्रियता वाढतच गेली आहे. विशेषतः मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ मंदस्मित, डोळ्यात लपलेली किंचित खिन्नतेची झाक व पार्श्वभूमीदाखलचे काल्पनिक निसर्गदृश्य हे घटक चित्राच्या गूढतेत अधिक भरच घालतात.


त्यामुळे हे प्रत्यक्ष व्यक्तिचित्र असूनही ते वास्तव जगातले न वाटता अदभुतरम्य कल्पनाविश्वातलेच वाटते. त्यातील प्रतीकात्मकतेमुळे ते एका विशिष्ट स्त्रीचे चित्र, एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता त्याला व्यापक अशा स्त्रीत्त्वाचे परिणाम लाभते. हातांचे कौशल्यपूर्ण रेखाटन व डोळ्यांतील चैतन्यमय भाव यांमुळेही चित्राला अस्सल जिवंतपणा लाभला आहे. तंत्रदृष्ट्या चित्राचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे लिओनार्दोने त्यात केलेला ‘ स्फुमातो ’ तंत्राचा (धुसर बाह्यरेषा व सौम्यसर रंग) वापर होय. परिणामी चित्रात साचेबंदपणा व काठीण्य टाळले गेले आहे. चित्रावरील छायाधूसर अवगुंठनामुळे व छायाप्रकाशाच्या सूचक वापरामुळे चित्रास यथादर्शनात्मक खोली लाभली आहे.

मोनालिसाचा आदर्श पुढे ठेवून अनेक व्यक्तिचित्रे नंतरच्या काळात रंगविली गेली. त्याच्या तंतोतंत प्रतिकृती, नग्नाकृती, तसेच व्यंग्यचित्रेही रंगवली गेली. प्रबोधनकालीन कलासौंदर्याचे निकष धुडकावून लावण्यासाठी, प्रसिद्ध दादावादी चित्रकार मार्सेल द्यूशॉं याने मोनालिसाला दाढीमिशा लावून या चित्राचे विरुपण केले व ते L. H. O. O. Q (१९१९) या नावाने प्रदर्शित केले.

लिओनार्दोच्या काळात हे चित्र त्याच्याकडून पहिल्या फ्रान्सिसने विकत घेतले. नंतर ते पॅरिसच्या लूव्ह्‌र कलासंग्रहालयात ठेवले गेले, तिथून ते १९११ मध्ये चोरीला गेले परंतु पुढे २ वर्षांनंतर त्याचा शोध लागला व आता ते पूर्ववत लूव्ह्‌र संग्रहालयात ठेवले आहे.