नेक चंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेक चंद (इ.स. १९२४:शकरगड, पाकिस्तान - १२ जून, इ.स. २०१५:चंदीगड) हे एक भारतीय वास्तुरचनाकार होते.

चंदीगड येथील रॉक गार्डन[संपादन]

१९५० च्या दशकात नेक चंद चंडिगडमधील एका बांधकाम प्रकल्पावर काम करत होते. त्यावेळी प्रख्यात आर्किटेक्‍ट ली कोर्बुसिएर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदीगड शहराची निर्मिती सुरू होती. नागरिकांनी फेकून दिलेल्या वस्तूंमधून कलाकृती निर्माण करण्याची कला नेक चंद यांना साध्य झाली होती. यासाठी चदीगडच्या उत्तर भागात त्यांनी स्वतःची निर्मितीशाळाही तयार केली होती. "रॉक गार्डन‘मध्ये त्यांनी फुटलेल्या बांगड्या, इलेक्‍ट्रिक बोर्डावरील बटणे, प्लग, ट्यूबलाईट, दगड, फुटलेल्या टाइल्स आणि अशा अनेक टाकाऊ वस्तूंपासून असंख्य कलाकृती निर्माण केल्या आहेत. ३५ एकरामध्ये पसरलेल्या "रॉक गार्डन‘मध्ये धबधबे, तलाव आणि ओपन एर थिएटरही बांधण्यात आले आहे. १९७६मध्ये "रॉक गार्डन‘चे उद्‌घाटन झाले होते. ४० एकरांवरील हे गार्डन पाहण्यासाठी भारत आणि जगभरातील अडीच लाखापेक्षा अधिक पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात आणि या गार्डनला तिकिटविक्रीतून वर्षाला सुमारे दोन कोटी रूपयांचा महसूल मिळतो.

हे उद्यान बेकायदा म्हणून तोडण्याचा आदेश १९७५ साली देण्यात आला होता, पण तो अंमलात येऊ शकला नाही.

आंतरराष्ट्रीय मान्यता[संपादन]

नेक चंद यांच्या कलाकृती जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू पॅरिस, लंडन, न्यू यॉर्क, वॉशिंग्टन, बर्लिन आदी शहरांमध्येही आहेत. विविध भाषांमध्ये त्यांच्यावर पुस्तकेही लिहिली गेली आहेत. अनेक देशांनी त्यांना सन्माननीय नागरिकत्वही दिले होते. नेक चंद यांना १९८४ मध्ये "पद्मश्री‘ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

नेक चंद फाउंडेशन[संपादन]

कलाकारांच्या कामाला पाठिंबा देण्याच्या आणि जगभरात सुंदर बागांची निर्मिती होण्याच्या दृष्टिकोनातून १९९७मध्ये ’नेक चंद फौंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे.