सोन चिखल्या
सोन चिखल्या किंवा सोनटिटवी किंवा छोटा टिटवई (इंग्लिश:Pacific Golden Plover; हिंदी:छोटा बटन; संस्कृत:प्राच्य स्वर्ण टिट्टिभ; गुजराती:सोनेरी बटण टिटोडी; तमिळ:कोट्टान) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने तित्तिराएवढा असून याचे डोके जाड, पाय काटकुळे, चोच कबुतरासारखी असते. रंग वरून उदी, त्यावर पांढऱ्या व सोनेरी टिकल्या, खालून पांढरा, छातीवर बदामी, करडा व त्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. उडताना पंखाची टोके टोकदार दिसतात व त्यांवर पट्टे नसतात. उदी शेपटी पंख्याप्रमाणे पसरलेली असते. उन्हाळ्यात-म्हणजे विणीच्या हंगामात खालून काळी असते. थंडीच्या दिवसात पाहुणे म्हणून आल्यावर, तसेच, वसंतात परत जाताना ते खालून रंगीबेरंगी आणि काळे-पांढरे दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. ते थव्याने आढळतात.
वितरण
[संपादन]हे पक्षी भारतीय उपखंड, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे असतात. पूर्व आशिया आणि उत्तर अमेरिका येथे त्यांची वीण होते.
निवासस्थाने
[संपादन]ते दलदली प्रदेश, धान्याची शेते, चिखलाणी आणि गवती कुरणे याठिकाणी आढळतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.