समलैंगिकता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील लैंगिक आकर्षणसमागम क्रियेस समलैंगिकता (इंग्लिश: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' (इंग्लिश: Homosexual) म्हणले जाते.

समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, कला व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात अमेरिकेतील 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि 'अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन' ह्या महत्वाच्या वैद्यकिय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धीक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्यिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या.

आधुनिक वापरात, समलैंगिक स्त्रियांना 'लेस्बिअन' (इंग्लिश: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना 'गे' (इंग्लिश: Gay) म्हणले जाते.

कायदेशीर मान्यतेची स्थिती [संपादन]

१९७०/८० च्या दशकांपर्यंत बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकता ही कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आली होती. २०१०च्या सुरवातीस, कॅनडा, स्पेन, नॉर्वे, स्वीडन, बेल्जिअम, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांमध्ये समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता आहे. काही युरोपियन देशांमध्ये, विवाहांस अधिकृत मान्यता नसली तरी काही प्रमाणात 'सिव्हिल युनियन'च्या स्वरूपात वैवाहिक जोडप्यांसारखे काही हक्क दिले गेले आहे. अमेरिकेत समलैंगिक विवाहास कायदेशीर दर्जा दिला जावा की नाही हा एक वादाचा विषय असून विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान ह्या विषयावर प्रसारमाध्यमांमध्ये बऱ्याच वेळी चर्चा घडून येतात. समलिंगी विवाहाची अधिकृतरित्या कायदेमान्यता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आहे. कनेक्टिकट,आयोवा, मॅसेच्युसेट्स, व्हर्मॉँटन्यू हँपशायर ह्या पाच राज्यांमध्ये समलैंगिक विवाह कायदेशीर आहे, (इतर राज्यांमध्ये समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता नसली तरी समलैंगिक संबंधांना अटकाव नाही). कॅलिफोर्नियामध्ये सन २००८ प्रथम समलिंगी विवाहास मान्यता देणारा कायदा मंजूर झाला होता, मात्र नोव्हेंबर २००८ मधील निवडणुकांमध्ये 'प्रपोझिशन ८' हे कलम सार्वमताने मंजूर झाले ज्याद्वारे वरील कायदा बाद ठरवला गेला. बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकमुळे एखाद्या व्यक्तीला डावलले जाणे (नोकरी, सामाजिक, शासकीय, शैक्षणीक किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा खासगी व्यवसायांमध्ये) हे बेकायदेशीर ठरवले गेले आहे.

भारतीय घटनेच्या प्रभाग ३७७ मधील काही कलमांनुसार काही विशिष्ट 'अनैसर्गिक समागम संबंध' - जरी ते प्रौढ व्यकींमध्ये 'परस्परसंमतीने आणि खासगीपणे' होत असतील तरीही - गुन्हा म्हणून गणले जात होते. ह्या कलमांनुसार समलैंगिक संबंध (इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुषांमधील समागमाचे काही प्रकारही) बेकायदेशीर होते. मात्र जुलै २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णयाद्वारे[१] हे कलम 'घटनात्मक व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आड येणारे' म्हणून अवैध घोषित केले.

अनेक आशियाई, आखाती देशांमध्ये समलैंगिकता अजूनही गुन्हा आहे. सहा देशांमध्ये समलैंगीक समागम करणे हा जन्मठेप-पात्र गुन्हा आहे; १० देशांत तर समलैंगिकतेस मृत्युदंडाची शिक्षा आहे.[२]

संदर्भ [संपादन]

  1. India decriminalises gay sex. टाईम्स ऑफ इंडिया (2009-07-03).
  2. Ottosson, Daniel (November, 2006), LGBT world legal wrap up survey, ILGA, <http://www.ilga.org/statehomophobia/World_legal_wrap_up_survey_November2006.pdf>. Retrieved on २१ सप्टेंबर २००७